♥
♥ क्षण..! ♥
लाजाळू..!
..त्या दिवशी लाजाळूने अखेरची पाने मिटली. कुठल्या एखाद्या पानावर अखेरचं प्रबोधन असेल, म्हणून माझं कुतूहल शिगेला पोहोचलं होतं. राहून-राहून मन त्याची पानं कुरवाळत होतं. मिटलेली पाने कदाचित कुरवाळून पुन्हा उघडतील म्हणून.. कुरवाळल्यावर पाने मिटणारा तो. त्याने त्याचा गुणधर्म काही सोडला नाही. शेवटी काय? मातीला पुन्हा मूठमाती देऊन कर्तव्य पार पडायचं. आपला शोक शोकांतिका होताच संपतो. मग ही मिमांस कुणाला सांगत फिरायची? ठेवायचं आपलं स्वतःलाच. जाणारा सांगून जात नाही आणि येणारा पूर्वकल्पना देत नाही. आलिया भोगासीमध्ये मतलबं बाजूला राहतात. तेवढ्यापुरता चालढकल होऊन जाते. थोड्या दिवसांनंतर सगळं स्थिर होतं. माती झालेल्या कितीतरी प्रेतांच्या स्मरणार्थ; पहाटे प्राजक्त स्वतःला मातीवर उधळून देत असावा अशी संकल्पना होते. याची प्रचिती यायला, तेवढं पुण्य आपल्या वाट्यात आहे का? मग पुन्हा एक लाजाळू त्याच मातीवर पुन्हा रोवला. सवड काढून अगदी एकेका पानासह सतावला. लाजाळू पानं मिटतांना दिसला कित्येकवेळा. पानं उलघडतांना मात्र नेमकी आपली पापणी मिटून जायची. फारसा दिसायचाच नाही. प्रत्येकाच्या भूतकाळाची अशीच लाजाळूची मिटलेली पाने दिसतात. पण ती पाने उलघडलेली दिसत नसतात. गुंतलेली असतात. त्यामुळे मग म्हटलं लाजाळूची मिटलेली आणि आपली दुमडलेली पाने बरी..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३