♥
♥ क्षण..! ♥
प्रपंच..!
मी:..चल राहू दे! तुला कशाला हवी सरीवर सर? उगाच अंगावर थेंबांचा असर? ओल तशीही तुझी तुला येते. घरभर वात्सल्याचा सुवास दरवळत ठेवते. मातीची ओढ, तिची तृष्णा आणि उपजण्याची किमया तुला कशाला उसनी हवी? म्हणून राहू दे...
ती: कितीही काही म्हटलेस तरी बाईचं बाईपण आणि स्त्रीचं स्त्रीपण जपून ठेवावं लागतं. उसनं असलं तरी. चौकट आणि उंबरठ्याचा भावबंद एक करतांना भिंतीही मला जिवंत ठेवायच्या आहेत. माझ्या पदराचा वास म्हणून तेव्हा माझं असं काय या घरात याचं उत्तर मला सापडेल. अन्यथा परक्याचं धन म्हणून मला माझ्या माहेरानी बालपणापासूनच तोडायला सुरवात केली होतीचं ना.. म्हणून उसन्या हव्यात सगळ्या गोष्टी माझ्या म्हणून...
मी: ..नाही कुठे म्हणतोय किंवा तुझं अस्तित्व कुठे नाकारुन पुसून काढतोय? शास्वत आहेच ना आणि शाबूत पण आहेच. मग हे सगळं नुसतं काहीतरीच नाही का..?
ती: ..तुला खरंच कळतंय का मी काय मागतेय? ते खरंच कळतंय तर तुला समजत तरी काय नाहीये? खिडक्यांची पडदे बदलावीत आणि पुन्हा घराची नवीन रंगरंगोटी करावी एवढी छोटी गोष्टचं आहे ही. पण तुझं नडतंय कुठे..?
मी: ..माझं काही नडत नाही. अडतपण नाही. बसलेल्या संसाराच्या घडीला पुन्हा विस्कटण्याची माझी इच्छा होत नाहीये...
ती: ..अच्छा! असं आहे तर. मग एक सांग घडी केलेली चादर पण चुरगळतेच ना? आतल्या आत ओल धरून तिची धागी कुजतातच ना? एकदा घडी उघडून ऊन दाखवायला नको..?
मी: ..तुला त्रास होईल. जो मला नको वाटतोय तुला पुन्हा व्हावा..!
ती: ..आठवणींचा कप्पा उघडला की, जखमा उघड्या पडतातच असं होत नसतं. त्रासाचं म्हणशील तर तो कप्पा उघडू न देण्याचा त्रास होतोय. हक्कय मला तर वर्तमानात आणि भविष्यातच पुढे-पुढे का जात राहू? थोडं मागेही डोकावून पाहू दे ना! कदाचित पुढचा प्रवास भूतकाळात डोकावून बदललेल्या वर्तमानाचा होऊ शकेल...
मी: ..ठीक आहे. तुझा हा स्त्री हट्ट मी पुरवणार पण माझी अट आहे. कोसळायचं न बिथरायचं नाही. विखुरलेलं रेंगाळत वेचत बसायचं नाही. प्रपंचात घुटमळत मुके हुंदके घ्यायचे नाहीत. एवढीच अट आहे माझी...
ती: ..कबूल..!
(..आयुष्याच्या मागच्या पानांवर लागलेली धूळ झटकल्यावर; तुमचं, माझं, आपलं-प्रत्येकाचं हे एक पुस्तक थोडं मागे जाऊन वाचण्यासारखं आहे. काही धागेदोरे हाताशी लागतीलही. काही गाठी पडतीलही. थोडं आयुष्य सैल झाल्यावर या गाठोड्यात काय मिळतं ते तुमचे तुम्हीच बघा. वाटलं तर कळवा पत्ता तुम्हाला माहिती आहेच..!
योग्यवेळी लख्ख प्रकाश 'उजाळे'..
कणकण सरकता आभाळ काळे,
बघ तुझे तुला काय-काय गवसते..
मला खुनावतायेत ती ही बंद ताळे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment