Powered By Blogger

Thursday, July 27, 2017

प्रपंच..! :-)


♥ क्षण..! ♥

प्रपंच..!

मी:..चल राहू दे! तुला कशाला हवी सरीवर सर? उगाच अंगावर थेंबांचा असर? ओल तशीही तुझी तुला येते. घरभर वात्सल्याचा सुवास दरवळत ठेवते. मातीची ओढ, तिची तृष्णा आणि उपजण्याची किमया तुला कशाला उसनी हवी? म्हणून राहू दे...

ती: कितीही काही म्हटलेस तरी बाईचं बाईपण आणि स्त्रीचं स्त्रीपण जपून ठेवावं लागतं. उसनं असलं तरी. चौकट आणि उंबरठ्याचा भावबंद एक करतांना भिंतीही मला जिवंत ठेवायच्या आहेत. माझ्या पदराचा वास म्हणून तेव्हा माझं असं काय या घरात याचं उत्तर मला सापडेल. अन्यथा परक्याचं धन म्हणून मला माझ्या माहेरानी बालपणापासूनच तोडायला सुरवात केली होतीचं ना.. म्हणून उसन्या हव्यात सगळ्या गोष्टी माझ्या म्हणून...

मी: ..नाही कुठे म्हणतोय किंवा तुझं अस्तित्व कुठे नाकारुन पुसून काढतोय? शास्वत आहेच ना आणि शाबूत पण आहेच. मग हे सगळं नुसतं काहीतरीच नाही का..?

ती: ..तुला खरंच कळतंय का मी काय मागतेय? ते खरंच कळतंय तर तुला समजत तरी काय नाहीये? खिडक्यांची पडदे बदलावीत आणि पुन्हा घराची नवीन रंगरंगोटी करावी एवढी छोटी गोष्टचं आहे ही. पण तुझं नडतंय कुठे..?

मी: ..माझं काही नडत नाही. अडतपण नाही. बसलेल्या संसाराच्या घडीला पुन्हा विस्कटण्याची माझी इच्छा होत नाहीये...

ती: ..अच्छा! असं आहे तर. मग एक सांग घडी केलेली चादर पण चुरगळतेच ना? आतल्या आत ओल धरून तिची धागी कुजतातच ना? एकदा घडी उघडून ऊन दाखवायला नको..?

मी: ..तुला त्रास होईल. जो मला नको वाटतोय तुला पुन्हा व्हावा..!

ती: ..आठवणींचा कप्पा उघडला की, जखमा उघड्या पडतातच असं होत नसतं. त्रासाचं म्हणशील तर तो कप्पा उघडू न देण्याचा त्रास होतोय. हक्कय मला तर वर्तमानात आणि भविष्यातच पुढे-पुढे का जात राहू? थोडं मागेही डोकावून पाहू दे ना! कदाचित पुढचा प्रवास भूतकाळात डोकावून बदललेल्या वर्तमानाचा होऊ शकेल...

मी: ..ठीक आहे. तुझा हा स्त्री हट्ट मी पुरवणार पण माझी अट आहे. कोसळायचं न बिथरायचं नाही. विखुरलेलं रेंगाळत वेचत बसायचं नाही. प्रपंचात घुटमळत मुके हुंदके घ्यायचे नाहीत. एवढीच अट आहे माझी...

ती: ..कबूल..!

(..आयुष्याच्या मागच्या पानांवर लागलेली धूळ झटकल्यावर; तुमचं, माझं, आपलं-प्रत्येकाचं हे एक पुस्तक थोडं मागे जाऊन वाचण्यासारखं आहे. काही धागेदोरे हाताशी लागतीलही. काही गाठी पडतीलही. थोडं आयुष्य सैल झाल्यावर या गाठोड्यात काय मिळतं ते तुमचे तुम्हीच बघा. वाटलं तर कळवा पत्ता तुम्हाला माहिती आहेच..!

योग्यवेळी लख्ख प्रकाश 'उजाळे'..
कणकण सरकता आभाळ काळे,
बघ तुझे तुला काय-काय गवसते..
मला खुनावतायेत ती ही बंद ताळे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Thursday, July 20, 2017

बधिर..! :-)


♥ क्षण..! ♥

बधिर..!

बाहेर मग धुंद
वादळाची एक रात्र,
माझ्या हातात
तुझे शेवटचे ते पत्र..
ख्याली खुशाली
कितीतरी सांत्वन,
अजूनही नंतरही
ओळीतही भिजणं..
तुला कळले नाही
मी कळवलेही नाही,
उत्तर देऊन देखील
प्रश्न मी केलेही नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

'तू..!' :-)


♥ क्षण..! ♥

'तू..!'

कितीही आवरत घ्यावं किंवा थोपवतं घ्यावं म्हटलं तरी माझ्या मनातलं कागदावर उरतंच! न लिहिण्याची ताकीद, धमकी आणि आज्ञा होईपर्यंत थांबून राहायचं. गप्प बसायचं. कोरी कागदे सोडायची. न राहवून कागदे लिहून काढलीच गेली तर टराटरा फाडायची. आग लावून जाळून टाकायची. लिखाणाचा सराव विसरुन जायचे. संवादांची माध्यमे बदलत असतांना शब्दांची लोचने अंगीकारायची नसतात. तरीही सराव हवाच! निदान मांडता तरी यायला हवं. ढाचाच ढेपळाला तर मग लिखाण काही कामाचं नसत. विषयांची तुटक माहिती होते. अवघड लिहिण्याचा पिंड साधं, सोपं सहज लिहिण्याचा झाल्यावर प्रगल्भतेचा तो उच्च स्तर, पुन्हा सर करण्याची उर्मी आतमध्ये राहत नाही. लिहितोस मध्येच सोडतोस, गायब होतोस, लिहूनही कुणाला वाचायला देत नाहीस, बऱ्याचदा तर तोच-तोचपणा होतो. काहीतरी हरवल्या हरवल्यासारखं वाटत लिखाणात. मन लावून लिहिलेलं वाटत नाही. रोज वाचायला खेटे घालणारे लोकं लिहिलेलं रेटत वाचून काढतात. वेगळं त्या थराचे उमटवतांना स्वतःची गात्र पुलकित झाली नसतील तर कोणाच्या भावनांना कसले उमाळे येतील? आणि कागदावरच्या नजरेला डोहाळे कोणत्या गर्भधारणेची लागतील?
मैफल गाजवता येते. मैफल जगवता आली का कधी? सुखी आयुष्याचे प्राक्तन अधाशासारखं बकाबका हादडतांना निर्मळ कारुण्य उपभोगलेच नाही. मग सुरकूतलेलं तारुण्य कळण्याची आपली काय बिशाद? अंडी तडकायचा काय तो अवकाश भेग गेली की झालं. जीव येतोय की जातोय हे पाहायला वेळ कुणाला नाही. आपली पावलं प्रवाहाच्या दिशेने करायची. तोंड फिरवून घ्यायची आणि सरतेशेवटी संबंधही काढून घ्यायचे. एवढेच असते 'आयुष्यात' वर्तुळ स्वरूपात. प्रामाणिक स्वतःही स्वतःसोबत नसत कोणी. मग शब्दांचं काय? कागदांचे काय? विषयांचे तरी काय? उत्तर आहे का..? आहे ना उत्तर. ते माझे उत्तर म्हणजे  'तू'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

लफडं बसलंय कोपऱ्यात..! :-)


♥ क्षण..! ♥

लफडं बसलंय कोपऱ्यात..!

शेवट गोड असलेली ती गोष्टचं.. सुरुवातीला दुःखाची झालर.. मध्यंतरात भूतकाळाचे वलय आणि वर्तमानात अवघडलेले, गोंधळलेले कोवळे सावज.. ज्याला तुम्ही, मी आणि जग हृदय म्हणतो.. हृदयांतराची नजरेने होत असलेली शस्त्रक्रिया जपून करावी लागते अन्यथा समाजाकडून लफडं नावाची शिवी ऐकावी लागते.. सोड ना.. मर्यादा, चारित्र्य, शील, आब्रु, घराणे, नाते, सप्तपदी कशाला 'बाजार'.. आपण 'मित्र' म्हणून राहू.. त्याच निखळ मैत्रीला मग.. 'लफडं बसलंय कोपऱ्यात'..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, July 13, 2017

मुंबईच्या पावसात भिजल्यानंतर..! :)


♥ क्षण..! ♥

मुंबईच्या पावसात भिजल्यानंतर..

प्रवाहाला गति, वाट चुकलेल्याला दिशा.. लिखाणाची थोडी देखील इच्छा नसतांना, विषयांचा रतीब.. पावसाच्या थेंबात मिठीत गुरफटलेली ती दोघे.. कचकच, चिडचिड न करता शांत संथतेत रेंगाळणारी ट्राफिक.. कटिंग चहासाठी जमलेला चारपाच मित्र/मैत्रिणींचा ग्रुप.. लोकलच्या दारात पाऊस झेलणारी तळहात.. गरमागरम भजी न वडापावची रेलचेल.. आपापल्या हिशेबाने/ स्टेट्सने जो तो पाऊस एन्जॉय करतो.. चारचाकीमधले दुचाकीस्वारांना भिजत जातांना पाहून तळमळतात.. दादर-धारावी रस्त्यावर टप्पोरी पोरं रस्त्यावर येऊन नाचतात.. हे सगळं थेंबांच्या असंख्य सुया टोचून घेतल्यावर.. चहाची मोडकी तोडकी टपरी डोक्यावर छपराची पांघरून घालते.. वाफळणारा चहा, अंगावर खेळणारा वारा धुंद करतो.. मन टवटवीत झालं असतं-नसतं तोच.. टवकारलेली कानं वेध घेतात.. लाईफ बहोत बिझी है साब.. फिर भी यहा हर किसिके पास बहोत टाईम है.. चहाचा अखेरचा घोट घेतला.. टपरिवाला "फिर आना साब, बंबई की बरीश मायूस नहीं करती.. और ट्राफिक तनहा नहीं छोडती..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३