♥
♥ क्षण..! ♥
काठाशी येऊन..!
एक संथ न शांत वेळ... डोळ्यासमोर समुद्र अन् मनात लाटांचे थैमान... चलबिचल होते काळजात आणि अनवाणी पावलाखालून वाळू निसटू लागते... वारा शरीरभर रेंगाळतो... कधी भूतकाळाचा तर कधी भविष्याचा वेध जो तो घेऊ लागतो... काठाशी आलेल्या लाटेवर काही दुरुन वाहत आल्याच किनाऱ्यावर भासत... काही युगायुगांच्या प्रतीक्षेनंतर किनाऱ्यावरून लाटेवर स्वार झालेलं दिसतं... सांजेचे सोहळे उदास की, प्रसन्न हे चित्त थाऱ्यावर असलेल्याला विचारावं वाटत पण स्वतःतच हरवून गेलेला जो तो कसं काही व्यक्त करणार..?
कधी लाटेतून लाट वेगळी होतांना दिसते तर कधी समुद्राचा आक्रोश खळखळतांना दिसतो... लाट आणि समुद्राचा मध्यस्थी किनारा आपला फक्त अंतर करुन उरलेला दिसतो... पावलाखाली जमीन? छे! वाळू असते... हातून मग कित्येक क्षण निसटल्याची जाणीव होते... काहीसे मन हळवे होते... पुन्हा स्वतःपासून वेगळे होते...
काही गोष्टी वेळेनंतर अर्थहीन होतातच! काही गोष्टींना वेळ देऊन अर्थ येतो याची प्रचितीही येते... वेळेचे गुणधर्म पेलणे अवघडही मग वाटत नाही... पावले जड होतात... नजर धूसर होते... हातभर अंतरावरचेही काही दिसणे मुश्किल होते... शरीरावर रेंगाळणारा वारा मग अलगद चेहऱ्यावरची ओल टिपतो... शहारा उठतो न मन तीळ तीळ तुटते... आपलं अस्तित्वसुद्धा कोणी असंच लुटत...
काठाशी येऊन सगळं शांत होतं... मन उधाण होतं आणि क्षितिजाशी उगाच द्वंद्व जुंपत... लाटेच ठीक दूर समुद्रात प्रवास नाहीतर किनाऱ्यावर बस्तान... आपलंच अडलंय... ना समुद्र गिळता येतो... ना लाट थांबवता येते... काठाशी येऊन उगाच स्वतःची फसगत करावी लागते..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment