Powered By Blogger

Saturday, December 8, 2012

१०० चारोळ्यांचा नजराणा.........खास तुमच्यासाठी




१) उडण्यासाठी पिंज-यातल्या
पक्षांचे पंख तडफडत होते
अंतहीन असलेले आकाश
चिमुकल्या पंखांसाठी रडत होते
.
मृदुंग

२) आज सुन्न झालेय हृदय अशा मनात
वेदनेच्या कळा दाटून आल्या आहेत
जाणीव नसेल कुणाला कसलीच अशा
मनी अश्रूंच्या सरी कोसळल्या आहेत
.
मृदुंग

३)प्रेम या दोन शब्दातच तुझ्या
मनातल काय गुपित लपलंय
भावनांच्या आहारी जावून मी
होत-नव्हत सगळच संपवलंय
.
मृदुंग

४) आठवांचीच चादर रोज
निजतांना मी पांघरतो
तुझ्या गोड स्वप्नांचा आदर
ठेवून मी पापण्या मिटतो
.
मृदुंग

५) एक एक करत माझे मी
सारे क्षण तुला देत आलो
प्रिये शब्द फुल माझे मी
तुलाच नजर करत गेलो
.
मृदुंग

६) पाहिलस किती त-हे त-हेचे
लोक या जगात असतात
खोट्या सुखाच्या मुखवट्यात
राहून स्वतालाच फसवतात
.
मृदुंग

७)मला कुशीत गोड स्वप्नांच्या
घेयला ही रात्र चालून आलीये
चमचमत्या चांदण्यात नेयला
निद्रेची गाडी डोळ्यात थांबलीये
.
मृदुंग

८) तिच्या प्रितीची ओढच माझे
क्षण अन क्षण होते कापीत
आठवणींच्या प्रवासातले ते
एकाकी श्वास होते शापित
.
मृदुंग

९) आज मागे वळून पहिले तरी
कालच्या शिल्लक आठवणीचं
पावले वाटा बदलत गेलीतचं
जुन्या आठवणी ठेवून मनीचं
.
मृदुंग

१०) किती सोपच होत नाही तुला
वेड्या विसरून जा मला बोलन
आठवत राहतो प्रत्येक क्षणी तुला
या सचेत यातनांपेक्षा बरे मला मरण
.
मृदुंग

११) कधी तुझ्या आठवणी माझ्या
सैर-भैर मनाला खूप त्रास देतात
जितक्यावेळा विसरतो तितक्याच
वेळा तुझी आठवण करून देतात
.
मृदुंग

१२) प्रेमाचा एक एक क्षण
मी तिच्यासाठी वेचला
वेदना झाल्या फार मनी
जेव्हा विरहाचा काटा बोचला
.
मृदुंग

१३) तुला विसरून पुन्हा नव्याने
जगायचे वचन घेऊन गेलीस
तू मी रंगवलेले सारे स्वप्ने
एका क्षणातच मोडून गेलीस
.
मृदुंग

१४) मनातले सारे गुपित
तुझ्याजवळ खोलावे वाटतात
मनातले अबोल शब्द
तुझ्याजवळ बोलावे वाटतात
.
मृदुंग

१५) हस-या डोळ्यांनी कधी
माझ्या प्रेमाचे स्वागत कर
अबोल भावनांनी कधी
नकळतच माझा हात धर
.
मृदुंग

१६) तू बोलता बोलता अलगतच
खट्याळ मानेला झटका देतेस
डोळे मिटल्यावर पापण्यातले
माझे सुखद स्वप्न बनतेस
.
मृदुंग

१७) रोज स्वप्नात येतेस
ओठांवर हसू ठेवून
मज डोळ्यात असते
रात्रीचे स्वप्न बनून
.
मृदुंग

१८) स्वप्न दाखवून आयुष्याचे तू
स्वप्नासारखीच तुटून गेलीस
आठवणींचे आभाळ बनून तू
का अश्रूंसारखीच दाटून आलीस
.
मृदुंग

१९) तुझ्या विरहाचे आभाळ
माझ्या मनात दाटलेलं
माझे एक स्वप्नच धुंद
रोज क्षणो-क्षणी तुटलेलं
.
मृदुंग

२०) पंख पसरून मनाचे
लहरी पाखरू उडू लागले
कधी मागे-मागे पुढे-पुढे
तुझ्या माझ्या बागडू लागले
.
मृदुंग

२१) तुझ्या हस-या डोळ्यांनीच
मला सखे अस वेडावलं
मिटलेल्या पापण्यांत तूच
सखे मला चोरून बघितलं
.
मृदुंग

२२) माझ्यात तुझ्यावर करत
असलेल्या प्रेमाची ओढ होती
अबोल डोळ्यांनी बोलून तू
मला स्वप्नात भेटली होती
.
मृदुंग

२३) कातर वेळी तू मी
अबोल श्वासात धुंद
आठवणीत ओलावण्याचा
पापण्यांनाच जडलाय छंद
.
मृदुंग

२४) माझे श्वासही तुझ्या
प्रेमावर झाले फितूर
भेटण्यास तुला क्षणिक
माझे मन झाले आतुर
.
मृदुंग

२५) तुला भेटण्यासाठी सारे काम
बाजूला ठेवून बसलो आहे
काय बोलावे न बोलावे मी
नेहमीसारखाच वैतागलो आहे
.
मृदुंग


२६) श्वासात श्वास गुंतत जातात
शब्दाने शब्द वाढत जातात
काहीही न सांगता बोलता
मानस एकट सोडून जातात
.
मृदुंग

२७) कुणासाठी आता मागे
काय काय ठेवून जायचं
एक आठवणच समान
प्रत्येकाला देवून जायचं
.
मृदुंग

२८) ओंजळीतले काही क्षण
क्षणातच हातून निसटले
गोड गुलाबी स्वप्ने काही
माझ्या मनातून विस्कटले
.
मृदुंग

२९) प्रेमाची रख-रखीत आग
जणू विरहाचा काही भाग
उगाच लटका नाकावर राग
असेच असावे प्रेमाचे बाग
.
मृदुंग

३०) स्वप्नाच्या गावातच
बेधुंद तू होती बरसत
आठवणींच्या पाझरात
मनात मी होतो तरसत
.
मृदुंग

३१) अबोल प्रेमात तू विरहाचा
माझ्यावर छळ मांडलास
कशासाठी असा जीवघेणा
माझ्यासोबत खेळ केलास
.
मृदुंग

३२) ती अल्लड खट्याळ बट अलगत
मानेला झटका देवून मागे सारतेस
चोर नजरेने बघून कुणाला तू
भिजलेल्या पापण्यात लपवतेस
.
मृदुंग

३३) मनवायला कुणी असेल
तर आपण रुसून बसाव
जर आपलच कुणी नसेल
तर स्वताच आपल व्हाव
.
मृदुंग

३४) स्वप्नात येवून माझ्या
झोपेच खोबरं करतेस
अशी का बर तू मला
रोज रात्री छळतेस ?
.
मृदुंग


३५) मिठीत घेऊन तिला सारे
दुखः विसरावेसे वाटले
अबोल प्रीतीचे मज धुंद
क्षण अनुभवावेसे वाटले
.
मृदुंग

३६) तिची प्रत्येक गोष्ट
मला खूप आवडते
म्हणूनच का ती
इतक प्रेम करते?
.
मृदुंग

३७) प्रेम काय असत ती
रोजच त्याला विचारते
झुकलेल्या पापण्यात
प्रश्नाची लाडीगोडी लावते
.
मृदुंग

३८) काहीही न बोलता त्याने
ओंजळीत तिच्या फुले टाकली
ओठांनी हसून काहीही न बोलता
ती त्याच्या मिठीत विसावली
.
मृदुंग

३९) मांडलेला खेळ प्रेमाचा
रोज तो एकटाच खेळतो
सप्तरंग भरेल कोणीतरी
म्हणून स्वप्नेच रंगवतो
.
मृदुंग

४०) आकाशी जमून आलेले
काही ढग न बरस्ताच जातात
काही बरसून सुखद ओलावा
तेवढा मनाला देऊन जातात
.
मृदुंग

४१) मी उशिरा येतो कारण तुझे
असे रुसणे हवे-हवेसे वाटते
स्वप्नात दुसरी असतेच तरी तू
उगाचच येयची तसदी घेतेस
.
मृदुंग

४२) काही न बोलता डोळ्यात
तू फक्त पाहत राहायचं
बेधुंद पाण्यासारख मी
तुझ्यात वाहत राहायचं
.
मृदुंग

४३) तुझ्या प्रेमाच्या नशेत
दारू सुद्धा फिकी वाटली
गोड चव तुझ्या ओठांची
मला हवी-हवीशी वाटली
.
मृदुंग


४४) रोजची तीच कटकट
काय कराव सुचे ना
नशिबाची थट्टा की
कुचेष्टा मज कळे ना
.
मृदुंग

४५) मी काय करू सांग काळजीत
तुझ्या आपुलकी नाही राहिली
सगळे बोलतात ति-हाईता सारखे
मी तेव्हडीच औपचारिकता पाळली
.
मृदुंग

४६) आपुलकी तीच आहे मान्य
पण पूर्वी सारखी उत्कट नाही
जवळचा तुझा शाब्दिक आधार
पण त्यात आत्मीयताच नाही
.
मृदुंग

४७) नेहमी नेहमी चुकत
मीच असेल का ?
गैरसमजूतीची शिक्षा
मीच भोगेल का ?
.
मृदुंग

४८) दुखात अश्रू गाळून
मला तू जाळत असतेस
त्रास होतो आठवणींचा मग
कशाला त्या कुरवाळत बसतेस
.
मृदुंग

४९) तुझ्याच दिशेने माझे
पावले चालत राहतात
येशील तू परतुनी माझ्या
आठवणीं बोलत राहतात
.
मृदुंग

५०) लाटेची ओढ किना-याला जशी
उगाचच दूर निघून गेलीस अशी
मज अश्रूंची सोबत आता उशाशी
स्वप्नीच वैरण झालीस माझ्याशी
.
मृदुंग

५१) चंद्र चांदणीचे मिलन
कलेकलेने नवे रंग भरते
अमावसेच्या काळ रातीच
चांदणी कशाला एकटी उरते
.
मृदुंग

५२) सोबत तुझी असूनही
शेवटी एकटाच उरलो
असे विस्कटलेस मला
की पुन्हा न सावरलो
.
मृदुंग

५३) तुला कुठे माझ्याशिवाय
या जगात काही दिसत
जस प्रेम काहींना मिळत
अन काहींना नुसत हसत
.
मृदुंग

५४) दमून भागून दिवसभर राबराब राबून
तुझ्याच कुशीत रात्री मी शांत निजतो
तुझ्यासवे संपलेला दिवस हा थकलेला
तुझ्याच सवे पुन्हा नव्याने उजळतो
.
मृदुंग

५५) अस्पष्ट सावली नाही
अश्रुंत डबडबलेले डोळे
बागडत होतो एकत्र आपण
आज जळाले तेच रान मळे
.
मृदुंग

५६) तुझ्यासोबतचा प्रत्तेक क्षण
मला हवाहवासा वाटतो
दुरूनच घोळक्यात तुला
पाहून थंड उसासा घेतो
.
मृदुंग

५७) रात्रीसोबत माझी
स्वप्ने निजलेली
मनाची अस्वथता
तुला उमजलेली
.
मृदुंग

५८) एकदा खुलासा मीच
माझ्या प्रेमाचा केला
तू माझ्यावर खटला
का विरहाचा भरला ?
.
मृदुंग

५९) दुख माझ्या मनाचं
पापण्यांत ओलं-ओलं
तरी ओठांनी हसायचं
विसरून झालं-गेलं
.
मृदुंग

६०) चंद्राने पांघरले
रातीचे पांघरून
आठवांचे थेंब
मनीचे अंथरून
.
मृदुंग

६१) क्षणातच अशी तू गेलीस नीघून
परत येण्याची मनाला ओढ लावून
जातांना ओलावली होती पापणी तुझी
तरी गेलीस माझ्या ओठांवर हसू ठेवून
.
मृदुंग

६२) तुझ्या आठवणीत काही क्षण
मनाला रमवत बसलो आहे
रुसलेल्या काही शब्दांना
कागदावर गिरवत हसलो आहे
.
मृदुंग

६३) पुनवेच्या चंद्रात मी
तुझे प्रतिबिंब शोधत आहे
करी दूर असलो प्रत्तेक क्षणी
मी कायम तुझ्या सोबत आहे
.
मृदुंग


६४) तू नसलीस तरी तुला आठवूण
मी काही क्षण जगुन घेईल
तुझ्याच आठवणीत पापण्या
कायमच्या मी मिटूण घेईल
.
मृदुंग

६५) एकाच ता-याची अपेक्षा माझ्या
वेड्याच मनाने केली होती
डोळस पणे स्वप्ने रंगवली मी
खुळी पापणी निजली होती
.
मृदुंग

६६) काय करू काहीच सुचत नाही
तुझ्याशिवाय एक क्षण जात नाही
झालं-गेलं विसरण सोप मला नाही
साध रड्न्यातही माझ मन लागत नाही
.
मृदुंग

६७)कधी काही मिळेल वेड्या
मनाची वेडी गुंतवणूक असते
वेळ निघून जाते क्षणात पण!
ब-याच गोष्टी मागे शिल्लक ठेवते
.
मृदुंग

६८) उरल्या सुरल्या आठवणी
मनाला त्रास देत राहतात
पापण्यात अश्रूंना अडवून
मनात कोमेजत राहतात
.
मृदुंग

६९) कुणी कुणाला नकळत
दुरून न्याहाळत राहत
तुटणारीच सारी स्वप्ने
उगाचच! रंगवत राहत
.
मृदुंग


७०) का कोण जाने
अंगण ही रुसले
कशासाठी हृदयाचे
उंबरठे ओलांडले
.
मृदुंग

७१) घाव बसत होते भिंतींना
कुणाचे स्वप्न तुटत होते
आपले काय जाते आहे
उघडी दारेच बोलत होते
.
मृदुंग

७२) तुटणार नात जपण्यासाठी
तुझ्याशी भांडत होतो सारखा
आयुष्याचा विस्कळीत खेळ
मी मांडत होतो एकसारखा
.
मृदुंग

७३) मनी विरहाची भिंत तूच
क्षणात उभी केली होती
घाव देऊन आठवां मला
कशाला नभी दाटली होती
.
मृदुंग

७४)रोज रोज पाहिलेले तेच चेहरे
मला आता अप्रिय वाटतात
नकोसे सारे भाव चेह-याचे
खोट्या हसण्याचे मुखवटे बोलतात
.
मृदुंग

७५) तुझ्याच विचारात चालत
घरापर्यंत येवून थांबलो
वेड्या मनातली वेडी थेंब
डोळ्यात घेवून ओथंबलो
.
मृदुंग
२३.०९.२०११
७६) दुरूनच पाहून तुला
अश्रू माझे सुकले
आठवणींच्या मिठीत
मन माझे लाजले
.
मृदुंग

७७) ओघळणा-या अश्रूंत
विरहाचा अंश नवा
ओठांच्या हसण्यात
मज प्रेमाचा दंश हवा
.
मृदुंग

७८)जातांना मागे वळून पाहत
नाहीस तुझी तक्रार असते
कोडे सुटत असते सहजच
तुला उगीच हरायचे असते
.
मृदुंग

७९) हसता हसता सहज
अश्रुंचे ढग जमतात
पापण्यातून झिरपत
का ओंजळीत येतात
.
मृदुंग

८०) हिरवू नये सुख कुणाचे
कदाचित अश्रू सांगतात
दुखातही अन सुखातही
सोबत माझ्या असतात
.
मृदुंग

८१) क्षणालाही सखे एका
क्षणाची सोबत असते
तूच ती माझी चांदणी
माझ्यावर रुसून बसते
.
मृदुंग

८२) चांदण्यांच्या गराड्यात ती
एक चांदणी वेगळीच होती
ना शृंगार ना सौंदर्य तिला
तरी सगळ्यात सुंदर होती
.
मृदुंग

८३) जवळ माझ्या आठवणीच
आता तुझ्या उरल्या आहेत
हृदयात भरून आलेला उर
अन पापण्या ओल्या आहेत
.
मृदुंग

८४) एकदा मागितले असतेस तर
काळीजही काढून दिले असते
जीव घेण्या हसण्यात उगाच
तुझे मन कुढत राहिले नसते
.
मृदुंग

८५) संवाद कसला शब्दांचा
कोमेजल्या कि भावनांचा?
अबोल तर सारेच बोलतात
कशाला हवा आधार थंड हातांचा
.
मृदुंग

८६) जीवन कुणाच्या इच्छेसाठी
जगीले तर सार्थ झाले असते
स्वताच्या इच्छा महत्वकांकक्षा
मारून व्यर्थ तरी ठरले नसते
.
मृदुंग

८७) ही नाती असतात तरी कशाला
जर प्रत्तेक नात तुटणार असत
तारेवरची उगाचच मनी कसरत
जे नात कायम टिकणार नसत
.
मृदुंग

८८) भांडण नाही झाले तरी वाद
तुझ्या माझ्यात होतच राहतात
ठरवले कितीही आता नाही बोलायचे
तरी शब्द हे वेडे माझे बोलतच राहतात
.
मृदुंग

८९) मागे आता काही एक
राहिलेले नाही आहे
अथ पासून इति पर्यंत
सगळे संपले आहे
.
मृदुंग

९०) ओल्या चिंब सरीत
भिजलेली एक वाट
रसिक मनी लोभवी
दाटलेली धुक दाट
.
मृदुंग

९१) भुरळ घालते मनाला
निसर्गाचे दाट वलय
कसे कुठून भरले रंग
की आभासी हे विलय
.
मृदुंग

९२) शब्दांना समजू नकोस
फक्त भावनांना समज
कळले आहेच तुला सारे
फक्त अबोल डोळ्यांना उमज
.
मृदुंग

९३) डोळ्यात बघ माझ्या तू
प्रेम तुझ्यासाठी असलेल
चाचपडले असे हृदय माझे
तुला पाहण्यासाठी आसुसलेल
.
मृदुंग

९४) मिटलेल्या पापण्यात
तुझेच स्वप्न दिसते
जागेपणी सगळीकडे
तूच तू का मला दिसते
.
मृदुंग


९५) ओघळलेला तुझा अश्रू
ओंजळच माझी टीपेल
तुझा हा सखा तुझ्याच
पदरात क्षणात लपेल
.
मृदुंग

९६) तुझ्या विरहाने सखे बघ
हृदय माझे जागोजागी फाटले आहे
ओसंडून वाहणाऱ्या प्रेमाला
तुझ्या आठवणींचे ठिगळ लावले आहे
.
मृदुंग

९७) एकाच आशेचा किरण
जो मला मिळाला होता
क्षणांची दिरंगाई अन
तो क्षणात विझला होता
.
मृदुंग

९८) रोजच आठवण यावी
असे माझे काहीच नाही
तुझ्यासारखे कोणी माझ्या
स्वप्नात आता येतच नाही
.
मृदुंग

९९) प्रत्येक नात कधी ना
कधी तुटणार असत
आपलं असूनही परक
कधी वाटणार नसत
.
मृदुंग

१००) नात्यांची माळ
त्या माळेचे तोरण
कळतही नाही असे
माणसांचे धोरण
.
मृदुंग


No comments:

Post a Comment