Powered By Blogger

Wednesday, February 28, 2018

कर्ण..! :-)





♥ क्षण..! ♥

कर्ण..!

जेष्ठ असूनही उपरा
कुंतीचा दोषच सारा..

कुंडल ती देऊन टाक
दारात इंद्र उभाच कोरा..

प्रारब्ध खोटंच आहे
कृष्णही भासच खरा..

शाश्वत निखळ मैत्री
मतलब युद्धच जरा..

कुणासाठी का म्हणून
क्षत्रिय पिंड माथी धरा..

मनगटातली धमक टाळून
सूतपुत्राला लाजिरवाणे करा..

कर्ण वध नव्हे हत्याच ती
हत्येचेही दान पात्रात भरा..

दानशूर अजून तितक्षित
उल्लेख श्री मुखीच बरा..

जाणिले कर्म अन् धर्म
तद् कर्ण तोचि कबिरा..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, February 27, 2018

कातरवेळ..! :-)




♥ क्षण..! ♥

कातरवेळ..!

दोन मनांची इथे भेट होत असते
लाट न् किनाऱ्याचा जणू संगमच,
कधी भावविभोर कधी अधिरही
अथांग - उथळ नात्यांचे ते बांधच..

कधी उन्मत स्पर्शाचे खोल डोह
कधी हळुवार निसटती वाळूच,
ठोस पावला-पावलागणिक ठसे
चिन्ह-प्रतीकं-शिल्प अन् शिंपलेच..

क्वचित मग ओंजळीत प्राजक्त
श्वासात गंधाळलेला धुंद चाफा,
कधी या ओठांवर बडबड गीत
कधी हिरवळीचे नजारे दुतर्फा..

खुशाल राहा स्वतःच्या ऐटबाज तंद्रीत
कुणासाठीही काही केल्या थांबत नाही,
बोलके असतात डोळे अन् चेहरेसुद्धा
मुके शब्द कुणाचे हल्ली मी वाचत नाही..

उगाच मग टोलवा टोलवी विषयांची
आणाभाका दिल्या-घेतल्या शपथांची,
मुद्दामचा रुसवा अन् खोटा समझोता
क्षणभर डोहाळेच जणू कातर'वेळेची..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Friday, February 23, 2018

क्षण..! (२०११ ते २०१७)




♥ क्षण..! ♥
या गोष्टीची सुरुवात २०११ साली 'क्षण' फेसबुक पेज स्वरुपात वीट रचून झाली.. त्यातलेच काही "क्षणभंगुर क्षण.."
गोष्ट १) साल (२०१२-१३)
आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं
कारण मनात त्या साठवून ठेवता येतात!
पण "क्षण" सांभाळणं खूप कठीण असतं
कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात..!
गोष्ट २) साल (२०१३-१४)
शब्दांचे भक्षण ठीक नाही
अन् माझे लक्षण ठीक नाही,
कागदा! जरा सांभाळून ठेव
माझें 'क्षण' हे कुणाचे मन नाही..!
गोष्ट ३) साल (२०१४-१५)
#तिला
क्षणांची आज उलथापालथ केली
नेमकं काय हरवलंय कळत नव्हतं,
काहीतरी राहिलंय-सुटलंय जाणवलं
मन भरलंय सष्ट बोलता येत नव्हतं..!
गोष्ट ४) साल (२०१५-१६)
दिवसभर मी क्षणांनी कागद भरले
अन् ते रात्री तिच्या उशात सापडले,
फार छळतोस तुझ्या शब्दांनी मला
म्हणून मग मीही तुला छळून घेतले..!
गोष्ट ५) साल (२०१६-१७)
क्षणांची व्यथा काय सांगावी
तुझी ओंजळ रिती ती रितीच रहावी,
दिलं अगदी देऊनही टाकलंय
तरी ओरबडायला तू पुन्हा धजवावी..!
गोष्ट ६) साल (२०१७)
क्षणांची चौकट अन् उंबरठा
वेदनांची खुशामत जखमांची निंदा,
कधी निव्वळ नावाला मर्यादा
कधी तोट्यातलाही तुझाच फायदा..!
गेल्या ८-९ वर्षांचा यात 'क्षणांचा' सारांश प्रवास आहे.. ज्यांनी तो पाहिलाय त्यांना सांगणे जरुरी नाही. ज्यांना ठाऊक नाही त्यांनी अर्थ काढायला हरकत नाही..!
बाकी एक कोरं पान मी सगळ्यांच्या पुढ्यात ठेवलंय कायम, "ते माझं ("क्षण")पानही खूप बोलकं आहे म्हणतात काही. म्हणून मी कुणालाच काहीच सांगितलं नाही. तेव्हाही, आताही, कालही, आजही आणि उद्याही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

मन भरलं..!

♥ क्षण..! ♥

मन भरलं..!

पंच पक्वानाच भरलं
ताट देखील मी पाहिलं
अन् त्याच ताटावरून
उठणं देखील माझं झालं..

भुकेच काय ते राहिलं
कधी पोटभर मिळालं
कधी नुसतंच पाणी पिलं
काळजीच कारण नसलं..

तरी भूकही परिचयाची
अन् ताटही मग उपऱ्याची
भाकर तुकडा उचलावा तर
त्यावरही नजर कुत्र्याची..

भरल्या पोटाने बात केली
भरल्या ताटाला लात मारली
वेदना कुठली सांगू वेगळी?
गोष्ट होती ती गोष्टच राहिली..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Thursday, February 22, 2018

मायची भाकर..! :-)


♥ क्षण..! ♥

मायची भाकर..!

दीस बघ्या काय आयले
मायची भाकर कमी न
हात ज्यास्ती करपाले..

मले म्हणते थापत जाय लेका
इथं पोटाले भुकेले साऱ्हेच
तोंडाले कुनीबी नाय रं मुका..

कमवायले बी जरासा षिक
आयत खाऊ हायस मेल्या
जगात फुकट मीळत नाय भीक..

त्यो भिकारी बग भुकेनंचं मरतो
मळकट त्यो पैकं देणारा असतो
आनी तू द्वाड बकाबका हादडतो..

चांगला त् तरना ताठा मर्द हायस
मग कशा पाई ह्या कईता करतूस
सोड ते, जाय दो पैकं कमायास..

आणि मग...

मायनं हांथरून धरलं, न् ह्यो बैल जाडीकं जुंपलं
हकीम, बाबा, भोंदू न् ते डाक्टर समदं-समदं केलं,

पर खुळ्या मायेनं साद डोळं बी नाय ओ उघडलं
एक येळच्या भाकरी पाईच तर ह्ये समदं घडलं,

माय सांगत व्हती न् म्या? नाय तीचं काय अयकलं
मीनं कईतेतच मायला बैणाबाई व्हतं करुन टाकलं,

आता माय बी न्हाय, न मले फार भुक बी न्हाय
करपल्या हातांची माया बी या डोसक्यावर न्हाय,

"अरे संसार.. संसार.. जसा तवा चुल्ह्यावर.."
म्हायी माय बी गुनगुनायची थापत भाकर

अन् आता...

आता माय बी न्हाय, न मले भुक बी न्हाय
करपेल्या हातांची माया बी डोसक्यावर न्हाय..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, February 21, 2018

उद्रेक..! :-)


♥ क्षण..! ♥

उद्रेक..!

मी.. गुलमोहर वठलेला
अन् तू तुळस अंगणातली,
नाद-निनाद म्हणे मंदिरी
ओठी अंगाई तू गायलेली..

भाव आरोही-अवरोही
शृंगार भरती-आहोटीही,
मर्यादेत चौकट-प्रतिष्ठा
घराण्यात भले बुरसटही..

आव तेवढाच हा वाव
सप्तपदीला काडी लाव,
चूल-मूल भ्रांत सामाजिक
दावणी तुझीही पारंपरिक..

कणा ताठ, तोऱ्यात माठ
डोळा दिसे नागडी पाठ,
आवळे फास रेशीम गाठ
वांझ दुधाळ नदीचा काठ

मांडवात शह आणि मात
षंढ नात्यांचे कुत्सित घात,
विलाप ना ऐकला आक्रोश
अर्पिली समिधा भाजत हात..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Sunday, February 18, 2018

बाप..! :-)



♥ क्षण..! ♥

बाप..!

एकदाही कधी तो चरकला नाही
राबला-रापला पण करकला नाही,

झिजवून तळवे सहज हसत होता
उन्हातून सावलीत सरकला नाही,

दुनियेत आणलं दुनियादारीत पाडलं
जग दाखवत जगाला टरकला नाही,

देत गेला अजूनही देत आलाय सर्व
कमजोर होऊन कधी परतला नाही,

साठवत आला आठवत गेला कायम
धाक देऊन समाचार उरकला नाही,

धीर देतो, तापट वागतो, छत्र बनतो
झगमग दाखवून कधी हरकला नाही,

कधी तो सांगितला गेलाही स्पष्टपणे
बाप झाल्याशिवाय समजला नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, February 14, 2018

एक क्षण.. देशील..? :-)

😍
एक क्षण.... देशील??

अबोल मिठीत चिंब-चिंब
भिजलेला एक क्षण देशील ?

अश्रूंच्या थेंबात ओंजळीने
टिपायला एक क्षण देशील ?

एकटी तू एकटा मी आभासी
स्वप्नांचा एक क्षण देशील?

तुझ्या प्रेमाचा, अबोल बेधुंद
स्पर्शाचा एक क्षण देशील ?

चांदण्यांच्या बगीच्यातला
मनमोहक एक क्षण देशील ?

फक्त सोबत तुझ्या बनून तुझी
सावली चालायला एक क्षण देशील ?

फक्त तुझ्याच सोबत आयुष्य जगण्यासाठी
तुलाच मागितलेला हा एक क्षण... मला देशील ?
.
-✍🏻मृदुंग®

Monday, February 12, 2018

विसावा..! :-)


♥ क्षण..! ♥

विसावा..!

क्षणांमध्ये रमलेला
क्षणभंगुर विसावा,
जणू उनाड तडस
मी श्रावण म्हणावा..

अनभिज्ञ क्षत्रियाचा
तो वेध अचूक व्हावा,
मुकी श्वापदे करुण
हिंस्त्र दशरथ बनावा..

आक्रोश जन्मदात्याचा
पुत्र वियोगात देह टाकावा,
अजाण वंशाचा दिवाही
कस्तुरी हट्ट पुरवत राहावा..

युद्ध पुकारलं, जिंकलही
स्त्री संशयित राम उरावा,
मर्यादा पुरुषोत्तम नव्हेच
रावण तेव्हा भला सांगावा..

थोडं थांबणं झालं, अविवेकी
तुळस जाळून अभंग का गावा?,
पेटवून भव्य चिता अंतर्मनात
रामराज्य निव्वळ एक कांगावा..

आता जरा विसावू या वळणावर
कुटीबाहेर राम-रावण याचक ऱ्हावा,
दान संशयाचे एकवटून सांगा मी
पुन्हा-पुन्हा राम कशाला पुजावा..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Sunday, February 11, 2018

अधिक..! :-)


♥ क्षण..! ♥

अधिक..!

आपले व्यवहार बरोबर असतातच, असं नसतं. सुखाचं भांडवल साठवतांना हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्याजाची परतफेड वजा करणे निश्चित नैतिकता असेल. आठवणींची गोळाबेरीज मात्र कायम गुणिले ठेवावी. बरोबरीत काहीच हाती उरत नाही तेव्हा; स्वप्ने भागीले करुन टाकावीत. ओंजळीत जमा झालेले कदाचित, अधिक असेल..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३