♥
♥ क्षण..! ♥
♥ क्षण..! ♥
ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-४)
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-४)
..आपल्यासारखे वेड आणखी कुणाला तरी आहे. मग ते नाटक करण्याचे असो, नृत्य करण्याचे किंवा स्वतःचे वेगळेपण जपण्याचे. एकाच मताच्या दोन माणसाचं सूत कधी जुळत नाही. एकमेकांना पूरक असण्यासाठी विरुद्ध दिशेची दोन टोक एकत्र यावी लागतात. सर्वगुणसंपन्नतेची अशी नैतिकता आहे.
..सतत ना शोध चालू असतो आपला. काही तरी हवं असतं. अर्थात काय शोधत असतो आणि काय हवं असतं याचं उत्तर स्वतःकडे नसतं. पावलाखाली आलेल्या अनाहूत पाऊलवाटेच अहोभाग्य म्हणत ज्याचा-त्याचा प्रवास सुरु राहतो. काही मैल चालून होतं. काही वर्षांची कॅलेंडर बदलून होतात. प्रवास काही रंगतदार होत नसतो. झालेला प्रवास मात्र ओझं राहून गेल्यासारखा रुतत राहतो.
..आणि मग.. नियोजित नित्यक्रमाला फाटा देणारा एक दिवस उगवतो. मनातल्या बंद खोलीत धूळ साचलेलं एक नाव जे "तुझं" असतं ते स्पंदनात नकळत धडधडत. तेव्हा शरीराने थंड पडायचा निर्णय स्वतःच घेतला असतो. डोळे भूतकाळात आणि वर्तमानात काय बदल झालाय याचा शोध घेत राहतात. बदलणं निसर्गाचा नियम असूनही तू कधीच बदलू नये. अशी इच्छा मनातल्यामनात मी तरी "श्रे" तुझ्या बाबतीत करत असतो.
..बोलण्यात तू पटाईत आहेस. आज जवळपास आठ वर्षांनी मला असं पाहून तसंच खिळून बघण्याची सवय काही तुझी गेली नाही. तू ही काय करशील म्हणा या सौंदर्याचं हे खिळून राहणेही दाद देणेच आहे. अन्यथा काजळाच तीट लाऊनही दृष्ट लागायची ती आपल्याच माणसाची लागते. तू वाटतोस त्यापेक्षा जरा जास्तच रसिक आहेस "धृ." तुझ्या या रसिकतेची मिळणारी ही दाद जागेवर खिळून पेलवण माझ्यासाठी अवघड आहे.
..आठ वर्षांनी समोर आलेलं खरं की खोटं? तसही या आठ वर्षात फक्त एकदा डोळे भरुन बघायचं यासाठी कितीतरी दगडांना नवस लावले. आज ते फळफळले तर आतून ओसंडत न जाता स्वतःला अन् मनाला आवरण का आणि कशासाठी होतं? मागितलं होतं ते झालं. आता पुढे काय? की आज इथे शेवट? नजरेत दाटून आलेले प्रेमाचे भाव बदलून नजरेचा एक भ्रम एवढंच शाश्वत ठरतं. पाठ दाखवून चालावं लागणारच आहे तसही.
..आयुष्य या पुलावरुन आणि पुलाखालूनही एवढं पाणी वाहत गेलंय की त्याच्या प्रवाहात मनासारखपेक्षा प्रॅक्टिकल जगणं खूप झालंय. याची सवय एवढी दांडगी झाली की समोर आलेलं पाहूनही ते पाहून न पाहिल्यासारखे करणे अवघड गेलेच नाही. वास्तवात सांगायचं झालंच तर पुन्हा ती प्रश्न तो मनाचा गुंता नकोच.
.."श्रे" सुद्धा वेगळं असं काही वागत नाही. तिनेही पाठमोरी होऊन स्वतःच मन आवरलं असतं. मनात भडकलेल्या आगीत पाणी स्वतःच स्वतःला टाकावं लागतं. ते कसं तेवढं नाटकीय आणि प्रासंगिक असतं. समजदार वागण्याची पडलेली सवय मूर्खासारखं कुठे वागू देत नाही. मग एकमेकांपेक्षा स्वतःच स्वतःची जिरवावी लागते. पण एकदा भेटून सगळं सांगायचं होतं त्याचं काय? म्हणून पडतं घेतलं जातं. वळून बघावं तर "धृ" चालता झालेला असतो. टांगणीला मात्र जीव तेवढा उरलेला असतो.
..प्रेमाचं प्रॉडक्ट् नसतं म्हणून अन्यथा मार्केटिंग स्ट्रॅटेजी काहीशी वेगळी करून गोष्टी आपल्या माथ्यातून समोरच्याच्या माथी मारता आल्या असत्या. पण नाही ना होत नेहमी आपल्या मनासारखं. हे माहीत असून आपण स्वतःला का पटवून देत नाही? की स्वतःच स्वतःला आरसा दाखवू नये म्हणून असं? पण दररोज सकाळी आरसा आपण बघतोच तेव्हा हे असलं काही वाटतं नाही. पण आपलं कोणीतरी तुटक वागून आरसा दाखवला की मग तळपायाची आग मस्तकात.
..एकदा जवळ येऊन विचारायला हवं होतं का आपण? काय 'श्रे' कशीयेस? छे.. छे.. त्या मांजरीचे नखं मला ठाऊक आहेत आणि खमंग बोलणे तर आई..आई.. उभा फाडून खाऊनही ढेकर त्या बयेने काही दिली नसती. आज थोडी ओळखतो. चांगल्याने ओळखतो. आता जिथं जाईल तिथं आमनासामना निश्चित आहे. माझ्या पाठ दाखवून निघून जाण्याने घायाळ वाघीण झाली असणार आहे. हे सावज आता एवढ्या सहजासहजी तोंडाशी नाही येणार म्हणावं. आठ वर्षांच्या तपश्चर्येची उपासमार आहे. क्षुधा अशी सहजरित्या शमणार नाही. बोलावं तर लागेल हे लिखित आहे. कसं आणि कुठे ते अधोरेखित अजून व्हायचं बाकी आहे. तोवर जळ तिकडे आतल्याआत. अबोलीची धुंद वेडी भाषा एवढ्यात पुन्हा शिकावी लागणार आहे. जरा जपून..
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
No comments:
Post a Comment