क्षण..!
जगण्यात मजा आहे....!
अचानकच गवतामधून लाल डोळ्याचा एक ससा, तुरुतुरु धावतच माझ्या दिशेने आला आणि थांबला, तर्र लाल झालेल्या डोळ्यांनी आधी जणू भक्ष्याची ताकद अजमावण्याच्या पद्धतीनेच त्याने माझ्याकडे पाहिले अन् सटकन माझ्या काही कळण्याच्या आत तो मी टेकून बसलेल्या झाडाच्या खोबणीत शिरला... अचानक मागून एक शिकारी कुत्रा हुंगत आपल्या शिकारीच्या मागावर आला, दृष्टी आड झालेल्या शिकारीचा काकुळतीने शोध घ्यावा अन् त्याच्या शिकारी आड येणार्या प्रत्येक अडथळ्याला त्याचा शत्रूच समजून झुंझण्यासाठी त्वेषाने झडप घालण्याचा लगेच पवित्रा घ्यावा.. मधे आलेल्या माझ्यासारख्याला बचावाची संधीही न देता तुटूनच पडला... बावरलेल्या मनाला सावरायला अन् अचानक आलेल्या संकटाला तोंड द्यायला, मेंदूला आणि शरीराला एका क्षणाची उसंत हवीच असते ती संधी त्या श्वानाने जणू द्यायची नाहीच असे ठरवून हल्ला चढवला... धडधाकट त्या धुडाने चांगली चार पाच फुट उंच झेप घेऊन पंज्यांनी मला मागेच लोटलं, मांसासाठी तो आता वेडापिसा झाला होता, माझा तोल जाऊन मी जमिनीवर पडलो, एका हाताने त्या धुडाला दूर करत आजूबाजूला दुसर्या हाताने चाचपडत एक दगड हाताला लागला, सगळे बळ एकवटून त्या धुडाच्या जबड्यालाच मारला, जणू त्याच्यापेक्षा मी बलवान सिद्ध झालो म्हणून आल्या पावली ते सुसाट पळत सुटलं...
परिस्थिती पुन्हा अनुरूप झालेली पाहून मी स्वतःला पूर्ववत केल अन् पुन्हा त्या झाडाच्या खोबणीकडे पाहिलं. तो लब्बाड ससा आता बाहेर येऊन दुडक्या चालीने मटकट माझ्या दिशेने हळूहळू येऊ लागला, मी दुर्लक्षच केलं एकतर स्वताला सांभाळणे कठीण त्यात याला जीव लावला तर? हा पण एकदिवस जाईलचं सोडून. त्यापेक्षा मोकळ्या निसर्गातच त्याचा मुक्त स्वैरपणा अन् स्वच्छंदीपणा काही काळ का असेना अबाधीत राहिल, लळा लावला तर मग कठीणच व्हायचं सगळंच मला प्रतिबंध नको, मला कुंपण नको, समाजाची बेडी नको, कुठेही कुणाच्याही दारात जाऊ नये, आपणच स्वतःसाठी आखून घेतलेल्या चौकटीतच राहावं उगा कशाला आपण आपल्या चौकटी बाहेर जायचं अन् कुणाला आपल्या चौकटीत आणायचं? कोरडाच विचार करून अगदी कोरडे पणानेच नजर उचलून त्या लबाडला मी पाहिले, मस्तीत येऊन माझ्या पुढ्यातच नुकतेच उमललेले कोवळे गवत खात माझ्या भोवती अगदी प्रदक्षिणा घालत होता, जसा तो मागे आला मी एक नव्हे चांगली तीनचार पावले उचलून पुढे आलो, माझ्या मनातली घालमेल जणू त्याने ओळखली कि, माझा विचार त्याने बरोबर हेरला माहित नाही, तो ही अगदी ठरवल्याच प्रमाणे माझ्या आसपासच बागडू लागला. शेवटी मी टोकाचाच निर्णय घ्यायचा ठरवलं. "जा म्हंटल स्पष्टच माझ्याकडे तुला द्यायला माझं अस काहीच नाही". काय हवंय तुला आणि मी तरी तुला काय देऊ? एकमेकांच अस्तित्व, एकमेकांच आयुष्य, एकमेकांची चौकट वेगवेगळी आहे. एकदा असंच कुणाला तरी फार जवळ केलं, अक्षरशः पुजलही बदल्यात मिळाल काय? एकटा जसा आधी होतो तसा, जिथल्या तिथेच परत आणून सोडलं मला, फक्त उरात नव्या आठवणी अन् मनावर नव्या जखमा ज्या कधीही भरून येणार नाहीत आणि आता तू....
माझ्यासाठीही मी स्वतःला शिल्लक ठेवलं नाही. तुला काय देऊ(?) जा तू तुझ्या मार्गाला येव्हढ बोलून मी पाठकरून माझ्या परतीच्या दिशेने जाऊ लागलो, परत मागे वळून पहाव का(?) पुन्हा ते निरागस कुणाच्या जबड्यात अडकून सुटकेसाठी तडफडणार तर नाही, शरीराच ठीक पण माझं मन ज्याच्यासमोर नेहमी मी हारच मानली या क्षणालाही हरलो, माझं मलाच कळल नाही, मी मागे कधी वळलो, डोळे पाणावले होते, सारं स्तब्धच झाले होते, काय हक्क आहे मला कुणाला अस बोलायचा आणि त्यानेही का ऐकून घ्यावे बरे(?) नजरेला तो पुन्हा दिसला नाही पण माझ्या मनावर एक अनामिक दडपण अन् पश्चातापाची अजून एक झालर चढली. आजूबाजूला नजरेचा पल्ला फिरवून पाहिले... स्वतःशीच नकारार्थी मान हलवत पुन्हा परतायला मागे वळलो तर लब्बाड त्याच मस्तीत, त्याच प्रसन्नतेने दुडक्या मारत गवताशी खेळ करत होता, अच्छा ! तर माझं बोलणं तुला कळल नाही तर(?) की कळूनही नकळल्याचा हा तुझा अविर्भाव(?) एकदम दुडकी मारून माझ्या समोर आला, मागच्या दोन्ही पायावर उभा राहून पुढल्या दोन्ही पायांनी मला खाली झुकण्याचा इशारा केला कि, आदेश दिला माहित नाही मी माझ्या गुढग्यांवर त्याच्या पुढ्यात बसलो. नेमकी हीच संधी हवी होती का त्याला(?) आई जवळ येताच जसं तान्हुल बाळ स्वतःला तिच्या ओढीने, मायेने, प्रेमाने, निश्चिंतपणे, आवेगाने कुशीत शिरत अगदी तसाच हा लब्बाड माझ्या कुशीत शिरला. नकळत माझे हात त्याच्या भोवती संरक्षणात्मक कवचाच्या रुपात गुंफले गेले. सहवासाचा की(?) स्पर्शाचा तो एक अबोल क्षण, मला माझ्यात एक नवी उर्मी देऊन गेला. त्याच्या त्या निरागस डोळ्यात एकदाच मी स्थिर नजरेने पाहून विचारले, चलतोस माझ्यासोबत कायमच(?) लहान बाळ जस हात पाय ताठ करून आळस देतं अगदी तसच या लब्बाडाणे केले...
एकट्याचाच आयुष्य माझं. एकट्याचाच अवाढव्य फ्लॅट, चांगली नोकरी, बक्कळ पैसा, चारचाकी गाडी पण आपलं स्वतःच म्हणून जवळ असं कोणीच नाही, ज्या व्यक्तीसाठी हे सगळ मिळवलं तीच व्यक्ती माझी नाही झाली तर या सगळ्या गोष्टींचा माझ्यासाठी तरी काहीच अर्थ नाही, सगळंच अर्थहीन झाले होते खर सांगायचं तर मी स्वतःला कुणात औपचारिक गुंतवू नाही शकलो. सख्ख्या माणसांसोबत प्रत्येक माणसाला मनापासून जोडलं पण नाते तुटायला लागतात तेव्हा; सगळ्यात आधी जे नाजूक फुलासारखं कधीच तुटू नये म्हणून प्रत्येक क्षणाला जपलं असत, सावरलं असत, सांभाळून घेतलं असत, आयुष्यभर सांभाळायच वाचन दिलं असत तेच नातं सगळ्यात आधी तुटत अन् बिखरवत आपल्याला. त्यानंतर तुटतात सख्खी नाती अनंतात विलीन होऊन, बाकी जोडलेली नाती तर औपचारिकता संपताच तुटून जातात अन् त्यानंतर उरलो होतो माझा मी एकटा. कुठल्याच नात्याचं ओझं न झालेला जमेल तस जपलं, देता आलं तेव्हढ सगळंच दिलं, अन् घेतल्या त्या फक्त वेदना आणि आठवणी कारण त्या न मागताच माझा जणू हक्कच आहे त्यांच्यावर अशा अविर्भावात माझ्या पदरात पडलेल्या अन् मीही हसतच स्वीकारलेल्या कोरडेपणाच अंगीकारून. मतलबापुरता मतलबीच बनलेला. शेवटी त्या मतलबालाही कंटाळून एकदिवस असंच दोन दिवसाची रजा टाकून दूर भटकत राहिलेला माणसानंतर प्राण्यांच्या जंगलात... जंगलातही सारे प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात, हे फार उशिरा कळल पण एक माणसांसारखे ते घमंडी, हेकेखोर आणि कावेबाज स्वतःच्या श्रेणीत तरी नसतात...
आज नुकताच येउन तंबू गाळण्या आधी, ड्रायव्हिंगचा आलेला शिन काढत होतो तर लाब्बडा सोबत अश्या प्रकरणात गुंतून गेलो. संध्याकाळची वेळ झालेली आता जरावेळ ओढ्याकाठी थांबून, तिथून जवळूनच थोडी लाकडे गोळा करून मस्त कॉफी घेऊन, परतायचा विचार करत चूल पेटवली अन् पाणी उकळायला ठेवलं. लब्बाड एव्हाना रुळला होता आसपास हुंदडत होता. ब्रेड अनायासे आज मी घेतलंच होत, त्यावर थोड चीज अन् जॅम लावून लब्बाडाला शिळ घालून जवळ बोलावलं. दुडक्या मारतच तो आला, स्वतःच्या थोड्या टणक अन् जाड दातांनी ब्रेडचा आस्वाद माझ्या हातानीच त्याने घेतला. ब्रेडचे तुकडे करतांना हाताच्या खाली पडलेल्या तुकड्यांकडे अगदी दुर्लक्षच केले होते, तरी मी जे तुकडे खाली पडले ते पुन्हा उचलले ज्यांवर माती नव्हती अन् ज्यांवर होती ती निट झटकून ते तुकडे वापस हातावर ठेवले. डोळे मिटून लब्बाडचे आस्वाद घेणे चालू होते, माझी हरकत पाहयला त्याने डोळे उघडलेच नाही. पण काय करू कितीही कमावता झालो, उधळ्या झालो तरी अन्नाला अस निर्दयतेने मातीमोल नाही करता आलं...खर तर मला जगासारख वागता नाही आलं(!) क्षणभरच्या सुखातच मी रमायला लागलो. माझ्या चौकटीत मी कुणाला नंतर जवळ केलं नाही अन् दुसर्याच्या चौकटीत मी अतिक्रमणही केले नाही. पण म्हणतात न "वेळे आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही आणि जेव्हा मिळत तेव्हा त्याला अर्थ एक कोरडेपणाचाच असतो". मनाला त्याची कदर आणि आदर काहीही एक वाटत नाही.... पण शेवटी मनच ज्याच अस्तित्व तर नाही, पण त्याची अपेक्षा आणि कल्पनेची धाव यांना काही सीमा अन् बंधनच नाही. नव्याने आलेल्या पाहुण्याचही असच नवाळीचे नऊ दिवस संपले का कौतुकही संपत अन् त्याच्यात गुंतलेल मनही कंटाळत... पुन्हा होतो तिथेच वर्तमान भूतकाळातल्या वर्तुळात मनाला भरकटवत राहतो... आमचं तसं (लब्बाडच आणि माझ) बंर चाललं होतं. काही का असेना, एक नव चैतन्यच माझ्या आयुष्यात संचारल होतं. प्रत्येक कामात खर सांगायचं तर "जगण्यात मजा आहे..." समीकरणच माझं बनलं होतं...
आताचा सोडून पुढच्याच विचाराने मी हैराण झालो, आहे त्या क्षणात जगायचं मी विसरूनच गेलेलो पण या नठाळामुळे पूर्ववत माझा मी गवसला. माझ्या अनवाणी वाळवंटात जणू पाण्याचा झराच.. दिवस नेहमीपेक्षा मस्त जात होते, माणसांच्या कळपातलेही सौंदर्य आता नजरे भरत होते, पुन्हा एकदा जगावं, अगदी जस ठरवलं होतं बेधुंद तसच, कुणाच्या सोबत, कुणाच्या सहवासात. प्रेमाचा सागर माझ्यात भरला आहे, त्याला कुठे कसा रिता करावं आणि कोणी माझ्या आयुष्यात स्थान घ्यावं हे मी ठरवणार. असा तिरसट विचार करूनच मी पुन्हा एकदा जगायच ठरवलं... गेलेला भूतकाळ नव्याने आयुष्यात येणार्या व्यक्तीशी न लपवता अन् भूतकाळा सकट मला स्वीकारेल त्या व्यक्तीसाठी स्वतःसाठी इथून पुढे जगाच्या रितीने चालायचं मी ठरवलं... आज सगळी कामे आटोपून मी नेहमी प्रमाणे घरी यायला निघालो वाटेत बाजारातून ताजी गाजरं चागली दोन किलो विकत घेतली लाब्बडासाठी.. स्वतःची कामे स्वतःच करायची सवय म्हणून ड्रायव्हिंग पण स्वतःच करत होतो. मजा येत होती, आज खुशीत होतो. बाजारातली गर्दी पार करून थोड्या मोकळ्या रस्त्याला आलो आणि सावकाश वळण घेऊन पुढे भरधाव जाऊ म्हणून स्पिड वाढवणार तितक्यात एक स्कुटी धडकन येउन माझ्या गाडीवर आदळली.. होतो त्याच जागेवर मी गाडी उभी केली.. गाडीच दार उघडून बाहेर येवून, कोण कस आदळल हे सोडून माझ्या गाडीच किती नुकसान झालं हेच मी बघत बसलो, एव्हाना पब्लिक जमा झाली. "लोकांना काय थोड काही झालं कि बघ्याची भूमिका घ्यायलाच आवडते" मी फ़क्त शांततेने सगळं पाहिले अन् आदळलेल्या गाडीच्या मालकाचा शोध माझी नजर घेऊ लागली. नुकसान भरून जे घ्यायचं होत... माझ्या गाडीच्या अवस्थेवरून तरी चालकाला जास्त लागायला नको होत. माहित नाही का भितीची एक लहेर माझ्या शरीराला स्पर्शून गेली, मनात द्वंद्वच पेटले जास्त लागले असेल तर(?) गर्दी बाजूला सारत मी शेवटी आदळलेल्या गाडीच्या मालकाला गाठलेच... ती एक तरुणी होती... पण हे काय हाताला आणि डोक्याला लागलंय तरी सगळ्या वेदना ओठा आड दडवत बर्याच खंबीरतेने स्वतःला सावरलं. जमा झालेल्या गर्दीतून एक दोघांची मदत घेऊन स्वतःची गाडी उभी केली, माझ्या गाडीचे झालेलं नुकसान पाहून कपाळावर आठ्याच पडल्या, तरी चेहरा थोडा संयमित ठेवत, आजूबाजूला ती गाडी मालकाचा शोध घेऊ लागली. पण का कुणास ठाऊक माझी पावले जागीच थबकली होती, तिने पर्स उघडून तीच कार्ड काढून पेनने काही लिहिले, ते गाडीच्या उघड्या असलेल्या खिडकीतून आत स्टेअरींगवर अडकवून ठेवले. अन् गाडी सुरु करून निघून गेली. काही क्षण गेले असतील, झालेला प्रकार पुन्हा झरकन डोळ्यापुढून गेला अन् राहिले एकच रक्ताने माखलेले हात डोक्यातून गालावर ओघळत आलेली रक्ताची धार अन् मनाला सुन्न करून गेलेला एकच विचार, जाता जाता मध्ये काही अभद्र झाले तर(?)
मी धावतच गाडी गाठली आणि सुसाट ती गेलेल्या रस्त्यावर सोडली. जास्त वेगात ती तशीही गेली नाही, नजरेच्या टप्प्यात आली जवळच्या सुर्या हार्ट ऍन्ड क्रिटीकल दवाखान्यात अगदी धावतच आत शिरली. मी माझी गाडी पार्क करून तिने ठेवलेलं कार्ड खिशात ठेवत दवाखान्यात प्रवेश केला. रिसेप्शनला जाऊन उभा राहिलो, मनात तशी घालमेल होतीच दवाखान्याशी तस जुनच नात असल्यामुळे फार काही अवघडल्यासारख काही एक वाटल नाही, बस ओळखीची रीसेप्शनीस्ट नव्हती तिच्या जागी नवीनच होती, तरी हरकत नाही म्हणत क्षण दोन क्षण लक्ष वेधण्याचा मूर्खपणा करणार तेव्हढ्यात हवी असलेली व्यक्ती समोर साक्षात दिसावी अन् मनाला हायस वाटावं... आमची नजरा नजर झाली ओळखीच हसूही त्यांनी मला दिलं एक मोकळा श्वास घेऊन मी त्यांच्या हसण्याला हसून उत्तर देत विचारलं काय काकी आज बरीच धावपळ? तू येणार असतो तेव्हाच होत असं बर झाले आलास ते, ब्लड देतोस गरज आहे... आहा! विचारायला कधी पासून लागल्या बोला कुठल्या वॉर्ड मध्ये नेताय? वॉर्ड नाही ओपीडी चालू आहे, हार्ट ट्रान्सप्लेटेशन चालू आहे पण त्या ग्रुपच रक्त कमी पडलंय. चल मागे आता वेळ दडवू नकोस मी आलो कशासाठी होतो आणि करतो काय आहे? जाऊ दे! पाहू नंतर म्हणून मी "ती" चा विचार झटकला आणि ओपीडीकडे चालू लागलो. बाहेर बघतो तर काय तीच तरुणी, डबडबलेल्या डोळ्यांनी ओपीडी बाहेर होती. आसपास कोणी नव्हत तिच्या अजूनही तिच्या हातची आणि डोळ्याची जखम वाहातच होती. तिला सूद नाही राहिली स्वतःचीच, कदाचित तिची फार जवळची व्यक्ती संकटात आहे. त्याच विचारात घाई गडबडीत आदळली असेल माझ्या गाडीवर... मी काकी सोबत मध्ये आलो. पेशंटच्या बाजूच्याच बेडवर झोपतांना ओझरत नजर उचलून मी पाहिले, एक वयस्क स्त्री होती चेहर्यावर ऑक्सिजन मास्क, मंद लयीत होत असलेला श्वाशोश्वास. काकींनी लगेच स्पिरिटचा बोळा लावून, सुई टोचून, नळी लाऊन त्वरित रक्त पुरवठा सुरु केला आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत जरा जवळ उभ्या राहिल्या, दाबल्या आवाजात म्हणाल्या बर्याच दिवसांनी आलास किती सुकलायेस(!) मी हातात हात घेतला त्यांचा, ओठांनी खोडकर हसत म्हणालो बाहेर उभी ती यांची मुलगी का? वाटेत धडपडली. जरा जाऊन बघता का जास्त लागले का ते. माझा उल्लेख नका करू त्यांच्याशी आणि हो निवांत गप्पा मारून जाणार आहे मी तुमच्याशी. त्यांना माझ्या या स्वभावाच सुरुवातीला प्रश्नच पडायचं. पण जस जस उलघडून अव्यक्त राहू लागलो ते सगळंच माझ्या डोळ्यात वाचून त्यांना समजूनच जायला लागल...
एक नात अजूनही थोड का असेना जुळल होत. हळूच त्या बाहेर गेल्या अधे-मधे मला पाहून जायच्या. ऑपरेशन चांगले २ तास चालले, विना अडथळ्याने. डॉक्टरने त्याचे पूर्ण ज्ञान आणि कौशल्य पणाला लावले जणू... पण बाकी महत्वाची भूमिका माझ्या रक्तगटाला मी स्वतःच देत ओपीडी मधून बाहेर आलो, काकी बाहेरच होत्या त्या तरुणी जवळ बसलेल्या... नजरेच्या कोनातून त्यांनी मला पाहिले, मी दुर्लक्ष करत रिसेप्शन जवळ चालू लागलो, काकींना समजल वाटत जे काय समजायचं ते पाच मिनिटांनी काकी माझ्या समोर होत्या. काही विचारणार तोच, त्या म्हणाल्या वॉर्ड नंबर ३ला शिफ्ट केलंय सौ. जाधव ना, महिनाभर तरी आहे अजून इथेच, वाटल तर बघू शकतोस येउन, तीच नाव प्रांजल घरची परिस्थिती बेताची आहे, वडील लहान असतांनाच अपघातात गेले, त्या मुलीच जे काय होत ते ऑपरेशन मधे गेलं. जे साठवलेले पैसे होते ते आणायला गेली होती, वाटेत बहुतेक तुझ्याच गाडीला धडपडली पण ठीक आहे दोन दिवसात होईल नीट, मी तिला सांगितले नाही तूच तो गाडीमालक ते आता पुढच्या खर्चाच्या चिंतेत आहे, डॉक्टर म्हणाले तस बाकीचे पैसे सावकाश दिले तरी चालतील, पण तुला माहित आहे न किती अवघड होऊन जातं कुणाच असतं-नसतं सगळंच निचडून जातं. हे काय तेव्हाची मी एकटीच बोलत आहे आणि तू नेहमीसारखाच शांततेने ऐकून ओठांनी हसत उभायेस. मी मोकळा हसलो थोडा आणि त्यांना म्हंटले वॉर्ड नं.३ चे बिल माझ्याकडे पाठून द्या, माझ्याकडे असलेल्या पैसा जर कुणाच्या कामात आला तर मला चालेलं. नेहमी सारखच माझ नाव नका येवू देवू कुठे की डॉक्टरांना सांगू (?) काकींनी जरा उसण्या रागानेच पाहिले मला. माझ्या पाठीत एक हलक्या हाताचा धपाटा देत, गप्प रे सांगेल मी आणि करेलही पण एक सांग तुझं नुकसान ज्या व्यक्तीने केलंय, त्या व्यक्तीसाठी का तू हे सगळं करतोयेस(?) मी म्हणालो त्या व्यक्तीला बहुतेक हे नातं अजून काही काळ अथवा कायम हवं आहे. जर ते देयला वरच्याने मला मध्यम बनवलंय तर मी नाही हिरवणार. ओठावर माझ्या पुन्हा तेच खोडकर हसू तरळले. चला जातो मला फोनवर कळवा काय कमी जास्त वगेरे ते...
मी निघालो दवाखान्यातून गाडी सावकाश चालवत घरच्या रस्त्यावर लागलो. मनात विचारांचं वावटळ फेर धरू लागलं होत, डोळ्यासमोर सारखा प्रांजलचा दिनवाणी चेहरा... कसं असतं नाही ज्याच्या जवळ पैसा असतो, त्याला कसलाच जीव घेणा आजार नसतो न कोणी आपल त्याचे मृत्युच्या दारात उभे असते. अन् ज्याच्या जवळ पैसा नसतो, त्याच्याच आयुष्यात दुखः चहोबाजुनी स्वतःच अस्तित्व ठळक करतो. विचारांच्या गर्तेत घरी येउन पोहचलो, लब्बाडही एव्हाना सुस्तावला होता फ्रेश होऊन, आणलेली गाजर धुवून त्याला जवळ घेत सोफ्यावर बसलो. माहित नाही का पण प्रांजलचा चेहरा काही हटायला तयार होत नव्हता. सारख मन म्हणत होत एकदा काकींना फोन करून विचारावं, तिने काही खाल्ले का नाही, वेदना जास्त होत तर नाही, जवळच अस दूरच कोणी या दुखात तरी तिच्या सोबत आले की नाही, मन आणि विचारांनी रडकुंडीला आणून सोडले, त्याच अस्वस्थ अवस्थेत मोबाईल सोबत चाळा करत, करू नाही करू फोन मनात म्हणत, अनपेक्षित उठणार्या वादळी लाटा तुडवत, शेवटी करावाच एक फोन म्हणून फिरवलाच नंबर... काकींचा आवाज ऐकला तेव्हा, अश्रूंचा अडवून ठेवलेला पाऊस मनात घट्ट धरत कापर्या आवाजात प्रांजलची चौकशी केली, जेव्हा त्या म्हणाल्या सगळं ठीक आहे. थोड बळेबळे जेवण खाऊ घालून झोपवलं तिला, तेव्हा जरा हायसं वाटलं माहित नाही मी तिच्याकडे का आकर्षिला गेलो होतो(?) या एका क्षणात मी स्वतःला खूपच एकट अनुभवलं होतं. अश्रूंचा पाऊस डोळ्यातून बेधुंद बरसत होता, झालं-गेलं सगळंच माझ्या जखमा नव्याने कुरतडत होत्या. कि देत होत्या? काहीएक कळत नव्हत पुन्हा एक रात्र कशी सरली माहित नाही(!) एका यंत्राप्रमाणेच सगळं आवरलं नठाळला सोबत घेऊन दवाखान्याच्या दिशेने मी आपणच जाऊ लागलो. माहित नाही ही ओढ कसली होती, जी मला स्वतःकडे ओढत होती...(?) दवाखान्याच्या कार पार्किंगला कार पार्क करून मध्ये जाईल तेव्हढ्यात, प्रांजल बाहेर आली मला आणि माझ्या गाडीला निरखून पाहू लागली जणू रात्रीचा प्रसंग आठवण्याचा प्रयत्नच तिचे डोळे करू लागले, मी लाब्बडला घेऊन खाली उतरलो, माझ्या नजरेच्या मनातले भाव ओळखून कदचीत लब्बाडने तिच्या दिशेला धाव घेतली...जस मला लुभवलं त्याने तशीच प्रांजलला भुरळ घातली, नठाळासोबत कही क्षण रमुनच गेली, मी तिला हसतांना बघत होतो. खर म्हणजे जगतांना बघत होतो. माहित नाही एकदम अचानक लब्बाड तिच्यापासून दूर होऊन माझ्या दिशेला धावत आला. मी खाली वाकून त्याला वर उचलले अन् मी उभ्या जागेवरच खिळून राहिलो. त्याच्या मागे प्रांजलही धावत आलेली भर उजेडात तिला मी बघतच उभा राहिलेलो. अचानक तिने मला आणि नठाळाला ओलांडून गाडीची पाहणी केली. सगळे झरकन तिच्या डोळ्यापुढे आले आणि ती माझ्याकडे पाहू लागली. मी नठाळाला आवरत तिच्या नजरेत नजर मिसळली, अपराधीपणाची भावना जणू तिची नजर झुकली, मलाही अवघडल्या सारख झालं. माझ्या हातातून लब्बाड सुटका करू पाहत होता, मला त्याची ती धडपड पाहवली नाही, म्हणून मी सोडलं त्याला खाली. लागलीच दुडकी मारून तो प्रांजलच्या जवळ पोहचला अन् नंतर तिच्या नाजूक हातात...
लब्बाडाला जवळ घेऊन ती माझ्या जवळ आली, माहित नाही धाडस करून विचारलेच तिनेच, तुम्ही तेच ना ज्यांनी रात्री माझ्या आईला रक्त दिलं आणि ही तुमचीच गाडी ना जिच्यावर मी काल आदळले(?)... नको तेव्हा सुटणारी माझी जीभ अडखडली फक्त 'हो' एव्हढेच माझ्या मुखातून निघाले बाकी मनातच मला वाटलं पाहिले नसेल मला पण पाहिलेच. असो जाऊ दे! म्हणत ती आई म्हणाली तोच शब्द धरत, विषय बदलत मी विचारले, आता कशी आहे आई शुद्धीत आल्या का(?) हो आई ठीक आहे. आता नुकतेच डॉक्टर पाहून गेलेत, सगळ व्यास्थित पार पडले म्हणून मी मंदिरात जायला निघाले तर वाटेत तुम्ही भेटलात... एका नव्या पर्वाची सुरुवात होणार होती का पुन्हा एक वादळ मला पुन्हा उध्वस्त करायला येणार होत(?) मनातले विचार चेहर्यावर न दिसू देता मी अच्छा म्हणालो बाकी काही मुखातून बाहेर फुटेच ना काय बोलावं खरच कळायला मार्ग नव्हता. शेवटी तिनेच विचारले तुमची हरकत नसेल तर तुमच्या ससोबाला नेवू का मी माझ्या बरोबर आता काय बोलाव मी(?) माझी हरकत नाही, त्याला तुमच्याबरोबर यायला आवडले तर खुशाल घेऊन जा. तिने फक्त लब्बाडाच्या डोळ्यात पाहिले आणि काय म्हणावं त्याला लहान लेकरासारखा हात-पाय ताणून आळस दिला त्याने. तुम्ही काकींना भेटून घ्या, आम्ही येतो लगेच म्हणून ती निघून गेली. मी एका कोड्यातून सुटून दुसर्या कोड्यात पडत गेलो. हे माझ्यासोबत नेमक होत काय आहे, मला कळतच नव्हत. तसाच चालत काकींच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. त्या मंद हसत होत्या, मी त्यांच्याकडे पाहिले नाही म्हंटले तरी तुम्ही सांगितलेच ना माझ्याबद्दल तिला सगळे(?) मी वैतागणार हे बहुतेक त्यांनी गृहीतच धरले होते. माझ्या केसातून हात फिरवत म्हणाल्या तू जे बोललास ते काल तिने ऐकले तुझ्या मागेच होती. हं, तुझ नाव विचारल तिने पण नाही सांगितले मी. तर म्हणाली तुलाच विचारेल, रात्री तुझा फोन आला तेव्हा तिच्या जवळच होते. गोड आहे मुलगी आणि सालस पण पसंत आली असेल तर सांग बोलते मी... मी काकींना अडवलं काहीही काय काकी तुम्ही पण असो जावू द्या. बिले देताय का (?) अरे तयार तर होऊ दे पाठवते मग... ठीक आहे म्हणत रूम मध्ये जाऊन प्रांजलच्या आईला एकदा पाहून आलो काकींचा निरोप घेऊन बाहेर निघालो... मनात तस होतच पण मी अजून स्वतःला सावरलं नव्हत कि अजून माझं मन तयार तयार झालं नव्हत... वैतागून मी गाडी जवळ आलो आणि पुन्हा गडबडलो प्रांजल समोरच उभी होती. काय बोलाव, काय नाही मला काहीच सुचेना, बस तिला बघत राहिलो... काही क्षण गेले असतील. माझ हे अस रोखून पाहन तिला अवघडवत असेल, याचा साधा विचारही मी केला नाही, तिनेही हरकत घेतली नाही.. काही क्षण तसेच गेले नठाळाला कुरवाळत ती तशीच उभी होती. जणू काही झालंच नाही. मला तिच्या वेदनांची जाणीव होती म्हणून असेल कदाचित मी खाकरून माझ्या उपस्थितीची जाणीव तिला करून दिली. पापण्यांनी जरा ओशाळत तिने माझ्याकडे पाहिले. इतक्या वेळात पहिल्यांदाच मला तिची संथ नजर प्रेमाची दुथडी भरून वाहणारी नदी वाटली अन् मी माझी तहान भागवणार एक प्रवासी... मी अबोल विचारांच्या गर्तेत आहे हे तिला कळाल वाटत तिने मला हटकले कसला विचार करताय म्हणून मी जरा सटपटलो स्वतःला सावरत कसे बसे तोंडातून शब्द पडले बाहेर सकाळची वेळ आहे चहा आणि नाश्ता घेवू या (?) तिने प्रश्नार्थक नजरेने मला पाहिले मी अजून सावरत थोड धाडस करत पुढे म्हणालो तुमची हरकत नसेल तर...
ती काहीच बोलली नाही, मलाही अजून आग्रह करावा वाटले नाही, शून्यात येवून मिळालो पुन्हा. उगाच खोटी स्वप्ने का म्हणून रंगवायची, खिशातून माझं कार्ड काढत तिच्यासमोर धरले, काही गरज वाटली तर निसंकोच मागा एव्हढंच बोललो आणि कार्ड घेईल ती म्हणून वाट पाहू लागलो.. कार्ड घेता-घेता फक्त एव्हढेच विचारले तिने, तुमची हरकत नसेल तर तुमचा ससोबा राहू देवू माझ्या जवळ(...) मला पुन्हा एकटेपणाचा तोच थंड वारा अलगद स्पर्शून गेला, ज्यात मी माझं सुख पाहत असतो तेच माझ्याकडून कोणी ना कोणी मागून घेतं... हरकत नाही म्हणत, मनातलं वादळ मनातच ठेवत, मी आल्या पावली पुन्हा माघारी फिरलो मनातून सगळं काढत पुन्हा स्वतःला कामात झोकून दिले. कामाचा स्वतःभोवती एक कवच बनवून घेतले. दुपार झाली, कासवाच्या गतीने संध्याकाळी चालून आली. ऑफिस मधले सगळे आपापली कामे आटोपून घराकडे निघाली. मी अजूनही ऑफिस मधेच, माझंच ऑफिस, माझाच व्यवसाय, माझाच व्याप रात्रीचे साडेआठ वाजले असतील. मी अजून थांबलोय म्हणून पिऊन पण थांबलेला, घरी जायला तोही आतुरला असेल. मी गेल्यावर सगळ बंद करून तोच जातो. मला त्याची जाणीव होती तरी हातातली कामे बाजूला करायला मला ९ वाजले आणि निघालो घरी जायला... वाटेतही काही बदल मला जाणवला नाही. घराच्या पार्किंग मध्ये कार पार्क करता करता आठवलं अरेरे कार गॅरेजला द्यायची राहिली, बेढब दिसत आहे. काय करावं म्हणून मॅक्यानिकला फोन करून उद्या गाडी घेऊन जा आणि मला ती सुधरे पर्यंत मालकाची गाडी देऊन जा. माझी काम अडकून राहतील नाहीतर. चालेल म्हणत उद्या सकाळी येतो, म्हणून बोलणेही आटोपले. आता काय करावं म्हणत मी ब्लॉकचे लॉक उघडून मध्ये आलो, फ्रेश होवून बेडवर पडून राहिलो. एकटाच आज ना उद्या एकट राहावच लागणार आहे. लब्बाड शिवायही काहीही केलंस तरी तुझ्याजवळ तुला स्वतःचा सहवास देणारे फार थोडेच दिवस राहतात, मग उरतात त्यांच्या आठवणीच. स्वतःशीच बोलत मी किचन मध्ये आलो... काल आणलेल्या दोन किलो गाजरांच काय करावं आता म्हणत किसून हलवा बनवण्याचा निर्णय घेतला. काही नाहीपेक्षा तेव्हढेच थोडी उद्या पर्वासाठी राखून ठेवत, बाकीच्या गाजराचा हलवा मंद आचेवर शिजायला लागला. पूर्ण झाल्यावर थोड खावून, बाकीचा फ्रिजच्या पोटात साठवत ठेवत झोपेची आराधना माझी चालू झाली... आणि आज झोपेने चक्क लवकर मला मिठी मारली...
उठायला जर उशीरच झाला. माहित नाही का नेहमीची सवय असूनही माझी झोप लवकर उघडली नाही. घड्याळ पाहतो तर १० वाजायला आले होते, एव्हाना मी ऑफिससाठी निघायला हवे तर बिछान्यावरूनही उठलो नव्हतो.. दाराच्या बेलवर कोणी तरी फार वैतागून बोट दाबून ठेवले होते.. कसेबसे डोळे चोळत झापडा उघडत दर उघडले तर मॅक्यानिक वैतागल्यासारखा मला बघत राहिला. काय साहेब एक तासापासून बेल वाजवतोय, कस बस त्याचा त्रागा सहन करत माझ्या गाडीची चावी त्याला देऊन त्याच्या कडून गाडीची चावी घेत कटवलं. मला अजून झोप घ्यायची होती. दार लाऊन मी पुन्हा बेडवर जाऊन पडलो होतो कि मोबाईल वाजू लागला काय कटकट आहे म्हणत मी कुणाचा फोन, कोण बोलतंय न बघता सरळ उचलून कानाला लावत म्हणालो राँग नंबर. पलीकडचा काय म्हणाला माहित नाही मी पुन्हा झोपेच्या अधीन होवू लागलो तर पुन्हा फोन आता झोप माझी पूर्ण उडाली. खूप झोप येत असलेल्या व्यक्तीला सारखा सारखा त्रास देवून ज्या चिडक्या अवस्थेत समोरचा ओळखीचा व्यक्ती पोहचवतो त्या अवस्थेत मी पोहचलो होतो. जरा वैतागतच मी हॅल्लो म्हणालो अन् काय आपल्या अस्तित्वाची आणि वेळेची जाणीव होवून दोघांची एकच गाठ पडावी तशीच माझी अवस्था झाली. महत्वाची मिटिंग होती म्हणून काल उशिरा पर्यंत ऑफिसमध्ये आजची तयारी करत थांबलेलो आणि ऑफिस मध्ये सगळा स्टाफ माझी वाट बघत थांबलेला. अर्ध्यातासात येतो म्हणत मी माझं आवरायला लागलो आणि पळतच निघालो... दार उघडण्याची आणि दारात लब्बाडासोबत प्रांजल येऊन उभी राहण्याची एकच गाठ झाली... मला जरा आश्चर्य वाटलं पण मनात शंका कुशंकांनी थैमान मांडले. दारातून बाजूला सरकत मी दोघांना मध्ये घेतलं सोफ्यावर बसवत पाणी आणि लब्बाडच गाजर आणायला किचन मध्ये गेलो... प्रांजलला पाणी आणि तिच्याच हातात लब्बाडसाठी गाजर देवून तिच्या समोर बसलो.. तिला विचारले काय झाले सगळे ठीक ना? ती फक्त "हो" म्हणाली आणि लाब्बडला गाजर भरवत राहिली.. अजून काय विचारावं म्हणत तुम्ही काही खाल्ले का विचारलं(?) तिने फक्त नकारार्थी मान हलवली. मी पुन्हा किचन मध्ये जावून रात्री बनवलेला हलवा गरम करून डिश मध्ये तिला आणून दिला, तिला देतांना म्हणालो, माफ करा काल रात्री बनवलेला आहे, तुम्हाला चालेल ना.. तिने उलट विचारलं न चालायला काय त्यात(?) माझी बोलतीच बंद(!) मी मुकाट्याने डिश दिली, तिने पहिलाच घास खावून त्याचा आस्वाद घेत, माझ्याकडे पाहत बोलली. मी आजवर असा हलवा कुठेही नाही खाल्ला. कोणी बनवला(?) कुक आहे का(?) मी हसलो बनवला तसा मीच आहे. बस चांगला पहिल्यांदा झालाय, तीपण ओठात मंद हसली, अजून काही बोलणार तेव्हढ्यात पुन्हा माझा मोबाईल वाजू लागला. मी प्रांजालला सॉरी दोन मिनिट हां म्हणत बरच स्वस्थ राहत, मी ऑफिस मधून आलेला माझ्या मॅनेजरचा फोन उचलला. त्रागा तसाही त्याचा झाला होता, कारण सगळ्यात आधी ऑफिस मध्ये पिवून पाठोपाठ मी येतो, पण आज माझाच पत्ता नाही, म्हणून सगळे हैराण झालेले. तरी मला त्याच काही एक वाटल नाही. त्यांना सगळंच ठरलेलं काल सांगितले होते. रिपोर्टही तयारच झालेला त्यांना जे आपलं ठरले आहे ते पटले तर डील फायनल करायला सांगितले. नाही तर जावू द्या म्हंटले काही एक फरक पडत नाही. त्यांचा वेळ खावू नका. सगळे प्रेझेंट करा, बाकी हो नाही तेव्हढे कळवा मला मी आज येणार नाही. आलो तर दुपार नंतर खात्री नाही "ठीक आहे" म्हणत फोन ठेवला...
स्वस्थ बसत पुन्हा प्रांजलकडे एकवार नजर उचलून पहिले, पांढर्या शुभ्र पंजाबी ड्रेस मध्ये अगदी परीसारखीच दिसत होती, त्या एका नजरेत मला तिला जितके डोळ्यात साठवता आले मी साठवून घेतले.. माझं बोलन तिने ऐकले वाटत मला म्हणाली काही महत्वाचे काम असेल तर जा तुम्ही मी नंतर येते(?) मी म्हणालो तुमच्या इतक अजून दुसर कोणत महत्वाच काम नाही (!) ते जाऊ दे, तुझी तब्बेत काय म्हणते फार दुखत आहे का(?) नाही फार नाही.. बरं... हलवा खात माझ्या घराच निरीक्षण ती करू लागली फार मोठ नव्हत माझ घर, पण एकट्या पुरता बरच मोठ होत... तिने माझ्याकडे चोरटे बघत विचारले. हे घरपण तुम्ही सजवलंय(?) हो आठवड्याच्या सुट्टीत मिळायचा तेव्हढा वेळ गेला घर सजवण्यात. ति "छान" येव्हढेच उदगारली. मी विचारले प्रांजलला तुम्ही किती दिवस सुट्ट्या टाकल्या आहेत(?) आठ दिवसाच्या टाकल्या आहेत, आई पण आता बरी आहे, तुमच्यामुळे सगळे नीट लक्ष देत आहेत(!) माझ्यामुळे अस काही नाही. चांगल्या लोकांकडे चांगली लोकं देतातच लक्ष.. आणि दवाखाना सोडून तुम्ही इकडे कसे(?) काल सकाळी गेलात तेव्हा वाटलं संध्याकाळी याल, वाट पाहत होते पण आला नाहीत, म्हंटले काकींना फोन तरी केला असेल तुम्ही पण तोही नव्हता, तुमचा ससोबाही तुम्ही गेल्यावर शांत झाला, वाटल मी तुमच्या दोघांच्या मध्ये तर आले नाही म्हणून याला परत सोडायला आले आणि तुमच जे काय नुकसान मी केलंय अन् जो दवाखान्याचा तुम्ही खर्च करताय मी थोडा थोडा करत परत करेल एव्हढेच बोलायला आले होते, मी बरं म्हंटले.. कुठे जॉब करता (?) काय शिकला आहात(?) सिएकडे आहे अकौंटंट म्हणून एम.बी.ए. करायचं होत पण परिस्थिती नव्हती म्हणून जॉबच करायला लागली त्यात आईला हा आजार... हम्म ठीक आहे! चहा घ्याल का सरबत (?) चहा चालेल(!) तुमची हरकत नसेल तर मी बनवू (?) हो म्हणालो असतो, पण घरी आलेल्या पाहुण्याला काम सांगाव मला नाही पटत आणि तसेही कुठली गोष्ट कुठे, हे पण तुम्हाला माहित नसणार म्हणून हवे तर किचन मध्ये येवून बसू शकता. पण चहा तेव्हढा मीच बनवतो. माझ्या या उत्तरावर ओठात मंद हसत राहिली, मी तिच्या पुढ्यातली डिश उचलून किचन मध्ये आलो माझ्या मागे ती नाही म्हंटले तरी छोटा दोन लोकांपुरता डायनिंग मी बनवला होता. तिथल्याच खुर्चीवर ती बसली स्वतःच, पाणी हवं का अजून विचारले ती नाही म्हणाली म्हणून मी माझा मोर्चा चहाकडे वळवला. नाही म्हंटले तरी कुणाच्या उपस्थितीमुळे मलाही जरा अवघडल्या सारखेच होत होते. तरी मन नियंत्रित ठेवत मी चहा बनवला, प्रांजलची नजर एका क्षणासाठीपण माझ्यावरून हटली नव्हती. माझी प्रत्येक हालचाल तिची नजर टिपत होती. ट्रे मध्ये दोन कप ठेऊन, दोन्ही कपात चहा ओतून, एका डिश मध्ये थोडी बिस्किटे काढून मी तो ट्रे घेऊन प्रांजल बसलेल्या डायनिंग टेबलवर ठेवला. एक कप तिला देवून बिस्किटांची डिश पण जवळच ठेवली संकोच न करता घ्या. हवे तर अजून मागा तिच्या पुढच्या खुर्चीत मी स्वस्थ बसत चहाचा कप उचलला तिने बिस्किटांची डिश माझ्या समोर धरली आणि म्हणाली न संकोचता घ्या(!) मी मुकाट्याने दोन बिस्किटे घेतली लब्बाडही मस्तीच्या मूड मध्ये येऊन आमच्या दोघांमध्ये घुटमळू लागला, मी प्रांजलला विचारले चहा बरा झालाय ना.. तिने फक्त एक "हुं" हुंकार दिला नादमय अगदी माझ्या मनाला झंकारून सोडणारा...
प्रांजलला सोडायला म्हणून लब्बाडही आला होता. दवाखान्याचे सोपस्कार पार पाडत मी प्रांजलचा निरोप घेतला. माहित नाही का पण बैचेनी वाढली होती, झाले गेले प्रसंग नकळत पुन्हा डोळ्यासमोर फेर धरू लागले. अनामिक रितेपणा पुन्हा मनाला जाणवू लागला, तश्याच जड झालेल्या पावलांनी मी पुन्हा परतीचा मार्ग धरला. दोन दिवस झाले, आठ दिवस झाले एक फोन करून काकींकडून प्रांजलच्या आईची चौकशी केली, अधून-मधून जावून भेटायची इच्छा व्हायची, पण का कुणास ठावूक माझी चौकट आडवी यायची...दिवसामागून दिवस बरेच संथतेने गेले, गेल्या दिवसांसारखे झाले-गेले प्रसंगही मनातून निघून आठवणी बनून गेले. पुन्हा मी माझ्या चौकटीत लबाडासोबत. महिना झाला असेल-नसेल काकींनी मला फोन केला, प्रांजलच्या आईला आज डिस्चार्ज मिळतोय येतोयेस का भेटायला(?) काही क्षण शांतच झालो, नजरेसमोर पुन्हा प्रांजलचा चेहरा उमटला, तिचे अत्यंत वाईट प्रसंगातही कोसळून सावरणं, अन् चेहरा लपवत आपल्या वेदना दडवणं, लगेच येतो म्हणत मी लब्बाडला सोबत घेऊन जायला निघालो, लब्बाडही खुश, प्रसन्न वाटला, कि हे सगळे माझ्या खुळ्या मनाचे खुळे विचार(?) आज कदाचित प्रांजलला शेवटचंच पाहणार वाटत आपणं(!) मनात कुठेतरी नको तो विचार चुकचुकला, स्वतःला नियंत्रित ठेवत मी दवाखान्यात पोहचलो. लब्बाडला अलगत हातात उचलून मध्ये आलो, आवरा-आवरी होऊन निघायची तयारी झालेली दोघांची, मला आणि लब्बाडला वॉर्ड मध्ये आलेले पाहून आश्चर्य अन् अनपेक्षित प्रसन्नता दोघींच्या चेहर्यावर उमटली, प्रांजलकडे मुद्दाम दुर्लक्ष करत मी तिच्या आईसोबत तब्बेतीची विचारपूस केली, एव्हाना लब्बाड माझ्या हातातून स्वतःला सोडवून प्रांजलकडे गेलेला, कसे जाणार विचारले तर रिक्षाने जावू म्हणाल्या मी म्हंटले मी सोडून देवू का(?) त्या थोड्या अवघडल्या प्रांजलकडे एकदा पाहिले त्यांनी पण ती लब्बाड मध्ये गुंतून गेलेली, तिला हसतांना, खेळतांना त्या बघतच राहिल्या, नाही म्हंटले तरी मीही गुंतलेलो पण लवकर सावरलो. काही एक ऐकून न घेता, त्यांनीही जास्त आढेवेढे न घेता, मी घरी सोडलेलं चालेल हे काबुल केलं, घरी घ्यावयाच्या औषधी, पथ्य या सार्या गोष्टींचे सोपस्कार पार पाडत दवाखान्यातून घरी सोडायला निघालो... गाडीच्या मागच्या सीटवर प्रांजलच्या आईला नीट आरामात बसवलं, उरलं-सुरलं समान गाडीच्या डिक्कीत ठेवलं, ड्रायव्हिंगला येवून बसलो तर प्रांजल लब्बाडला घेऊन माझ्या पलीकडल्या दारा बाहेर घुटमळू लागली, कदाचित पुढे बसावं की मागे या विवंचनेत ती सापडली की, ज्या गाडीच नुकसान आपण केलंय त्याच गाडीतून प्रवास कसा करावा या विचारात, माझे दोन्ही विचार इथे हाणून पडलेत. खाली झुकून मला म्हणाली दार उघडता का तुमचा ससोबा एकाहाताने आवरला नाही जात माझ्याकडून, माझा धांदरट स्वभाव दाराच सेफ्टी लॉक न काढताच कुंडीशी झगडू लागलो, शेवटी न राहवून स्वतःला नियंत्रित ठेवत एकदाच दार उघडल, ती बसली मध्ये तिच्या कडून लब्बाडला घेत म्हणालो दार लावून घ्या आणि काचही वर चढवून घ्या, नाही तर हा बाहेर उडी मारू पाहतो.. तिने ओठंनी मंद स्मित केलं, जरा संथ गाडी चालवत बर्याच गल्ल्या मागे टाकत, मुख्य शहराच्या बाहेर, आड मार्गावर असलेल्या एका मध्यम वर्गीय चाळीत माझी गाडी शिरली, चाळ इतकीही वाईट नव्हती, बरी होती एका बाजूला माझी गाडी पार्क केली, प्रांजलच्या आईला आधार देत घरापर्यंत पोहचवले, लब्बाडला प्रांजलने तिच्या आईजवळ सोडत माझ्या गाडीत ठेवलेले समान घरात नेवू लागली, एकवार गाडीत पुन्हा काही राहीलं तर नाही मी खात्री करून घेतली. नाही काही स्वतःशीच म्हणालो, माझं इथे अजून थांबण्यासारखे काही उरले नाही, हे जणू लब्बाडला कळले असावे मस्तीतली दुडकी मारून जणू प्रांजलला चिडवत लब्बाड बाहेर माझ्या जवळ धावत आला. मी त्याला जवळ घेत कुजबुजलो घेतलास निरोप चल मग आता जावू परत, त्याने मान फिरवली, मी उसनेच हसत त्याला घेवून गाडीच दार उघडलं, शेजारच्या सीटवर काही क्षणांपूर्वी प्रांजल बसली होती तिथेच लब्बाडला ठेवलं आणि गाडीला सेल मारला.. गाडी सुरु होण्याचा आवाज ऐकून प्रांजल धावतच बाहेर आली, तोवर माझ्या गाडीने यु टर्न घेतला होता अन् प्रांजलचे घर मागे टाकत, एक क्षण एका क्षणात पुन्हा मला एकाकी करत, त्याच माझ्या ओसाड रस्त्यावर मला घेवून गेला होता... मला माहित नाही का पण आभाराचे ऋण नको होते ना मला परोपकाराच्या भावना तिच्या डोळ्यात पहायच्या होत्या...
दिवस हल्ली जरा जास्तच भरभराट करत होते, कामाचा व्याप वाढवत होते, व्यवसाय वृद्धीस यायला लागला, बाजारपेठेत चांगला जम बसला, काही दिवस चांगले, काही वाईट चालूच असतात, परंतु आता आलेला कामाचा ओघ वाढतच चाललेला, कामाचा हा अति ओघ जेव्हा नकोसा झाला, तेव्हा दूर कुठे तरी निघून जावं प्रकर्षाने एकांत नाही, शांतता हवी होती. निवांत स्वस्थ जगावस वाटत होतं, आठ दिवसासाठी कुठे लांब जावं, आजचा दिवस कसा बसा ढकलून मी आठ दिवसासाठी गायब होयच ठरवलं. मॅनेजरला आवश्यक त्या सूचना देवून मी ऑफिस मध्ये कामाचा त्या दिवसाचा निरोप घेतला. लब्बाडही कदाचित वैतागला होता या माणसांच्या जंगलाला... संध्याकाळी त्याच्यासाठी काही तरी न्याव आज वेगळं सो बाजारात रॅब्बीट्स फूडचा चांगला शोध घेवून विकत घेतले, आठ दिवस बाहेर जायचे सो थोडी लागतील तेव्हढ्या वस्तूंची आणि हवाबंद डब्यातल्या जेवणाची खरेदी करणे आवश्यक होते. सगळं आटोपून मी घरी आलो, फ्रेश होऊन लब्बाडला त्रास देत सामानाची बांधाबांध केली, हे झाल्यावर भूक लागलीये याची जाणीव होवून काही तरी खायला बनवायला हवंय पण लागलेली भूक काही काळ नियंत्रणात राहावी म्हणून आधी पाण्याने पोट भरलं, आता काय बनवावं विचारात होतो तर पोहे करूया म्हणून काढून ठेवले तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली, माझ्याकडे सहसा कोणी येत नाही कोण आलंय बघूया म्हणत मी जावू लागलो, पण लब्बाड मध्येच दुडकी मारून त्याच्या मस्तीच्या मूडमध्ये माझ्या पुढे धावला. उगाच खोट दटावत त्याला मी दार उघडल तर दारात प्रांजल आणि तिची आई. दारातून मी बाजूला हटताच लब्बाड दुडकत प्रांजलकडे झेपावला. मी त्या दोघांचा तो भेटीचा अन् ओळख असल्याचा सोहळा बघतच राहिलो, एखाद लेकरू आईच्या मिठीत शांत पडून राहावं तसा लब्बाड तिच्या मिठीत विसावला होता.. मी त्यांना तसच मोकळ सोडून थोडा मागे झालो, मुक्या प्राण्याच प्रेमही अजबच असतं, निस्सीम, निर्मळ स्वार्थाचा कुठेही लवलेश नसतो... प्रांजलच्या आई सोबत बोलत तब्बेतीची विचारपूस केली प्रकृती अगदी उत्तम आहे. म्हणाल्या त्यांना सोफ्यावर बसयला लावलं.. नकळत माझी नजर पुन्हा प्रांजलकडे स्थिरावली खूप तरसली होती वाटत लब्बाडला भेटायला तिच्या डोळ्यातून बरसणारी श्रावण सर सांगत होती, मला कसकसच झालं म्हणून मी माझी नजर तिच्यापासून दूर हटवली माहित नाही का(?) माझंही आभाळ दाटून आलं होत, कुठेतरी मला जाणवलं होत मी लब्बाडला प्रांजल पासून दूर करून चुकीच केल आहे. एक शल्य माझं मलाच मी दिलं होत, आज ते स्वतःच गळून गेल्यावर माझ्या मनातून एक ओझं उतरून गेलं होत. पाणी घेवून येतो म्हणत मी किचनच्या दिशेने जावू लागलो तर प्रांजलने मला अडवलं, दटावलं अन् गपचूप सोफ्यावर बसायला सांगितलं. माहित नाही का मी तीच ऐकलं आणि मुकाट तिने सांगितल्याप्रमाणे शांत बसून राहिलो, लब्बाडला घेवून तिने तिचा मोर्चा किचनकडे वळवला, क्षणभर येवून तिच्या आईच्या हातातली पिशवी घेवून गेली आणि परत माझ्या समोर येऊन उभी राहिली, क्षणभर बघतच राहिली मी गप्प, मुकाट, शांत माझ्याच घरात बसलो होतो, थोडासा हुकुमी आवाज चढवत मला तिने विचारले एक्स्ट्रा डिशेश, वाट्या, चमचे आणि ग्लास कुठे आहेत... मी जरा संकोचलो तिच्या नजरेत धाडसाने नजर मिळवत मी म्हणालो येवून काढून देऊ का(?) तिने रागाने पाहिले, मी गप्प होत सांगितले किचन ओट्याच्या खाली असलेल्या रॅक्स उघडाल तर हव्या असलेल्या सगळ्या वस्तू मिळतील. येव्हढ बोलून मी गप्प झालो. ती आल्या पावली परत गेली... खर्या अर्थाने भित्रा ससा मीच आहे अस मला वाटून गेलं...
पाच दहा मिनिटा नंतर जेवणाची ताट वाढून आणली तिने, मी आपला मुकाट बसलो मनात तर वादळ उठलं होतं. पण समोर असलेलं लहरी वादळ जरा जास्त खवळलं होत. उगाच विध्वस्त नव्हते व्हायचे मला म्हणून गप्प, मुकाट ताटात वाढलेलं गिळून घेतलं. खर म्हणजे प्रत्येक दाण्याला तृप्तीची ढेकर द्यावी अशी चव होती, पण त्याच श्रेय प्रांजलच्या आईलाच मी देऊन टाकलं, एक जळजळीत कटाक्ष माझी वाटच पाहत होता. मीही त्याला अजून तरसवले नाही नजरेला करायचा तो घाव मी करवून घेतला. त्या आघातातच लहरत, बहरत मी सुखावत होतो. जेवणानंतर किचन आवरून लब्बाडला घेवून स्वस्थ बसत प्रांजलने बोलायला सुरुवात केली, पोहे बनवत होतात.. मी फक्त होकारार्थी नंदी बैला सारखी मन डोलवली, आणि समान बांधलाय कुठे जायची तयारी? मी सटपटलो. तरी उगाच लब्बाडकडे बघत काही नाही लब्बाडला सोडायला, त्याच्या घरी जंगलात. मी नजर उचलून पाहिलेच नाही. मला माहित होत डोळे पाणावले असतील आणि माझ्या बद्दल घृणा अजून दाटून आली असेल, तरी स्वतःला थोड नियंत्रित ठेवत ती बोललीच स्वतःचे मन भरले म्हणून दूर करत आहात का(?) जर दूरच करायचं होतं तर जवळ तरी का केले तुम्ही(?) परतच नेवून सोडायचं होत तर सोबत आणलेच का(?) प्रांजलच्या अवताराने मी आणि प्रांजलची आई दोघेही स्तब्धच झालो. तिची ही प्रतिक्रिया मला खरोखरच अनपेक्षित होती, मी काही न बोलता शांत राहायचा निर्णय घेतला. मनात थैमान घालणार वादळ आज मुकाट शांत होवू द्याव. जितक त्याला छेडू तितका तो विध्वंस करेल म्हणून गप्प मुकाट कुठल्याच प्रश्नाला काही एक उत्तर न देता बस ऐकत राहिलो. हलक्याच आवाजात आईंना औषधाच्या गोळ्यांची विचारणा केली, पण नाही काही म्हणत बस गप्पच आम्ही तिघेही. एकमेकांपासून रात्र तिचे गडद सावट आणखी दाट करू लागली. दिवसभर राबलेले माझे शरीरही बंड करू लागले एव्हाना त्या दोघींची अवस्थाही फार काही वेगळी नव्हती. इतक्या रात्रीच जाने बरे दिसत नाही, तुम्ही दोघी आतल्या खोलीत आराम करा. सकाळी सावकाश सोडून देईल मी तुम्हाला...त्यांना जरा ओशाळल्या सारखं झालं. तरी मन घट्ट करत त्या दोघी आतल्या खोलीत गेल्या, मी मेन डोअर लॉक केले. किचन मध्ये जावून पाणी प्यालो, प्रखर लाईट घालवून मंद लाईट लावले आणि पुन्हा होतो त्याच सोफ्यावर अडवा झालो, झोपायची तशी आवश्यकता मला नव्हती. बस जड झालेलं शरीर जरा सैल करायला पडायचं होतं..
आज पहिल्यांदा माझ्या रिकाम्या घरात कोणी तरी स्वतः हक्काने माझं हे घर आपलं समजून या घरात वावरलं, दोन घास स्वतः कमी खावून मला जास्त भरवलं, चुकलो तिथे मला दटावलं, चिडलं, रडरड रडलंही... पण का याच उत्तर मला शोधूनही सापडत नव्हतं, विचारांच्या गर्तेत हरवून गेलो, कुठे जावू, कुणाला विचारू, काहीकाहीच कळत नव्हतं. या कुशीवरून त्या कुशीवर माझी चुळबूळ चालू होती. हलकेच दार उघडल्याचा आवाज आणि दबल्या पाऊलांची चाहूल माझ्या कानांनी टिपली. माझ्या पासून थोड दूर उभ राहत क्षणभर माझ्याकडे बघत उभ राहीलं. काही क्षण तसच गुंतून बघत एक हलका हुंदका ओठातून बाहेर काढत आल्या पाऊली परत गेलं, ती प्रांजलच होती, तिला जातांना मी पाठमोरं पाहिले अडवावे वाटले पण का कुणास ठावूक मी स्वतःला अडवले, रात्री मग कधी झोप लागली मला कळले नाही. पाहटे नेहमीची सातला मोडणारी झोप अगदी वेळेवर मोडली. उठून बसलो सोफ्यावर तर माझ्या उठण्याची वाट बघत असलेला लब्बाड टुणकन उडी मारून माझ्या मिठीत आला, त्याला कुरवाळत मी त्याला सोफ्यावर ठेवलं. आता आवरायचं कस बघू जरा वेळाने म्हणत मी स्वस्थ बसून राहिलो. काही क्षण गेले असतील, मोकळ्या केसांचा भार सांभाळत प्रांजल माझ्या नजरेसमोर आली, ओठांनी मंद हसत, लब्बाडकडे बघत होती, झोप नीट आली ना तुम्हाला नी आईंना? ती हो म्हणाली तिच्या उत्तरा पाठोपाठ प्रांजलची आईपण येवून बसल्या. आवरलं तुमच बसा म्हणत मी जावून माझं आवरलं सगळं, तयार होवून सामानाची बॅग आवरत मी बाहेर आलो, चला तुम्हाला वाटेत घरी सोडून मी पुढे जातो, फिरायला निघालोय लब्बाडला घेवून, एक आठ दिवसात येईल परत, त्या दोघी काहीच बोलल्या नाही. मला वाटल मी जास्तच बोललो म्हणून गप्पच झालो, वाटेतही कुणीच कुणाशी काही बोलले नाही. प्रांजल लब्बाडला घट्ट धरून बसली होती, "एखादा प्रवास जणू लवकर संपला. जो कधीच संपू नये अस वाटतं असतं." अशीच अवस्था काहीशी प्रांजलची झाली होती. घर आलं याची तिला जाणीव नव्हती, शेवटी प्रांजालच्या आईने टोकलं तेव्हा काहीशी चाचपडत ती भानावर आली. माझ्याकडे न पाहता आलाच आहात तर घरात येवून चहा नाश्ता घेवून जा. मी नको म्हणायला माझं तोंड उघडत होतो, पण तोवर माझं बोलन ऐकून न घेता प्रांजल दार उघडून लब्बाडला सोबत घेवून घरात गेलीही. स्वतःशीच हसत मी गाडी फिरवून, जरा साईडला उभी करून प्रांजलच्या घरात प्रवेश केला. ही माझी पहिलीच वेळ होती तिच्या घरात यायची. वैभव जरी थोडफार असलं तरी ते एक घर होत दोन माणसांनी एकमेकांसाठी उभारलेलं, माझ्या घरापेक्षा मला इथे अगदी मोकळ वाटून गेलं, मनात उठलेली वादळ इथेच येवून शांत होवून गेलं... लब्बाडही प्रांजलच्या मागे पुढेच घुटमळू लागला. मला हवं काय आहे? या प्रश्नाच उत्तर खर्या अर्थाने मला मिळालं. मला एक घर हवं होत, मला माझी माणस हवी होती, मला प्रेमाचा आणि मायेचा एक पदर हवा होता, कुशीत निश्चिंत निजायला एक कुशी माझ्या हक्काची मला हवी होती, निस्सीम प्रेमानी भरलेलं आभाळ मला हवं होत जे मी पैशाने कधीच कुणाकडून विकत घेवू शकत नाही, भिक म्हणून कुणाकडून मागू शकत नाही, दान म्हणून दानपात्र मी पसरू शकत नाही, माझ्या सोबत जगायला, मला सोबत म्हणून जागवायला, "जगण्यात मजा आहे.." म्हणत सुखात असणार्या जगाला मी आपलेसे त्याच्या इच्छेविरुद्ध करूही शकत नाही ना काही बोलूही शकत नाही, होता होईल तितका वेळ मला त्या वातावरणात त्या घरात राहायचं होतं. मला खरच माझ्या मनासारखं जगायचं होत, पण म्हणतात ना काही काही गोष्टी नशिबातच लिहिलेल्या असाव्या लागतात, या गोष्टींचा हट्ट कुणाकडेच काय स्वतःकडेही आपण करू शकत नाही... बस हतबद्ध, आशाळभूत, केविलवाणे त्या गोष्टीसाठी फक्त तरसू शकतो बाकी काहीही नाही काहीच नाही...
उपम्यानी भरलेली प्लेट आणि पाण्याचा ग्लास माझ्या समोर ठेवत, प्रांजल तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी आणत समोरच्या खुर्चीवर बसली. लब्बाड तिच्या पायाशी घुटमळत खेळत होता, प्रांजलच्या घरात तिच्या हातचा बनलेला उपमा, तिच्याच घरात आस्वाद घेतांना जाणवलेली संतुष्टी आणि तृप्ती काही औरच.. पाण्याचा ग्लास उचलत मी डिश बाजूला ठेवली.. मला बोलायचं होतं काही, तिने बनवलेल्या उपम्याची तोंडभरून स्तुती करायची होती, अजून असेल तर मागायचा होता पण मनातलं मनातच, आज ते डोळ्यातूनही व्यक्त नाही झाले अन् चेहर्यातूनही. यंत्राप्रमाणेच मी वागत होतो, नाश्त्या नंतर चहाचेही सोपस्कार आटोपले. नाही म्हणत माझी पुन्हा जाण्याची वेळ झाली. का कुणास ठावूक लब्बाड प्रांजलच्या मागे दडी मारून बसला, जणू मी त्याला बळजबरी नेईल की काय अशी भीती त्याला वाटून गेली. दारा जवळ जावून क्षणभर त्याला वळून पाहिलं पण तो अजूनच मागे जावून लपला, अनायासे दाराजवळ जाताच टुणकन उडी मारून येणारा आज माझ्यापासून लपत होता, मला बहुतेक एकट्यालाच जावे लागणार तर मनातच म्हणत मी दारा बाहेर आलो... एकाकी आजूबाजूला आधार शोधत, पुन्हा जड झाल्या पाऊलांनी, मनाचा हिय्या करून चालायला लागलो, गाडीच दार उघडत सेल देत क्षणभर प्रांजलच्या दाराकडे पाहिलं. लब्बाडला धरून प्रांजल दारात उभी होती, तिच्या नंतर लब्बाडवर माझी नजर जाताच त्याने मान फिरवली. माहित नाही का(?) रिव्हर्स गेअर टाकत मीही वेगाने गाडी मागे घेत मागच्या मागेच निघून गेलो पुन्हा वळून न पाहता...
पुन्हा एकाकी त्याच जंगलात मी सुसाट निघालो. माणसाचं जंगल तुडवून जनावरांच्या साम्राज्यात आलो. हिरवा निसर्ग भोवतीने फेर धरत गारव्याने शहारून गेलो.. माझा मी पुन्हा मला शोधत राहिलो. का, कशाला, का म्हणून माहित नाही. माझ्या शरीरातून एखाद अवयव गळून पाडाव अन् त्यातून निघणार्या जीवघेण्या कळा आक्रंदून याव्यात, अशी अवस्था माझी झाली, डोळ्यांना न दिसणारी एक खोल जखम पुन्हा माझ्या मनावर झाली. काहीही एक न बघता मी धावत सुटलो वेगाने, होते नव्हते सगळे बळ एकवटून पाय दुखेपर्यंत धावत सुटलो. शेवटी पायांनीही साथ सोडली तेव्हा स्वतःला मातीच्या कुशीत झोकून दिले. डोळे वाहत होते. पूर्ण शरीर वेदनेने ठणकत होते, त्याच अवस्थेत किती वेळ होतो मला कळले नाही. माझी शुद्ध गेली होती की काय झालं आठवत नाही. माझे डोळे मिटून गेले. पुन्हा उघडले तेव्हा उष्मा जाणवू लागला होता. घामाने चिंब भिजलो होतो, डोक्यावर तळपणारा नारायण मला त्रास देत होता. त्राण गेलेल्या माझ्या शरीरात वेदनांना ओठातच सहन करत, वेडवाकड तोंड करत उठून बसलो. तेव्हा अंदाज घेतला, असा मी किती दूर पळत आलो आणि कुठून आलो(?) माझ्या कानांनी जवळूनच वाहणार्या पाण्याचा हसरा खळखळाट टिपला. स्वतःला सावरत, धडपडत नाहीच झाले, म्हणून अक्षरशः रांघत पाण्याच्या पात्रापर्यंत गेलो. स्वतःला त्या डोहात पूर्णच बुडवून घेतलं. त्या गार पाण्याने शरीराच्या वेदना जरा कमी झाल्या. एक तरतरीच पुन्हा शरीरात जाणवली. डोक्यापासून स्वताला पूर्ण ओलतं करत एक सूर मारून पाण्याबाहेर आलो. एव्हाना पुन्हा माझी बुद्धी कुठल्या दिशेने पळत आलो, याचा मागोवा घेऊ लागली अन् अनायासेच माझ्या मोबाईलची रिंग घुमू लागली, पळत येतांना बहुदा माझ्या वरच्या खिशातून तो पडला होता. आवाजाच्या दिशेने संथ पावले टाकत मी निघालो पण मोबाईल शांत झाला पण आवाजाने माझ्या पावलांना अन् डोळ्यांना एक दिशा अन् मार्गही दिला पुन्हा एकदा मोबाईल वाजला तो अगदी दोन पावलांवर असलेल्या झाडीतच त्याला उचलून फोन रिसीव्ह करणार तेव्हड्यात त्याच्या बॅटरीने जीव सोडला आणि तो बंद पडला. आता गाडीत जाईपर्यंत इलाज नाही म्हणत तसाच हातात खेळवत मी चालू लागलो खिशात मोबाईल ठेवू शकत नव्हतो कारण कपडे सगळे ओले झाले होते. शर्टाच्या बाह्या वर करत मी चालत होतो.
कुणाचा फोन असेल याच विचारात जवळपास तासभर चालल्यावर मला माझी गाडी दृष्टीक्षेपात आली. तरी अजून गाडीजवळ पोहचायला मला पंधरा ते वीस मिनिटे अजून लागली. माहित नाही गाडी दिसताच पाऊलांनी आपणच वेग वाढवला होता. कुठली शक्ती माझ्यात संचारली मला ठावूक नाही, पण मी वेगाने गाडी जवळ ओढला जात होतो. गाडी जवळ येताच थोडा दम खावून मी गाडीच निरीक्षण केलं. गाडीच दार उघडेच होते. चावीही इग्निशनला लागलेली ती काढून घेत एखाद विषारी जनावर आत मिळणार्या सावलीत अन् थंडाव्यात दडून तर नाही बसले, म्हणून आधी सगळी दारं उघडून, एकदम बेफिकीर न राहता, थोडी सावधता बाळगून, पूर्ण कारच निरीक्षण माझी नजर करू लागली. पण अस काही एक नव्हत. सगळ ठीक आहे, याची खात्री करत पुन्हा सगळी दारं लावून घेतली. गाडीची डिक्कीतून तयार नाश्त्याचे पदार्थ आणि पाण्याची बॉटल घेवून मी ड्रायव्हिंग सीटवर बसून दार लावले. कार चार्जर काढत तो आधी मोबाईलला अटॅच केला. मग कार चार्जर सॉकेट मध्ये टाकत गाडीला सेल दिला. पोटात सपाटून कावळे ओरडायला लागले म्हणून मोबाईल कारच्या डेस्कवर ठेवत नाश्त्याचा आस्वाद घेतला, पाणी पिऊन जरा स्वस्थ झालो. मोबाईल हातात घेऊन पाहिला, एव्हाना बरा चार्ज झाला होता आणि गाडीही बर्यापैकी गरम झाली होती. मी तिला एकदोन दा रेस देत चांगली खात्री करुन बंद केली आणि मोबाईल चार्जसाठी बॅटरी सप्लाय सुरु ठेवत मोबाईल ऑन केला. पूर्ण निट ऑन व्हयला त्याने काही क्षणांचा अवधी घेतला. रेंज येताच स्क्रीनवर जवळपास पन्नास मॅसेज आणि दोनशेच्या वर मिस्ड कॉल होते. मी लिस्ट चेक करायला स्क्रीन वर क्लिक केल तितक्यात पलीकडून फोन आला, तो माझ्या क्लिकमुळे रिसीव्हपण झाला. आधी मला काही कळलेच नाही. मी लिस्ट ओपन का होईना म्हणून मी पुन्हा पाहिले तर पलीकडून ओरडण्याचा आवाज लहानश्या स्पीकर मधून जोरात आला. कुणीतरी "हॅल्लो" म्हणून पुन्हा जोरात ओरडले होते. मी काहीसा सावरत "हॅल्लो" ला रिप्लाय दिला आवाज ऐकून जणू समोरच्याच जीव भांड्यात पडला. काही क्षण फक्त जोरात होणारा श्वास संथ करत स्वर नियंत्रित करत पुन्हा "हॅल्लो" म्हणाले. मी पुन्हा एकदा 'हॅल्लो' च उत्तर म्हणून दिले, मी प्रांजल बोलत आहे काल दुपार पासून फोन करत आहे तुम्हाला आहात कुठे? धक्का बसायची वेळ आता माझी होती. जवळपास मी २४ तास तिथे एकटा पडून होतो काल दुपार ते आजची दुपार मी अडखळतच म्हणालो जंगलात आहे न रेंज नव्हती, पण ही थाप पण माझी सपेशल माझ्यावर उलटली. तोंडातून निघालेले शब्द आता माघारी फिरणार नव्हते, बहुतेक प्रांजलला हे कळल असाव आवाजाला नियंत्रित करत म्हणाली शक्य तितक्या लवकर वापस या. मी तिरकसच बोललो का काही विशेष घडले का, मला एकांत हवाय हरकत नसेल तर प्लिज. माझ्या प्लिज सोबतच पलीकडून फोन ठेवला गेला. मी काही वेळ तसाच शून्यात हरवून गेलो. मी असा का वागत आहे, माझं मला कळत नव्हत. मी पुन्हा प्रांजलला फोन लावला. पहिल्याच रिंग मध्ये अगदी तत्परतेने फोन उचलला गेला आणि माझं स्वागत भिजलेल्या कापर्या ओठांतून निसटू पाहणार्या ओल्या झालेल्या "हॅल्लो" ने केले. मी क्षणभर काय बोलावं काय नाही म्हणून गप्पच बसलो. पलीकडे प्रांजलही गप्पच होती, नकळत माझ्याही डोळ्यातुन दोन थेंब ओघळले माहीत नाही का(?) संध्याकाळ पर्यंत येतो वापस येव्हढेच जड झालेल्या आवाजात म्हणालो आणि मी फोन ठेवला, अनावर झालेला माझा बांध सुटला होता. मनसोक्त मी रडुन घेतलें अन् स्वतःला शांत करुन मी परतीची वाट धरली.
वाटेत परतांना माहित नाही का, ओठांवर एक कोवळे स्मित तरळलें होतें. वेग आपणच वाढला होता अन् अंतर क्षणा-क्षणाला कमी होतं होतें. चेहरा प्रसन्न असला माझा तरी अवतार पुर्ण गडबडलेला होता. एक निर्णय मी पुन्हा घेतला, जें होईल तें होईल एकदा व्यक्त करुन तरी पाहायचें. प्रांजलच्या घराजवळ कारचा हॉर्ण नकळतच माझ्याकडून वाजला. गाडी साईडला लावून मी कारच्या बाहेर उतरलो. सांजेची ती वेळ तांबड उधळत होती, गुलाबी रंगाची छटा डोळ्यांना सुखावत होती. आतुरलेली ती धावत बाहेर आली. सुजलेले डोळे आग कसे ओततीलं, प्रेमच ओसंडून वाहणारी भासली होती. प्रांजलने माझ्याकडे आक्रमकच पाहिलें, माहित नाही का माझंही काही चुकलं म्हणुन माझीही नजर झुकली. काय तिच्या मनात आले माहित नाही त्वेशाने ती मला येवून घट्ट बिलगली. अगदी नकळतच माझीही मिठी घट्ट झाली. ती रडत होती न् पापणी माझीही भिजली होती. स्पर्श जेंव्हा बोलत असतों, शब्दं तेंव्हा अर्थहीन होंतात. स्वप्न, पुर्वसुत्र, अस्तित्वं काही एक मग बोलत नाही. आज असलेला ‘क्षण’ भरभरुन बोलत असतो. तिच्या आधी सवरलो मी. शांत ती ही आता होतं होती, माझी मिठी मी सैल केली, तरी तिची मिठी तशीच मुसमुसत होती. मी तिचा चेहरा उचलून तिचे डोळे पुसले. माझ्या ओठांवर तेच कोवळे खोडकर स्मितं आले. रडून रडून लाल झालेल्या तिच्या डोळ्यात सांजेचेच तांबडं उधळत होते. काही न बोलता एकमेकांच्या डोळ्यात एकटक पाहात उभे होतों. जणू युगांनंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर आम्ही आलो होतों. एकमेकांत अधिकाधिक गुंतत जायला एकमेकांचे डोळ्य़ात पाहाणे सोईस्कर असतें. आमचं एकमेकांत गुंतलेलं लब्बाडाला पाहावले नाही कि, त्याच्याकडे झालेले आमचे दुर्लक्ष त्याला आवडले नाही? प्रांजच्या नि माझ्या पायाशी तो घुटमळू लागला, तसाच दुडक्या चालीने मटकू लागला. त्याची ती खोडं प्रांजलने आणि मी एकदमच पाहिली हसू तिलाही मग तेंव्हा आले. मनातल्या मनातच मी म्हणालो, लब्बाडा तू नसतास तर कसे हसवले असते मी? उसण्या रागानेच त्याने आम्हा दोघांकडे पाहिले नि प्रांजलच्या घराकडे धावत सुटला. प्रांजलची आई उंबरठ्यावरुन आम्हा दोघांना पाहात होती. माझ्याकडे नजर उचलूनही न पाहता प्रांजल म्हणाली "आत या..!"
प्रांजलच्या आईला प्रांजलला माझ्या मिठीत पाहून काय वाटलं असेलं? माझं मलाच ओशाळल्यासारखें झालें. भितभितच मी घरात प्रवेश केला, तो ही आईंच्या मागेच. मागे होतो तेव्हा खरंच वाटलं, मागच्या मागे पळ काढावा. पण "आत या..!" माझ्या पाऊलांना जखडून गेलें होतें. लाब्बाडाला कुरवाळत प्रांजल उभी होती. मी एक क्षण तिला पाहिलं न् तिची पापणी झुकली. चोरी पकडली गेल्यावर चोराची जशी अवस्था होते, तशीच काहीशी माझी अवस्था प्रांजलच्या आई पुढे होती. "या बसा..!" प्रांजलच्या आईचे ते शब्दं. बचावात्मक पवित्रा घेत सावरुन मी बसलो. अचानक मनात भुतकाळाचे वादळ उठले होतें. विचारांशी न मतांशी ठाम राहून व्यक्त करायचे होतें सारेच. आज ती वेळ आलीच आहे. माझ्या चेरर्यावरचे बदलणारे हाव-भाव कदाचित त्या दोघींनाही कळले होतें. भुतकाळाचे असे असते प्रसंग काय अन् निमित्त काय बसं! स्वतःचे अस्तित्वं ठळक करायचे. सरळ साध्या मनुष्याने मग कसे सावरायचे..? वरवर दिसत असलेलं जेव्हढही माझ्याकडे वैभव आहे, माझ्या मनाच्या नजरेतून बर्याच खोलवर अगदी अंशतः काही एक अर्थाचे नाही. मी माझ्याच विचारांत होतो, कुठे हे वादळ व्यक्त करावं न् पुन्हा स्वतःला उद्धवस्त करावं. शुन्यातून बाहेर जेव्हा आलो, तेव्हा प्रांजलच्या आईचे शब्द कानांवर आले, "माणूस म्हणून जगण्यात अर्थ आहे, माणूस बनल्यावर जगण्यात खरी मजा आहे.." अपराधी बनावं लागेलं पुन्हा कि, मनातलं सारं मनातचं घुसमटत राहिलं. एक क्षण सारंच पुन्हा थांबून गेलं, वादळ उठण्याआधी उध्वस्त होणार गावं पाहून घेतलं.
मला तुम्हाला काही सांगायचे आहे, माझं बोलणं पुर्ण होतं नाही, तोवर प्रांजलने माझं बोलणं तोडलं. काय भुतकाळा बद्दलं? मला धक्काच बसला. होय..! तो मला जाणून घ्यायला आवडेलं. पण त्या आधी फ्रेश व्हा मी चहा टाकते. तिने रागानेच पाहिलं, मी मुकाट्याने उठलो वॉशरुम कुठय..? आतल्या खोलीत नेतांना मागे वळूनही न पाहाता प्रांजल म्हणाली, भुतकाळ भुतकाळ होता, आताचा तुमचा वर्तमान बघता तुमची चुक नसेलचं. अर्थात मला वास्तविकता माहित नाही अजुन, पण एक सांगते "भुतकाळाच्या आधीन राहून वर्तमानात जगता येत नाही, जगायचेच असेल तर वर्तमानाच्या स्वाधीन स्वतःला करावेच लागेलं..!" मी काही बोललो नाही स्वतःशीच गुंतत वॉशरुम मध्ये शिरलो न् दार लावलं. पाण्याचे नळ सोडून डोळ्यात अडवलेलं सारंच वाहून जावू दिलं. तोंडावर पाण्याचे सपकारे मारत स्वतःला अजुन छळून घेतलं दार उघडून बाहेर आलो तर प्रांजल उभीच टॉवेल सांभाळून. "सॉरी..!" जातांना मी न्यायला हवा होता. का माझं थांबने आवडले नाही. घर तुमचच आहे, मी पामर कुठे काही बोलू शकतो? हो ना! मग घ्या आणि या लवकर..! ती तिच्या अदेत मस्त होती. प्रांजलला ओलांडून लब्बाड माझ्याकडे झेपावला. दुडक्या मारत मला चिडवत बसला. हात पाय पुसून टॉवेल मध्येच मी लब्बाडाला पकडलं. लहान लेकराला आंघोळी नंतर घेवून जावं, तसं मी लब्बाडासोबत बाहेर आलो, प्रांजल उभी होती तिथेच जवळ असलेल्या खुर्चीत मी न विचारताच बसलो. लब्बाडाची अवस्था पाहून ती हसत सुटली. जणू कित्येक दिवसांनी तिच्या हसण्याने घराच्या भिंतींना जाग आली. लब्बाडाला मोकळं सोडताच त्याने प्रांजलकडे धावं घेतली. मला मनातलं तर बोलायचे होते, पण आज ही वेळ नाही म्हणून ओठांवर कुलूप बसले. चहा घेवून होताच मन अस्वस्थ झाले, प्रवासाचा क्षिण कि काय, अंग एकदम जड होवून गेले. मी घरी जातो लब्बाडाला असू द्यात तुमच्या जवळ. प्रांजलकडे मी पाहिले नाही, आईंच्या पाया पडून सरळ दाराबाहेर पडलो, नि गाडीत शिरलो. सेल मारतांना सहज नजर उंबरठ्यावर गेली, प्रांजलला लब्बाडासोबत उभे पाहून ओठांवर स्मित आले. जड होत बंद होणारे डोळे कसे बसे उघडे ठेवून, कसे तरी घर गाठले. दार उघडून मध्ये आल्यावर मागे दार बंद न करता सरळ बेडवर उताना झालो. अंग ठणकत होतं, डोकं उठलं होतं, थरथरत हाती जे लागलं ते तसेच ओढून मी पापण्या मिटल्या.
ज्याच्यावर आपण खुप प्रेम करतो, तापाच्या ग्लाणीत त्यांच नाव ओठांवर येते म्हणतात. माझ्या ओठांवरही ते एक नाव आजही तसेच भिजलेलं आहे, माझ्याशिवाय पुर्णत्व लाभले असेल कि, अजुनही तसेच अधूरे आहे, जसा मी आहे इथे. माझ्या कपाळावर ठंड पाण्याची पट्टी न माझं डोकं कुणाच्यातरी मांडीवर असल्याचा मला भास झाला. डोळे उघडण्याची अजुन पापण्यात ताकद नव्हती. ‘दिव्या’ तू आहेस का..? श्शुsss..! काही एक बोलायचे नाही. फक्त एक उष्ण हुंकार अन् सारेच मग निसटलेले क्षण पापण्यात. पाहाटे जाग आली तेव्हा जवळ असे कुणीच नव्हते. अशक्त झालेल्या शरिराला कसे बसे सावरत फ़्रेश होवून बाहेर आलो. माझ्या पलंगाशी प्रांजल बसली होती. मला अश्चर्यच वाटलं तुम्ही इथे कश्या..? आणि केव्हा..? आई कुठंयेत..? आणि लब्बाड..? माझ्याकडे थंड नजरेने पाहात प्रांजल म्हणाली तुमच्या मागेच आलो, आई नि तुमचा ससोबा बाहेर हॉल मध्ये झोपले आहेत. तुम्ही पडा, जरा बरं वाटलं तर उठायला नको. नाही मी ठिक आहे मला कुठे काय झालं..? आवाज वाढवायला नका लावू मला. मी मुकाट बेडवर जावून बसलो. मला झोप तर काही लागणार नाही आता तुम्ही; तुम्ही नाही तू म्हणायचे मला प्रांजल म्हणाली. मी तिच्याकडे बघत राहिलो, का कुणास ठावून मनातल्या मनातच सुखावत राहिलो. अबोलच क्षण..! माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्या बद्दल सॉरी..!
तुम्हाला नाही तू-तुला एकेरी बोला, आणि प्लिज सॉरी बोलू नका. माझी तत्परता का? प्रांजलने माझ्याकडे धिटाने पाहिले, "मला नाही आवडत तुम्ही सॉरी बोललेलं." भुतकाळच माझा पुन्हा माझ्या समोर होता. भलेही चुक माझी असो किंवा नसो, ‘दिव्याला’ मी सॉरी म्हणालेलो कधीच रुचायचे नाही. काहीही झाले तरी, कितीही भांडलो तरी, कितीही सतवले तरी तिची माफी मी कधीच मागायची नाही. कदाचित माझ्या या सर्व अपराधांची एकत्र शिक्षा द्यायची होती तिला. बोलता बोलता गप्प झालेलो मी पाहून प्रांजल जरा विचलीत झाली. अपराध्यासारखी स्वतःची पापणी झुकवून विचारलं तिने, चुकलं का माझं काही? नकळत पुर्वी उमटायचे कधी ओठांवर, तसे कोवळे स्मित माझ्या ओठांवर तरळले. नाही बस आठवण आली कुणाची तरी, या वेळी तत्परता प्रांजलने दाखवली ‘दिव्याची’ का..?
हृदयात खुप खोलवर असलेल्या जखमेची खपली एका क्षणात निघावी, न रक्ताची धार लागावी तशीच काहीशी अवस्था माझी होती. श्वास वाढला होता, बेचैनी वाढली होती. पळ काढायचा नव्हता मला, बस कोणी हातात हात घ्यावा माझा नि विचारावं काय झालं होतं...? धिर तेव्हढाच आला असता, मनात घुसमटत असलेलं ते सारं बाहेर आलं असतं, मागे उरलं असतं काही तर, मोकळा श्वास, रिते आभाळ, रिती ओंजळ न उर्वरीत आयुष्य. माझ्या मनातल्या विचारांची खळबळ प्रांजलला कळली कि, माझी अवस्था माहित नाही. माझ्या शेजारी बसत तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला न दुसर्या हाताने माझा हात हातात घेतला. बोलली काहीच नाही फ़क्त वाट पाहात होती. प्रांजलकडे नजर उचलून तिच्या नजरेत नजर मिसळून बोलण्याचे धाडस माझे झाले नाही. भुतकाळ ऐकायला तुझं मन दगड करुन घे, तुझं तुटणं नाही, सावरणं मी पाहिलं आहे. माझ्या हातावर तिची पकड थोडी अधिक घट्ट झाली.
‘दिव्या’ माझं सर्वस्व. माझा कण कण प्रत्येक क्षण. आधी मैत्री, मैत्रीच्या पुढे प्रेम, प्रेमाच्या हद्दी बाहेर एक नातं. सगळं सगळंच दिलं मी तिला, अस्तित्वात नसलं तरी कल्पनेत, समोर नसलं तरी स्वप्नातं, होतं-नव्हतं सर्वच मी तिला दिलें. अगदी स्वतःचे शरिरही. स्पर्श नाही झाला कधी तिचा मला किंवा माझा तिच्या शरिराला पण स्पंदनात जाणवलं, रक्तात उसळलं. श्वासात जन्मलं ते सहज कसं विसरु? प्रेमात थांबावं कुठेतरी, मला कळत होतं पण तिच्यापुढें माझे सगळे उसनें अवसान अगदी सहज गळून पडायचें. या चार भिंतीना एका ‘स्त्री’ स्पर्शाने घराचे अस्तित्वं लाभावें, अगदी तसेच तिला हवे तसे हे घर बनवलें. होती काही कारणे, सेटल नव्हतो, स्टेबल नव्हतो, स्वतःला दोन घास भरवू शकत नव्हतो, तिला कुठून नि कसे भरवणार. मला वेळ हवा होता, जो तिने दिला पण हवं तस काही एक माझ्या नशिबात तेव्हा नव्हतें. पुढचे माहित नव्हतें. एकदिवस निघाला तिच्या लग्नाचा फतवा. वाटलं होतं मी तिला मिळवायला असमर्थ आहे कदाचित ती तरी मला मिळवायला समर्थ असेलं. पण..! नाहीच मीच म्हणालो होतों, ज्या जन्मदात्यांनी तुला जन्म दिलाय त्यांच्या कडून तुझ्या कन्यादानाच पुन्य हिरवून घेण्याचा मला अधिकार नाही, ना मला तू असे काही केलेलें आवडणार आहे. स्वतःचा विचार नाही केला मी. करायला हवा होता का..? ठीक आहे, मी नाही केला माझा विचार पण एकदा तरी तिने माझा विचार केला असेलं. केलाच प्रत्येक क्षणाला तिने माझाच विचार केला, मी नाकारु शकत नाही. एकदाचे लग्न झाले तिचे. लग्ना पुर्वी तिला माझ्यासोबत लग्नाच्या दिवसा पर्यंत शेवटचेच हे क्षण जगायचे होतें. माझा अहंम तिथेही होताच, या नंतर पुन्हा येवू नकोस माझ्या आयुष्यात मी सरळ म्हणालो, तसेच बेधुंद जगत तिला शेवटी लग्नाच्या मंडपात मी स्वतःच उभे केलें. सवय होत होती तिच्या नसण्याची, तर तिच्या लग्नाच्या पंधरा दिवसांनी ती माझ्या समोर आली. बोलला होतास ना लग्नानंतर मला माझं बाळ देशीलं तें घ्यायला आली आहे. माझ्या रागाची तेव्हा हद्द नव्हती, मी सरळ तिला चालतं केलं. तुझ्या-माझ्या सुखासाठी मी त्या तिसर्या व्यक्तीला शिक्षा नाही देवू शकत.
खरं तर तुलाच द्यायला काय आता कुणालाच काही द्यायला माझ्या जवळ काहीच नाहीये. प्रतारणा, व्याभिचार मला तिच्याकडून अपेक्षीत नव्हता. कळतं होतं मला ती माझ्या आय़ुष्यातुन जाणार नाही, म्हणून मी स्वतःच निघायच, न चालत खुप दुरवर जायचं ठरवलं. सर्वच बदललं मी, माझं घरही स्वतःची ओळखही, निघुन आलोय इथे, जिथे कोणी मला ओळखत नाही, ना मी कुणाला ओळखत. परत जायलाही काही आता मागे काही नाही. मी निघालो त्याच्या दोन दिवसांनी बाबा वारलें. बाबांच्या एकाकी जाण्याने मग आईने ही जास्त दिवस तग धरला नाही. या सर्वांसाठी मिच कारणी भुत म्हणून माझ्या सख्ख्या बहिणीनेही मला पुढ्यात उभे केलें नाही. आई बाबांनी जे काही केले होते नावावर, त्याला हातही न लावता सर्व बहिणीलाच आयुष्याभराची ओवाळानी देवून. सर्व संबंध तोडून इथे आलो. इथे आल्यावर मागे वळून मी पाहिले नाही, आज एकदाचं वळलो मागे कारण, तुझ्याशी लपवून, तुला खोट अश्वासन देवून मला तुला फ़सवायचे नाही. काय चुकलं माझं मला आजवर कळलं नाही. रोज मरत आलोय या विचारांनी. मित्र-मैत्रीण कुणी-कुणीच मी जोडलें नाही. मला एक ‘दिव्या’च माझ्यासाठी सर्वस्व होती. कोवळ्यावयात सहज दिलं गेलेंलं माझ्याकडून माझं अस्तित्वं, माझं सर्वस्व पुन्हा कुणा द्यायला मला जमलं नाही. सहज नाही देता येत आता मला काही, ओरबाडून माझ्याकडून घेतल्याशिवाय, ओरबाडून जखमच होतें का सांग, जें हवंय तें हक्काने घे स्वतःच, तुझं तू. मी फक्त प्रामाणीक राहिलं तुझ्याशी. असा विचार केला मी तर काय चुकलं माझं? ज्या सहजतेने सुरुवातीला मी दिलंय तें आता नाही देता येणार हे कळत असेलंच तुला, पण एक असेही का असू शकत नाही, गुंतत जावं कधी कुणात नि पुन्हा हे सर्व सहज बाहेर यावं अथवा बाहेर काढायला भाग पाडावं.
एकदा सुत्र गळ्यात पडलं की त्यात जगावंच लागतं, जबाबदारी घेतली का ती पेलावीच लागतें. पण मला हे सर्व नकोय. बंधानात, एकाच चौकटीत असुनही कर्तव्य निभवायचं म्हणून कर्तव्य निभवायला मला नातं नकोय, हक्क गाजवावा, प्रतिष्ठा जपावी, दहा लोकांत मिरवायला शोभेची वस्तू विकत घ्यावी. छेsss! किळस येते या सगळ्याची. मला सहप्रवासी हवी आहे. माझ्या बरोबरीने चालायला. जेव्हढा मी तिच्यावर हक्क गाजवू शकतो अधिकार सांगू शकतो, त्याच्या दहा पटीने तिने माझ्यावर हक्क न् अधिकार गाजवावा येव्हढीच माझी अपेक्षा आहे. जग फार छोट असतं पुन्हा उठून माझा भुतकाळ माझ्यासमोर आला, नि मी ढासळून त्यात गुंतत गेलो तर मला खेचून स्वतःजवळ ठेवेल असं पुन्हा उधळून लावणार नाही, न वाटून घेणार नाही अशी खंबीर व्यक्ती मला हवी असल्यास चुकीचं असं काय आहे..? मनात सलत असलेलं सारंच आज मी बाहेर काढून टाकलं. कसं बसं धाडस करुन मी प्रांजलकडे पाहिलं. तिची पापणी भिजली होती, माझा हात घट्ट धरुन बसलेली ती, तिचा एकटीचाच हात माझ्या हातांतल्या बोटांत गुंतला होता, तिच्या त्या गुंफनला आता मला उत्तर द्यायचे होतें. स्वप्नांना माझ्या समोर आता यायचें होतें. सुखावत होतो मनात एकएक बोट गुंफवतांना, आयुष्याची विस्कटलेली विण इतक्या सहज दिसेनासी होतं जातांना. तुझ्यानंतर धरला मी कुणाचा हातं, सुरु केला पुन्हा जोडीने आयुष्याचा प्रवास. इथेही माझं चुकलं नाही ना? प्रांजलचा हात घट्ट धरत तिची आसवं मी पुसली. तिच्या मनावर झालेला आघात आता माझ्यावर उलट वार करणार होता. थरथरत्या ओठांनी प्रांजल म्हणाली मला काही जाब विचारायचे नाहीये, फक्त येव्हढेच सांगाल, उद्या तुमचा भुतकाळ तुमच्या पुढे तुमच्या आयुष्यात पुन्हा एक संधी घेवून आला तर मी ती तुमच्याकडून हिरावून कशी घेवू..? तुमच सुखं कसं पुन्हा हिरावून घेवू..? कसं थांबवू मी तुम्हाला माझ्या बंधनात..? तुमचे पंख छाटायचेच तर उडायला आभाळ तरी कशाला हवें..? निवाडा तुमचा तुम्हाला करावा लागणार आहे, तुमच्यासाठी, तुमच्यावर, तुमच्यापेक्षा जास्त अधिकार गाजवल्यावरही, तुमच्यापेक्षा जास्तं प्रेम करुनही, घरटं तुम्हाला निवडावं लागणार आहे. बनवुन, सजवुन, राहून नव्हे. येणार्या प्रसंगापासून पळूनही नव्हे, तुम्हाला स्वतःला सांगावं लागणार आहे हे तुमचं आयुष्य आहे, या आयुष्यात तुम्ही सुखी आहात, या जगण्यात तुम्हाला मजा वाटत आहे, तुमच्या सोबत जगण्यात मला मजा येणार आहे. एकाच्याच बाजूने मी नाही बोलू शकत ना स्वतःचा स्वार्थ साधू शकत. चुक तुमचीच नाही दोघांचीही समान आहे. फरक येव्हढाच "आताचे निवडलेलं अथवा पदरात पडलेलं आयुष्य तुमची चुक सुधरायला मिळालंय असे न समजता. जगणार्यांना जगायला मिळालंय असे समजुन जगाल तर तुमच्या जगण्यात मजा शोधावी नाही, स्वतःच दिसुन येणार आहे.
हक्क गाजवुन, अधिकार जतवुन नातं टिकत नसते. जपत आलो तर टिकतें नि निभवलें आपणच जातें. अंतर कमी करायला दोघांनीही दोन टोकांवरून चालत यावें लागतें. एक अंतर कमी करण्यासाठी फक्त चालणार आणि एक उगाच अंतर वाढवणार यात तथ्य नसतें. "थोडं तुम्ही सांभाळून घ्या, थोडं मी सांभाळून घेईलं. सगळंच मी करावं तर जगण्यात मजा कशी येईलं..?" चालायला प्रोत्साहन कुणी देण्याची आवश्यक्ता नसतें. कुठे खड्डा आणि कुठे मैदान हें धडपडल्यावरच समजतें. सतत आधार मिळेलं असेही नसतें, कुठे स्वतःला आधार देवून कुणाचा आधारही स्वतःलाच बनावें लागतं असतें. राहिलें तुम्ही दिव्याला सर्वे दिलेंय तें, न आता प्रत्येक क्षणात तिचे अस्तित्वं आहे तें, "जें काही होतं ते काल पर्यंत आज माझ्यासाठी नि येणारा उद्याही माझ्याचसाठी तुमच्याजवळ शिल्लक आहे, तो येव्हढ्या सहज रिता होवूच शकत नाही, न माझ्याकडून हिरावूनही कोणी घेऊ शकत नाही." प्रांजलच्या या शेवटच्या वाक्यावर माझ्या ओठांवर खोडकर स्मित तरळलें. हो..! ते झालेंच पण त्यासाठी तुझा होकार असायला हवा ना. प्रांजल बुचकळ्यात पडली माझा होकार तो आणि कशाला? मी माझा हात सोडवून, तिच्या गळ्यात हातांचा विळखा घातला, तिच्या डोळ्यात रोखून पाहात, ओठांनी हसत, विचारलं मी प्रांजलला माझं होण्याला तुझा होकार हवा ना..? संभ्रमात अजुनही होती ती, डोळ्यात अजुनही गुंतली होती ती, सहज ओघळली सुखद अश्रूंची एक हलकी सर तिच्या डोळ्यांतून नि बिलगली मग घट्ट मला.
झालं असेल तुझं तर मला चहा हवा आहे, उंहूं! पाच मिनटं अजुन, अरे अर्धा तास झाला काय हे. हा माझा क्षण आहे, काही बोलायचं नाही. मी हळूच प्रांजलच्या कानात कुजबुजलो तुझी आई बघत आहे दारातून. ती लगेच माझ्यापासुन दुर झाली दाराच्या दिशेने पाहिलें पण तिथे कुणीच नव्हतं. दोन चापटा मारुन मला, शांतता तिला भेटली. दुष्ट आहेस फार, हो ना जा चहा आन डोकं दुखत आहे माझं. दाबुन देवू, किती प्रेमळ विचारलं. नको जवळ यायला तुला काय निमित्तच हवंय, जसं काय तुम्हाला नकोच, मी तिच्याकडे पाहिलें, आणतें म्हणत ती निघुन गेली. चहा सोबत खायला बिस्कीटंही घेवून आली. आई उठलीये आवरत आहे. मी फक्त ह्म्म, लग्न कसं हवयं तुला ? चहाचा घोट घेत विचारलं मी तिला, कसं म्हणजे.? लग्नाच्या बाबतीत काही स्वप्न पाहिली असशील ना तू..? मला गाजावाजा नाही आवडत फार, साधं-सुधं करुन जवळच्यांना जेवन बस. आहा..! काय तारीख काय ठरवली आहेस मग तुझ्या लग्नाची, तुझ्या? कि आपल्या? आपल्या... अम्म ते मुलाकडचे ठरवतात ना. सॉरी सॉरी तुमच्या घरात नाही ना असे मोठं कोणी चुकलं माझं, आता शिक्षा तर मिळणार. तो मोबाईल दे तुझ्या हाताजवळ असलेला तिने देतं विचारलं काय शिक्षा देणार..? मी मोबाईल मध्ये काकींचा नंबर शोधुन फोन लावला, रिंग जात होती. सांग आता तुच यांना सर्व मी बोलणार नाही, तुच बोलवं मी तिच्याकडे फोन दिला, ही तुझी शिक्षा. प्रांजलच्या हातात फोन पडताच पलिकडून फोन उचलला गेला, मला अनखी तिन चार चापटा मारुन काकींशी बोलत बरीचशी ती लाजत होती. फोन ठेवल्यावर म्हणे चांगली शिक्षा केलीत हां, आहे तसेच घरी जायला लावले मला नि आईला. काकींनी तुम्हाला घरी बोलवले आहे. ह्म्म आवर मग सोडून पुढे तसाच जाईल मी. कपाट उघडून बाहेर जाण्यासाठी वेगळा ड्रेस काढत होतो. माझ्या मागे प्रांजलने बेडरूमचा दार लावला नि माझ्या जवळ आली. एक विचारु तुम्हाला ‘हो’, माझ्यावर थोड तरी प्रेम कराल ना तुम्ही ? तिच्या निरागस प्रश्नाला काय उत्तर द्यावे मला समजले नाही. मी तिला अजुन जवळ ओढुन मिठीत घेतलं. तिच्या कपाळावर ओठांनी ओझरताच स्पर्श करत माझ्या मुखातुन निघाले, ‘दिव्या’ पेक्षाही जास्त तुझ्यावर प्रेम करेल मी. असे कसे झाले मलाच कळले नाही.
प्रांजल शांत झाली होती. मिठीतुन स्वतःला सोडवत लवकर याल ना तुम्ही मी वाट पाहिलं, लब्बाडला माझ्यासोबतच नेनार मी, ठिक आहे म्हणत तिला रुम बाहेर काढलं, चेंज करुन बाहेर आलो तर आई हसत मला पाहात होत्या. मी त्यांच्या पाया पडलो, माझ्या जोडीने प्रांजल कधी आली नि सोबत कधी झुकली मला समजलं नाही. "औक्षवंत व्हा..!" प्रांजलला आणि आईंना घरी सोडून पुढे मी काकींचे घर गाठलें. डोळ्यात ओसंडून वाहणारा आनंदाला काही सिमाच नव्हती. मला चिडवण्याची संधी मग त्या कशा सोडणार, काय रे? मी विचारलं तेव्हा नाही नाही म्हणालास आणि आता परस्पर सुत जुळवलंस? तुम्हाला न कळवता पाऊल उचललं पण एक खरं सांगाल, मी स्वार्थ तर नाही ना साधत आहे माझा..? जिचा मी आजन्म बनुन राहिल मी वचन दिलं होतं, तिच्याशी प्रतारणा तर नाही ना माझी..? काकी हसल्या न म्हणाल्या, वचन दोघांनीही निभवायला हवं ना, जसं तिने तुला दिलेलं वचन मोडून पुढचा प्रवास स्विकारला, आणि तू ही तिला माफ़ केलस, तिने माफ़ी मागितली नसली तरी. आयुष्य शिक्षा नसते रे, न गुन्हाही नसते, बस जगण्याचे एक कारण असते. श्वासांचे व्याज वाढवायचे असते, आलेल्या, समोर असलेल्याच वाटेला जायचे असते. आता या क्षणाला तू मागे वळून पाहून प्रांजलचा गुन्हेगार बनू नकोस. माहित आहे मला थोडस अवघडल्यासारख होतं, म्हणून पुर्णच कोसळायचे नसते. घाई होतेय वाटतं असेल ना, पण एक सांग वेळ किती घेणार आहेस? सतत वेळ येतं नसतें हें तुलाही ठावूक आहें. आज आहे तर सोडून दे स्वतःला पुन्हा या प्रवाहात, वाहात जावू दे स्वतःला. बुडणार तू नाहीसच, पोहायला तरी शिकशील.
काकींना घेवून मी प्रांजलच्या घरी पोहोचलो, घरात येवून बसत नाही तर माझी नजर प्रांजलला शोधू लागली. एक उत्सुकताच होती, लब्बडही कुठे दिसत नव्हता. माझी अस्वस्थता आईंना कळाली वाटतं, गालात हसत त्यांनी प्रांजलला आवाज दिला. आधी लब्बाड दुडूदुडू धावत माझ्या जवळ आला, मी त्याला अलगद उचललें, क्षणभराने नजर उचलून समोर पाहिलें तर प्रांजल फिक्कट गुलाबी रंगाच्या साडीत कहर करत होती. तिच आवड, तिच पसंती, तसेच बालीश वागणे, न तसेच धिट राहणे, भुतकाळ वर्तमान म्हणून समोर होता, आता त्याला मी निसटू देणार नव्हतो, कधी एकटं सोडणार नव्हतो. बस! ‘जगणार होतो, जगण्यात मजा घेणार होतो’.
तुळशीच्या लग्नानंतर चार दिवसांनी आमच्या लग्नाचा मुहुर्त निघाला. साधंसुधं, हसत, खेळत सारे सोपस्कार पार पडले. एक जावई न बनता एक मुलगा म्हणून प्रांजलच्या आईलाही घरात आणले, लग्न साधंच म्हणून माझ्या न प्रांजलच्या ऑफीस मधल्या आमच्या माणसांना ओली-सुकी मनमोकळी पार्टी दिली, अर्थात तो दिवस प्रांजलचा तिच्या ऑफीसच्या माणसांसोबत शेवटचा होता, त्यानंतर तिची खुर्ची माझ्याच ऑफीसमध्ये माझ्याशेजारीच लागली. सर्वांना खुश करत तो दिवस सरला. थकुनभागुन रात्री दोघेही एकमेकांच्या कुशीसाठी झगडत लब्बाडला मध्ये ठेवून झोपून गेलो. दोन दिवसांनी काकींसोबत आई तिर्थयात्रेला निघुन गेल्या. हिरमुसलेली प्रांजल मग पाहावली गेली नाही. ऑफीस मॅनेजरवर सोडून दिवसभर प्रांजलला कसे बसे समजवून संध्याकाळी सिमल्याच्या फ्लाईट मध्ये घेवून उडून गेलो.
या हिवाळ्याच्या दिवसात अलगद पडणारा तो बर्फ़, न तो थंड वारा आमच्या दोघांत जवळीक वाढवायला पुरेसा होता. आयुष्याचा नवा पर्व आता सुरु झाला होता. प्रेम मन जुळले की सहज मिळते, मग एकमेकांचे विचार, आवड वेगवेगळी असली तरी ती पुढे एकच होते. सिमल्याच्या बर्फाळ प्रदेशात लब्बाडानेही सुत जुळवून निरोप घेतला. मनात तसं दुखलं पण सावरणारा हात माझ्या हातात होता. प्रत्येकजन त्याच्या ओलांडलेल्या चौकटीत एकदिवस जातोच, न सुखात असतो, किंवा दिसतो तरी, आपल्या ओलांडलेल्या चौकटी किती आनंद न सुख नांदणार हे जो तो स्वतःच ठरवतो अन् जगत असतो. एकदा सरुन गेलेला भुतकाळ, गेलेल्या वेळेसारखाच परतत नसतो, बस! येवू का खिजवायलाच आयुष्यात नव्हे मनातल्या खुळ्या विचारांत डोकावत असतो.
"एकदा हरवलं किंवा गमवलं म्हणून नाही, पुन्हा पुन्हा प्रेम करायला मिळालं न एकदाचं आयुष्यात भरभरुन जगता आलं", म्हणून कदाचित "जगण्यात मजा आहे..!"
.
© मृदुंग