Powered By Blogger

Friday, March 30, 2018

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-४)




♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-४)

..आपल्यासारखे वेड आणखी कुणाला तरी आहे. मग ते नाटक करण्याचे असो, नृत्य करण्याचे किंवा स्वतःचे वेगळेपण जपण्याचे. एकाच मताच्या दोन माणसाचं सूत कधी जुळत नाही. एकमेकांना पूरक असण्यासाठी विरुद्ध दिशेची दोन टोक एकत्र यावी लागतात. सर्वगुणसंपन्नतेची अशी नैतिकता आहे.

..सतत ना शोध चालू असतो आपला. काही तरी हवं असतं. अर्थात काय शोधत असतो आणि काय हवं असतं याचं उत्तर स्वतःकडे नसतं. पावलाखाली आलेल्या अनाहूत पाऊलवाटेच अहोभाग्य म्हणत ज्याचा-त्याचा प्रवास सुरु राहतो. काही मैल चालून होतं. काही वर्षांची कॅलेंडर बदलून होतात. प्रवास काही रंगतदार होत नसतो. झालेला प्रवास मात्र ओझं राहून गेल्यासारखा रुतत राहतो.

..आणि मग.. नियोजित नित्यक्रमाला फाटा देणारा एक दिवस उगवतो. मनातल्या बंद खोलीत धूळ साचलेलं एक नाव जे "तुझं" असतं ते स्पंदनात नकळत धडधडत. तेव्हा शरीराने थंड पडायचा निर्णय स्वतःच घेतला असतो. डोळे भूतकाळात आणि वर्तमानात काय बदल झालाय याचा शोध घेत राहतात. बदलणं निसर्गाचा नियम असूनही तू कधीच बदलू नये. अशी इच्छा मनातल्यामनात मी तरी "श्रे" तुझ्या बाबतीत करत असतो.

..बोलण्यात तू पटाईत आहेस. आज जवळपास आठ वर्षांनी मला असं पाहून तसंच खिळून बघण्याची सवय काही तुझी गेली नाही. तू ही काय करशील म्हणा या सौंदर्याचं हे खिळून राहणेही दाद देणेच आहे. अन्यथा काजळाच तीट लाऊनही दृष्ट लागायची ती आपल्याच माणसाची लागते. तू वाटतोस त्यापेक्षा जरा जास्तच रसिक आहेस "धृ." तुझ्या या रसिकतेची मिळणारी ही दाद जागेवर खिळून पेलवण माझ्यासाठी अवघड आहे.

..आठ वर्षांनी समोर आलेलं खरं की खोटं? तसही या आठ वर्षात फक्त एकदा डोळे भरुन बघायचं यासाठी कितीतरी दगडांना नवस लावले. आज ते फळफळले तर आतून ओसंडत न जाता स्वतःला अन् मनाला आवरण का आणि कशासाठी होतं? मागितलं होतं ते झालं. आता पुढे काय? की आज इथे शेवट? नजरेत दाटून आलेले प्रेमाचे भाव बदलून नजरेचा एक भ्रम एवढंच शाश्वत ठरतं. पाठ दाखवून चालावं लागणारच आहे तसही.

..आयुष्य या पुलावरुन आणि पुलाखालूनही एवढं पाणी वाहत गेलंय की त्याच्या प्रवाहात मनासारखपेक्षा प्रॅक्टिकल जगणं खूप झालंय. याची सवय एवढी दांडगी झाली की समोर आलेलं पाहूनही ते पाहून न पाहिल्यासारखे करणे अवघड गेलेच नाही. वास्तवात सांगायचं झालंच तर पुन्हा ती प्रश्न तो मनाचा गुंता नकोच.

.."श्रे" सुद्धा वेगळं असं काही वागत नाही. तिनेही पाठमोरी होऊन स्वतःच मन आवरलं असतं. मनात भडकलेल्या आगीत पाणी स्वतःच स्वतःला टाकावं लागतं. ते कसं तेवढं नाटकीय आणि प्रासंगिक असतं. समजदार वागण्याची पडलेली सवय मूर्खासारखं कुठे वागू देत नाही. मग एकमेकांपेक्षा स्वतःच स्वतःची जिरवावी लागते. पण एकदा भेटून सगळं सांगायचं होतं त्याचं काय? म्हणून पडतं घेतलं जातं. वळून बघावं तर "धृ" चालता झालेला असतो. टांगणीला मात्र जीव तेवढा उरलेला असतो.
..प्रेमाचं प्रॉडक्ट् नसतं म्हणून अन्यथा मार्केटिंग स्ट्रॅटेजी काहीशी वेगळी करून गोष्टी आपल्या माथ्यातून समोरच्याच्या माथी मारता आल्या असत्या. पण नाही ना होत नेहमी आपल्या मनासारखं. हे माहीत असून आपण स्वतःला का पटवून देत नाही? की स्वतःच स्वतःला आरसा दाखवू नये म्हणून असं? पण दररोज सकाळी आरसा आपण बघतोच तेव्हा हे असलं काही वाटतं नाही. पण आपलं कोणीतरी तुटक वागून आरसा दाखवला की मग तळपायाची आग मस्तकात.

..एकदा जवळ येऊन विचारायला हवं होतं का आपण? काय 'श्रे' कशीयेस? छे.. छे.. त्या मांजरीचे नखं मला ठाऊक आहेत आणि खमंग बोलणे तर आई..आई.. उभा फाडून खाऊनही ढेकर त्या बयेने काही दिली नसती. आज थोडी ओळखतो. चांगल्याने ओळखतो. आता जिथं जाईल तिथं आमनासामना निश्चित आहे. माझ्या पाठ दाखवून निघून जाण्याने घायाळ वाघीण झाली असणार आहे. हे सावज आता एवढ्या सहजासहजी तोंडाशी नाही येणार म्हणावं. आठ वर्षांच्या तपश्चर्येची उपासमार आहे. क्षुधा अशी सहजरित्या शमणार नाही. बोलावं तर लागेल हे लिखित आहे. कसं आणि कुठे ते अधोरेखित अजून व्हायचं बाकी आहे. तोवर जळ तिकडे आतल्याआत. अबोलीची धुंद वेडी भाषा एवढ्यात पुन्हा शिकावी लागणार आहे. जरा जपून..
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

Friday, March 23, 2018

आयुष्यावर..! :-) मराठी सुफी ८



♥ क्षण..! ♥

आयुष्यावर..!

..समज आली तेव्हा गोष्टीला सुरुवात झाली... काही वादळे स्वप्ने बेचिराख करुन गेली... सावरत? आवरत आलो स्वतःलाच स्वतःपासून... कधी तू निमित्त झाली तर कधी कारण विनाकारण... बोलणं मग माझं तारण झालं... सजलेलं गाव राख झालं... अंगणातला गुलमोहर उभ्याने वठवला मी... तुझ्या आवडीचा परिजातकही जाळला मी... सुगंधाचा गंध दर्प करुन टाकला... पुसता आलं ते पुसलं... जे हाती आलं ते उधळलं... उरलं मग निव्वळ शरीर... असतील-नसतील तेवढ्या यातनेत मनाला बांधलं... आजवर मग तू किंवा मी काय साधलं..?

आयुष्यावर काही बोलतांना
माझी दातखिळी घट्ट बसली,
सांभाळून बोलता-बोलता मी
जीभ सहजच छाटून टाकली..

नको पुन्हा त्या आणाभाका
नकोच स्वप्नांचीही आश्वासने,
असेल नसेल सर्व ओवाळून
खुशाल वैरागी होऊन जगणे..

काही मागणं नाही घेणं नाही
स्वतःला लुटणं लुटावण नाही,
आर्जवे ना कसली ना अभंग
बंद श्वासांचेही उसासण नाही..

वेदना माझं कर्मही अन् धर्मही
टाहो कसलाही फुटलाच नाही,
वलयांच्या गर्ततेत शोध एकदा
आर्त मी मलाही वाटलाच नाही..

..क्षण कुठल्या क्षणावर बोलू?.. आयुष्यात पुढे येणाऱ्या?.. हातून निसटलेल्या?.. की सहज आयुष्यातून वेगळं केलेल्या?.. शतकी आयुष्यही क्षणभंगुरच असतं... बेरकी वेळ प्रत्येकक्षणी स्वतःचा पदर ढाळत जाते... स्वतःचे डोळे मिटले तरीही जाणिवांत सगळं आढळत जाते... उणीव मग कसलीच राहत नाही... प्रवासाची चिंता उरत नाही... चितेवर निजून मन मरत नाही... लाचार आयुष्य सरता-सरत नाही... योजणं मग कसली कशासाठी करावीत?.. फसव्या नाट्यप्रयोगाचे प्रयोजणं काय मांडावीत?.. करमणूक म्हणून जगण्याचं नाटक प्रत्येकाला करावं लागतं... भूमिका कोणती? ज्याचं त्यानंच ठरवावं लागतं...

बेरकी लुटारू आयुष्याची वृत्ती होती
थोडी याची अन् त्याची आववृत्ती होती,

मी समजत होतो साधं सरळ सोप्पच
कपटी नीच माणसाची प्रववृत्ती होती,

वळणावर वळवलं सावरलं आयुष्याला
ढोबळ बेढब जगण्याची आकृती होती,

निश्चिल झालो प्रवाही स्थिर होऊन गेलो
वेगवान लाटांसह मी वाहनं प्रकृती होती,

माणसात येऊन माणसात मिसळलो मी
दंश झाले कित्येक सर्पांची ती कृती होती

विषारी ना बनलो माझी शाबूत स्मृती होती
स्वतःच सर्प असण्याची मला विस्मृती होती..

..इच्छा नसते पण आयुष्यावर बोलावं लागतं... झालं-गेलं मातीत मिसळावं लागतं... तरीही माती वर उकरली जाते... पुरलेलं थडगे पुन्हा नासवले जाते... कुणाचाही दोष नाही यात... नव्याने उगवायला बिजालाही मातीत रुजावे लागते... अंकुरने स्विकारुन वृक्षाची आवरणे झाकावी लागतात... कर्म म्हणून फळांची देणगी द्यावी लागते... अंती धर्म म्हणून चिंतेचे लाकुडसुद्धा व्हावेच लागते..!

स्वतःच्या आयुष्यावर काही बोलतांना
मुक्या वेदनांचा आधार घ्यावा लागतो,
मनालाही सुखाचा नव्हेच तर दु:खाचा
अचुक पत्ता माहिती असावा लागतो..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

वेदनेची एक कळ..! :-)


:-)
क्षण...!

"............." (मथळ्याला नाव तुम्हीच द्या...!)

तुझे तरी बरे आहे रे, लिहून मोकळा तरी होऊन जातोस.. आमचे काय बोलायलाही नाही जमत अन् कुणाला काही सांगायचे ठरवले तर शब्दही तिथेच साथ सोडतात... काय अन् कसे काय बोलायचे समजतच नाही बघ... खरे तर मनातले व्यक्तच करता येत नाही. नकळत काय अगदी ठरवून देखील नाही... काय विचार करशील, काय समजशील नुसते विचार मनात येतात अन् मनातच राहून जातात. असे का होतेय हल्ली कळत नाही...
सांगायचे नाही असे काही नाही पण उगाच तुला का म्हणून सांगावे माहित नाही.. तुला तसही काही वाटत नाही म्हणुन असेल कदाचीत, जे मी तुझ्याजवळच सहज व्यक्त होते. अगदी माझे मनही मोकळे होऊन जाते.. तुझं नंतर काय झाले? तुला काय वाटले? साधा विचार तेव्हा काय कधीच कुणाला पडत नाही. असे कसे रे तुझ्या बाबतीत होते... काय करतोस काय आमच्या या बोलण्याचे...?
अगदी सुरुवातीपासून विचार करायचा म्हंटले ना तर एक विचार हमखास आधी येतो. तो हा की "आज काही तरी बिनसले आहे तुला काहीतरी अगदी मोकळेपणाने सांगायचे आहे" हे तुला कसे रे कळते? अगदी वेळ काही ठरलेली नसते. म्हणतोस तरी ऐकून घ्यायला तू सवडही लगेच कशी रे काढून घेतोस? तुझा वेळ खराब करतोय की काय अजिबाद जाणवू देत नाहीस. असा कसा रे तू आता विचारत आहे, बोलत आहे तरी घुम्यासारखा फक्त ऐकत आहेस... तुला नाही वाटत का असे कधी? की आम्ही उगाच तुझ्याशी बोलतो, तुला काही सांगतो, तुला काही विचारतो ? नक्कीच काहीतरी वाटत असेल ना तुला? मग कधी तू तुझ मन का मोकळ करत नाहीस? कसे जमते तुला सगळे मनातच ठेवायला? गुदमरत नाहीस का? इतके बोलूनही तू एवढा शांत कसा राहू शकतोस सांग की...!
काय सांगू आता...?
प्रश्नही तुमचेच आणि उत्तरेही तुमचेच.. बस प्रश्नानंतर उत्तर देण्यात जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर माझ्या शांत असण्यात आहे..! वाटलेच तर भरभरून बोलून मोकळा होऊन जाईल पण नंतर काय? आपल्यामध्ये काही बाकी अन् शिल्लक ठेवले नाही तर जगण्याची मजा काय असणार आहे? अधूरीच ठेवतो मी प्रत्येक गोष्ट. का ते यासाठीच कारण पुढे काहीही नसते. बस आपले मन पुढे काही असेल, आहे याची वाट पाहत तरी राहते. खोटी आशा बाळगून... माझंही असेच आहे. काही बाकी अन् शिल्लक ठेवायचे व्यक्त न करता. मग कोणी काहीही विचार करो, जे समजायचे ते समजो... मनात मात्र काहीच नसते व्यक्त करायला. मग शांतता जिव घेणी होत आली का बदलायचा विषय आणि आशय! नकळत मग पुन्हा सुरूवात करायची स्वत:च्या प्रत्येक प्रश्नाची स्वत:च्याच उत्तरा सोबत..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, March 21, 2018

फेसबुक लव्हलेटर..! :-)


♥ क्षण..! ♥

फेसबुक लव्हलेटर..!

फेस बुक स्टेटस सारखे
कधी मलाही तू लाईक कर,
फ्रेंड रिक्वेस्ट सारखे तू
कधी माझे प्रेम एक्सेप्ट कर..

माझ्या ऑनलाईन येण्याची
वाट बघत तुझी नजर भिर-भिरते,
"क" पासून सुरु होणाऱ्या प्रश्नांचा तू
चॅट नावाच्या ऑप्शनमध्ये ढीग लावते..

प्रत्यक्षात बोलत नाही तेवढे
कि-बोर्डवर खट-पटत असतात,
चेहरे वाचणे हरवले आहे आता
शब्दांमागच्या भावना दिसतात..

कोण कुठले काहीच घेण-देण नाही
तुझे माझे वॉल टू वॉल अपडेट,
तुझ्याशी बोलून छान वाटलं मला
रोजच स्क्रीनवर फेस टू फेस भेट..
------------------------ ✍️ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, March 20, 2018

शेजारी..! :-)



♥ क्षण..! ♥

शेजारी..!

तुला बघितलं न बघतच राहिलो
माझा मी तर कणभरही ना उरलो..

देखणं सौंदर्य तुझं भाळी चंद्रकोर
ओठांवरच्या लालीत आर्जवे हरलो..

छटा यौवणाच्या कितीतरी देहावर
रेष-अन्-रेष बोटांनी स्पर्शत गेलो..

कंपने कितीतरी झाली स्पंदनांची
गतिमान हृदयाशीच एकदम भिडलो..

ओठांच्या आव्हानात्मक हुंकारांना
गालांच्या प्रदेशावरून ओघळत आलो..

देहाचा मादक गंध जणू कस्तुरीच
ठराव शय्येचा व्यवहारी बनवत गेलो..

बोटांची गुंफण अन् मिठीचे विळोखे
ओरखडे रातींच्या रतीवर ठेवत गेलो..

धुंद बेधुंद होत गेली कितीतरी रात्र
तुझ्या रोमारोमात मी ठसकत राहिलो..

चेहरे संतुष्ट न् तप्त देह तृप्त झाले
विलग ओठांसह मिठी सोडवता झालो..

विसरभोळे अंदाज कायम ठेवून मी ही
हातभर अंतरावरचा शेजारी बनता झालो..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Sunday, March 18, 2018

गुढीपाडवा..! :-)



♥ क्षण..! ♥

गुढीपाडवा..!

ग्रंथांचा आधार घेता पुराणात पाडव्याबद्दल ब-याच कथा प्रचलित आहेत. यात सर्वश्रुत असलेली कथा अशी की, चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम-लक्ष्मण सितेसह अयोध्येला परतले होते. रावणाचा वध करुन शांतीचा आणि एकोप्याचा धर्म पुन्हा प्रस्थापित झाला होता. चौदा वर्षानंतर प्रजेला पूजनीय असलेल्या त्यांच्या राजाच्या स्वागत प्रित्यर्थ संपूर्ण नगरात प्रत्येक घरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते ते राम नवमीला संपते अशी प्रथा आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान उरकून गुढी उभारली जाते. गुढी अर्थात एका शुचिर्भूत काठीला नवं कोरं कापड किंवा नवी साडी बांधली जाते. त्यावर साखरेची किंवा गोड गाठीची माळ, कडूनिंबाची पाने बांधली जातात आणि वरून कलश पालथा घातला जातो. हळदी-कुंकवाच्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी गुढी घरातल्या अंगणात पाटावर उभी केली जाते. गुढीला 'ब्रम्हध्वज' असेही म्हणतात कारण ब्रम्ह सृजनाचे प्रतिक आहे. सूर्याची किरणे गुढीच्या स्पर्शाने घरात पडली जावीत आणि त्यायोगे आनंद अन् नवचैतन्याने आगमन आपल्या घरात-मनात व्हावे असा यामागे हेतू असतो. आणि म्हणूनच मराठी मनामध्ये ह्या सणासाठी एक ममत्वाची आणि अस्मितेची भावना खूप आधीपासून रुजत आली आहे.

विधिवत पूजा झाल्यावर कडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो. आयुर्वेदात कडूनिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. पुढे उन वाढत जाऊन उष्माघातात वात, पित्त, कफ यांच्यात संतुलन ठेवण्याचा पूर्वजांच्या ह्या पुरोगामी बुद्धीचा कल आपल्या लक्षात येतो. नवीन वर्षाचं स्वागत हर्ष-उल्हासाने व्हावे, साखरेच्या माळेसारखा गोडवा घरात असावा असा उद्देश माळेचा असतो. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला गुळ-खोबर्‍याचा नैवैद्य दाखवून नारळ फोडून गुढी उतरवली जाते. साखरेची माळ लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते.

या सोबत गुढी पाडव्याला मराठी अस्मितेचीही जोड आहे. गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील. याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आढळतात. सातवाहनाची राजधानी होती 'प्रतिष्ठाण' म्हणजे महाराष्ट्रातील 'पैठण'. तर अशा या सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. जे कार्य छत्रपती शिवरायांनी परकीय मोगलांना हरवून केले तेच कार्य सातवाहनाने पहिल्या शतकात करून महाराष्ट्रातील सर्वात पहिले साम्राज्य स्थापन केले. याच दिवशी सातवाहनाने परकीय शकांना धूळ चारली आणि महाराष्ट्र भूमी स्वतंत्र केली.

हुतात्म्यांचे पुण्य स्मरण करुन आजही आपण नवी उमेद डोळ्यापूढे ठेवून आगेकूच करत आहोत. यात सणाची पार्श्वभूमी जाणून घेणं अन् ते पचवणं थोड कठीण होऊन जातं तरीही नावीन्याची मुहूर्तमेढ प्रकर्षणाने मागचाच आधार घेऊन रोवली जाते हे विसरून चालणार नाही. कधीकधी भूतकाळ जरी कटू वाटत असला तरी आज आपण सर्वार्थाने स्वतंत्र असून महाराष्ट्राला प्रगतीपथावर बघत आहोत हे विसरून चालणार नाही. अर्थात घडून गेलेल्या गोष्टी निश्चित बदलणार नाहीत पण जर काही बदलू शकेन तर तो 'आज' आहे. त्यामुळे हा आपला अखंड सांस्कृतिक वारसा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायचा आहे. आणि सोबतच मनात मांगल्य जपताना स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा दानवी वृत्तींचा नायनाट करून उज्वल आणि पवित्र महाराष्ट्र घडवायचा आहे.

एक मुलगी शिकली तर एक घर शिकते. आपल्याला आपल्या विचारांना अजुन परिपक्व आणि बळकट करावे लागणार आहे. जळगावच्या बहिणाबाई ते वर्धा जिल्ह्यातिल गाव पिंपरी मध्ये जन्मलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कर्तृत्वाच्या पणत्यांना प्रत्येक घरात उजेडासाठी झटावे लागणार आहे. जिद्द कधीच संपत नसते आणि हरतही नसते. सणासुदिच्या दिवसांचे महत्व असेच असते. पुन्हा एक नवी उमेद अन् नविन ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्राचा पुढचा ढाचा अजुनच-अजुन सुदृढ तसेच कार्यसक्षम बनवावे लागणार आहे. अर्थात फ़क्त विचार मांडून अथवा त्यांना फ़क्त सांगून काही बदल त्वरित दिसुन येणार नाहीत. विचारांवर ठाम राहून आपण आपलंच घर आधी सुधरवायला सुरुवात करायला हवी आहे. आपल्या एका घरापासुन सुरु झालेली सुधारणा अजुन दोन घरात पोहोचत जाते. कासव गतीने का असे ना पण सुरुवात करायलाच हवी आहे.

सध्याच्या घडामोडी पाहाता फक्त वादच उरले आहेत. घरघुती वादापासुन, समाजवादा पर्यंत. या सोबतच राजकिय वादही हल्ली चर्चेत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर बर्‍याच गोष्टींना तोंड फुटत असते. या वादात न पडता महाराष्ट्र घडवायला कसा हातभार लावता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे. तरुण पिढीचा कल पाहाता 'स्त्री' मनाचा उलगडा फारसा झालाच नाहीये. चुल-मुल याच्यापुढेही 'स्त्री'ची कर्तबगारी वखाणन्यासारखी आहे. अत्याचाराविरोधात न्याय मागण्याचाही तिला पुरेपुर हक्कही आहे. दरवेळी 'स्त्री'कडे उपोभोगाच्या अन् सहानुभुतीच्या नजरेने न बघता त्यांना स्वरक्षणासाठी प्रेरीत करुन 'स्व' रक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. चांगल्या प्रववृत्तीची वाईट प्रववृत्तीवर झालेला विजय दिवस अन् झालं-गेलं विसरुन घरात नव्याने रचलेला आयुष्याचा खेळ हसत खेळत, मतभेद गळून एकमताने आनंदाने साजरे करण्यात सुखाचा खरा अर्थ आहे.

आनंद घ्यावा अन् आनंद द्यावा,
आनंदात व्यवहार कधी नसावा..!

- पियुष प्रकाश खांडेकर (✍ मृदुंग®)
kshanatch@gmail.com
khandekar.piyush@gmail.com
7387922843


Saturday, March 17, 2018

बोथट..! :-)




♥ क्षण..! ♥

बोथट..!

आपलं नेमकं काय बिनसलं
शक्य होतं तेवढं सारं सावरलं..

तुझं तू पण मी शाबूत ठेवून
माझं मीपण मात्र मी झुगारलं..

सांभाळून सांभाळायचं किती
शहाणं होणंच वेंधळेपण झालं..

तुझी पावलं पुढे गेली अंतरभर
चौकटीचे नियम मी ही आखल..

जाणिव झाली तुला माझी तेव्हा
मी तुझं सगळं अस्तित्व उधळलं..

हवा तेवढा वेळ दिला अन् संधीही
तरीही तू तुला जे हवं तेच तर केलं..

आता पुन्हा कसला प्रश्न अन् उत्तर
तू भूतकाळ होती एवढीच शक्कल..

एकदा दोनदा मागायलाही आलीस
सगळंच ओवाळून तुला चालतं केलं..

आता कसलं नातं अन् नात्यांची वीण
आपलं नातं सडलंय हे सत्य स्वीकारलं..

पुन्हा गाठ नको अन् गुंतागुंतही नको
तुटलं-तोडून टाकलं हे चांगलंच झालं..

ना कसली खंत आणि कसलीच पर्वा
तू मागितलं मी दिलं अन् सगळं संपलं..

तुझा निर्णय न् त्यानंतर माझा निर्णय
या विषयात मग आणखी काय उरलं..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, March 14, 2018

मी - मृदुंग..! :-)





♥ क्षण..! ♥

मी - मृदुंग..!

निंदा प्रिय अन् स्वतःचा निंदकही मी
स्तुतीच्या बोलक्या शब्दांवर भाळणाऱ्या
उथळ प्रेयसीचा सदैव कट्टर वैरीही मी..

आभूषणे माझी असतात मग दूषणेही
मला मग खवचटपणे ते वादळही बोलतात
अन् वास्तवात पसरलेलं रुक्ष काजळही..

असण्यापेक्षा नसून माझा समाचार
प्रत्येक घटनेचा अति वैचारिक अंदाज
काही बांधण्यापेक्षा मोकळाच संसार..

स्पर्धा असते कायम माझी माझ्याशीच
जग स्वतःला फरफटत ओढत आणत
दखल घेत बेदखल करणं ख्याती अशीच..

मोकळं स्पष्ट वागणं माझं कधीच नसतं
'स्व'जाणीव होईपर्यंत गप्प बसणं इष्टचं
जाणवल्यावर स्पष्टीकरण कारण असतं..

मी अहं वाटतो अन् कर्तृत्वही भासतो
नामनिराळं अलिप्त वेगळाही मी उरतो
नव्याने क्षणभर जगून अनेकवेळा मरतो..

आयुष्याचे सोडून मरणाचे माझे गुणगान
वेदनेला पुढ्यात ढकलून आर्ततेत स्थान
निव्वळ वलय आभासी तेवढंच समाधान..

मी असतो नसण्यातही अन् असण्यातही
स्वार्थी-अभिमानी-उत्कट अन् उद्धटसुद्धा
तटस्थ कागदाच्या शब्दरूपी परिस्थितीतही..

कधी-कधी माझं सहज आकलन करता येतं
या आकलन शून्यतेतही अजाण उरावं लागतं
गुणधर्मी किंवा अति समंजस जगत् भगत्..

कमवायला गमावल्याचा चोख हिशेब असतो
अर्थ-भावार्थ अन् अर्ध्यसुद्धा वाहत नेत जातो
क्षुधा शमवत माझीच उपासमार करत राहतो..

अर्थात अनेक अनर्थ कुटून ठेवत भावशून्यच
माणसे ओळखून पारखून कायम अंतरराखून
दुखावलपेक्षा दुखावलं न् दुखलं न्यायसंगतच..

संबोधायला हे एकच असे माझे नाव नाही
ओळखायला डोक्यात जायला वावही नाही
समजलं तर खूप काही अन्यथा काहीही नाही..

बाजारबसव्यात हा शब्द तेवढा महाग आहे
क्षणाच्या व्यवहारात परवडला-खपवला आहे
विझल्या राखेतली आग एवढा महाभाग आहे..

केल्याची पर्वा नाही अन् जाणसुद्धा नाही
वाटेतील अनाहूत वाटसरू साधी गिणती
तुमच्यासाठी मी माझ्यासाठी तुमची-तुम्ही..

मी ओळखुन फक्त शब्दांचीच रग आहे
तेवढ्यावरच प्रत्येकाची माझीही धग आहे
थोडं आतापूरता बाकी सगळं काही मग आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Tuesday, March 13, 2018

तह..! :-)


♥ क्षण..! ♥

तह..!

श्वासांच्या रणाचा व्यर्थ
एक प्रण माझाही होता,
तुला जिंकवता-जिंकवता
देह एक व्रण झाला होता..

देहावर डागण्या देऊन
कितीतरी सण उधळले,
बिशाद सर्पांच्या दंशावर
संमोहित माझे मन झाले..

काळानीळा देह सजवून
हे अश्रू जरासे गौण झाले,
कायेची अबोल बोलकी
मुखात उसासे मौन झाले..

फुंकला शंख परत-परत
हे षंढ देह गपगार झाले,
देहांचे अन् श्वासांचे तह
शब्दांसह एवढेच उरले..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Friday, March 2, 2018

लायकीत : भाकित..! :-)




♥ क्षण..! ♥

लायकीत : भाकित..!

हाती प्याला सोमरसाचा
ओठी उद्याचं भाकित आहे..
नशा मदिरेत नव्हे सख्या
तर कोवळ्या साकीत आहे..

तू खयालांचे पुलाव शिजव
मी स्वरांचे बैल हाकीत आहे..
थेरं असतात हे लांडग्यांचे
वणवा चौकी-चौकीत आहे..

लावण्य स्वाभिमानी असतं
अंग-प्रत्यांग झाकीत आहे..
प्रमुख लाजिरवाणे सौंदर्य
सायंकाळी बैठकीत आहे..

भुलथापांची चंगळ करु या
रिते प्यालेही मालकीत आहे..
हा असेल, तो असेल नशेत
मी तेवढाच लायकीत आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

अडथळा..! :-)






♥ क्षण..! ♥

अडथळा..!

कोरडा स्वर तुझ्या गळा आहे
अडत्या तू ही कोरा फळा आहे..

भाकित नव्हे थोडक्यात सारांश
मुखी अभंगाची तप्त झळा आहे..

करुण, प्राज्ञ अन् विवेकी भारुडात
अडमुठा भाव-भक्तीचा लळा आहे..

खडतर आयुष्या तुझ्यही रे किती
लायलुटीच्या जीवघेण्या कळा आहे..

बोध सांगू कुणा? भुई नापीक इथे
स्मशानी सजल्या प्रेतांचा मळा आहे..

काल कथीत चौपडीची सात अर्णव
प्रपंची गृहस्थास समाज पळा आहे..

तुझा ना माझा किंवा कुणाचा नाही
पन्हाळी मण्यांचा अड'थळा आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३