Powered By Blogger

Tuesday, September 30, 2014

ऑर्कूट..! RIP


♥ क्षण..! ♥

ऑर्कूट..! RIP

2004 - 2014 भारतीय वंशाचाच म्हणू तो त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता. चंट त्याच बरोबर समंजस डांबरट पोरगा होता. वैचारीक वाद होतेच तरीही 'राजकारण' या सज्ञेचा पाया होता. मैत्री-प्रेम-नातं-घरही कॉलेज कट्ट्यानंतर इथेच रंगले. याने जन्म घेताच गावं-शहरं-देशही काय अगदी समोरची चिंकी मागच्या गल्लीतल्या बंडूला सुद्धा जोडून घेतले.

सुरवातीला फॉर्म भरुन घेवून सदस्यांची जि-मेल (लाचलुचपत सुविधा कार्यालय म्हणू) इथे नोंदणी केली जायची. या संकेत स्थळावर सदस्याला त्याचा पत्ता दिला जायचा. मग इथे ई-मेल्स सोबत चॅट नावचे ऑप्शन देऊन, ऑर्कूटवर इन्सटन्ट सदस्य बनवायची मुभा किंवा कळ (इन्व्हाईट बटन) बहाल करुन दिले. जो नको, जे सदस्य होते त्यांनी त्यांचे मित्र, परिवार, शेजार ओढून घेतला. जो यांच्या आधी संपर्कात यायचा तो ओढला जायचा.

पुढे लोकप्रियता जसं-जशी वाढत गेली तसं-तशी आधीच सदस्य असलेले सभासद नव्या लोकांना लाचलुचपत कार्यालयात अपॉन द टेबल-अंडर द टेबल हात-पाय चेपायला आणि स्तुतिसुमणांचे गुणगान करायला लावायचे. तसेच वयाचे अठरा वर्षे पुर्ण लागायचे. वापर नव्हे वावर करायला हं! मग चुकीच्या जन्म तारखा, सेक्स चेंज, रि-अपडेट सोशल स्टेटस, या सुविधेमुळे 'फेक' या किन्नर जमातीचा सुळसुळाट झाला.

पुढे-पुढे ह्या जमातिने इतका उत्पात माजवला कि, त्या जमातिची लागण "फेसबूक" या अबोध बालकाला पोटातच झाली. असा, हा माजी अन् भावी घोटाळा वर्षभरात ऑर्कूट जन्मदात्याच्या लक्षात आला असुनही, मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी "रजिस्टर नाऊ/क्रियेट न्यु अकाउंट" हि कळ ऑर्कूटची लहान बहिण म्हणून लोकार्पण केली. मोकळे रानच झाले हो मग! जिथे इंटरनेट दिसलं तिथे ऑर्कूट ओपन झालं. सभासद झाल्या नंतर समुह आलेच, समुह आल्या नंतर चावड्या आल्याच, चावड्यांवरुन वाद झालेच, आणि समुहांचाही मग पुर आला. सभासदांची कमी कुठे होतेय. खरे नाहीत ना मग खोटे वाढवा सभासद असा अलिखित नियमच झाला.

फॉरअर्म्स या मथळ्यात टॉपिक्स उपनावाखाली लोकसंख्या इतकी वाढली कि विचारु नका. "आलात तर हजेरी लावा, गेलात तर बाय म्हणा..!" शाळेचे अधुनिक प्रेझेन्टिशिट तयार केले, शाळा सोडलेल्या न पोटापाण्याचा व्यवसाय करत असलेल्या लोकांनी. काय काय एक एक समुह विचारु नका. जॉईन होताच भपकेबाज पोशाखातली प्रोफाईल स्वागत देखील करायची. काय ते दिसणं काय ते इम्प्रेशन आहाहा..!

हजेरी नंतर वधु-वर सुचक मंडळा नुसार वरील व्यक्ती आवडते का हो / नाही विचारुन सुत देखील जुळवले. गुण्या गोविंदाणे नांदत असलेल्या समुहात फुट देखील पडली. अगदी दृष्टच लावली म्हणा..! राजकीय चर्चा आवडणारे वेगळे निघाले, टाईम-पास करणारे वेगके झाले, अगदी नवोदीत किंवा नामांकीत कविता लिहिणारे तर चक्क वायफळ कविता नाव असलेले सदरे चालवू लागलीत. वाताहत झाली तशी लोकंही जुळली. नातंही फळली-फुलली. पसारे वाढत गेली.

उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेली न एकमेकांवर शाई फेक करणारे चेकाळून उत्पात माजवू लागलेत.
त्यांच्यावर अंकूश म्हणून समुहा-समुहा नुसार नियंत्रकही निवडणूका लढवून आणि मालकाशी प्रामाणिक असल्याचा पक्ष नव्हे समुह, समुहांवर समुहपद भुषवू लागली. इथेही मालक-नियंत्रकांची युती फुटलीच. नियंत्रक मालक झालेत. मालक नियंत्रक झालेत. सदस्य तर आयते लाडोबा झालेत हो..!

एकंदरीत "फेसबूक या विदेशी मुलाने जन्म घेवून तो पायावर चालू लागताच" ऑर्कूट या पहिल्या भारतीय वंशाच्या मुलाने हाय खाल्ली, खचत गेला, शेवटी कोलमडून पडण्यापेक्षा अनंतात विलिन करण्याचा निर्णय ऑर्कूटच्या जन्मदात्यांनी घेतला. तो दिवसही ठरवला गेला. ऑर्कूटचा दहावा वर्धापण दिन माफ करा दहावा वाढदिवस दिनांक : 30 सप्टेम्बर 2014 रोजी. ऑर्कूटणे त्याची वादग्रस्त परंपरा फेसबूकवर हस्तांतरीत करत, वादांची पिढी पुढे नेण्यास फेसबूकला शुभेच्छा दिल्या आहेत. 'फेक' या लागणीवर औषधे शोधण्याच्या प्रक्रियेसाठी अनुभवांची मदत करु. असे, अश्वासनही ऑर्कूटणे फेसबूकला दिले.

आज दिनांक 1 ऑक्टोम्बर 2014 रोजी, ऑर्कूट आपल्यात नाही या त्याच्या समाधीवर दोन क्षण मौन पाळून ऑर्कूटच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे चिंतू या..!

---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, September 27, 2014

एक सोनेरी मासा..! :-)

फर्माईश म्हणून एका वाचकाणे गोल्डफीशचे चित्र दिले होते... त्या वाचकाचे आभार तसेच हा शब्दांचा नजराणा..!


♥ क्षण..! ♥

एक सोनेरी मासा..!

एका सोनेरी मास्याचा
सोनेरी पिंजरा होता,
चंदेरी दुनियेत संसार
त्याचा गोजीरा होता..!

अनाहूत चाहूल लागता
जिव मुठीत धरत होता,
एक ओळख पटल्यावर
उगा उसळी मारत होता..!

शोभा नव्हती ती शोभेची
नाळ जोडून घरात होता,
बाहूली नंतर सभ्य घराचा
ताळ बांधून सदस्य होता..!

वेडच होत ते पात्रात कैद
तरंग छेडून रमलेला होता,
थोडा माझा थोडा तुझाही
एक क्षण करमलेला होता..!

विरंगूळा कधी शोधला का
पाण्यातच जिव कसा होता,
जगला तोवर सगळा तो ही
थोडा तुझा थोडा माझा होता..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Friday, September 26, 2014

असंच काही तरी..! :-)


♥ क्षण..! ♥

असंच काही तरी..!

एक तर नशिबाचे खेळणे व्हा किंवा नशिबाला स्वत:चे खेळणे करा. शेवटी एक खेळणे म्हणून नियतीला पर्याय द्यायचाच आहे. सरुन गेलेल्या काळातून, आलेल्या अनुभवातून; पुन्हा-पुन्हा खेळणे होण्यापेक्षा खेळणे बनवणे बरं वाटते. झालंच तर एक खेळणेच होते म्हणून मन भरल्यावर वाटेला लागणे सोपे जाते. थोडी गुंतागुंत तेव्हाही होते. मुरड घालून मनाला त्या खेळण्याचे दोन तुकडे करावे लागतात. जो एक तुकडा स्वत:जवळ असतो, त्याला मग स्वत:पेक्षा जास्त जपणे असते. अधुराच खेळ त्या खेळण्यासोबत खेळणे असते. संपणारा खेळ खेळण्यापेक्षा; एक अधुराच खेळ रंगवून-रंगवून खेळण्याला लोकं 'वेड' म्हणतात. खेळणारे मात्र 'परिस्थिती' म्हणून वेळ मारुन नेतात. पुन्हा एक डाव मांडून जिंकून देखील हारवण्याची पात्रता आजमावायला..!...कदाचित..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Tuesday, September 23, 2014

बाटलेला..! :-)


♥ क्षण..! ♥

बाटलेला..!

कुणास ठाऊक आभाळ का फाटला आहे
सुख वेचता-वेचता दु:ख मी लाटला आहे,

थोडसे समजवून सांग आयुष्या हा हिशेब
काल परकं आज आपलं का वाटला आहे,

खोट्या जगण्याचा गाडा आजवर कशास
पुढे-पुढेच ज्याने-त्याने का हाटला आहे,

ठिगळ लावलं होतं म्हातारीने लुगड्याला
मायेच्या जिर्ण पदरात उर का दाटला आहे,

इथे पत नव्हतीच ना प्रतिष्ठा होती माझी
ऐपत म्हणून माझा तळवा का चाटला आहे,

सरिता म्हणून वाहात गेली गावा-गावात
शहरा-शहरातला समुद्र का आटला आहे,

नको देऊस पुरावा आता कशाचा नशिबा
नियतीच्या चक्रात जातीने मी बाटला आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, September 22, 2014

का..? कशाला..?


♥ क्षण..! ♥

का..? कशाला..?

तू निघून गेल्यावर ज्या प्राजक्ताला मी उभा जाळला...त्याच प्राजक्ताला पुन्हा पालवी फुटली...झालं-गेलं माझ्या लेखी संपल्यावर...संपून देखील उरणे तुझाच नियम...त्या प्राजक्ताच्या झाडाने चोख बजावला...का..? कशाला..?
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, September 20, 2014

थोड असं अन् थोड तसं..! :-)


♥ क्षण..! ♥

थोड असं अन् थोड तसं..!

कधी-कधी परिस्थिती एव्हढी वाईट होते कि, काय करावे काहीच सुचत नाही. हाक द्यावी कुणाला तर "ओ" म्हणून प्रतिसाद कुणाचा येत नाही. सगळंच आलबेल व्हायला एव्हढेही पुरेसे असते.
संतापाची लहेर भान कशाचेच ठेवत नाही. समजून घेणारे नव्हे, आपले म्हणने ऐकून घेणारे कुणी असत नाही. वाद-चेष्टा-खिल्ली उडवणे स्वत:चे स्वत:लाच रुचत नाही. आलेला किंवा ओढवलेला प्रसंग एक अनुभव म्हणून स्विकारणे सहज जमत नाही.
आपल्या बोटांच्या इशार्यांवर झुकलेलं जग, स्वत:च्या तालावर आपल्याला नाचवेल अशी कल्पनाही केलेली नसते. प्रत्येकाची वेळ येते रटून-रटून त्याची प्रचिती येत नाही. जगाशी भांडन करुन एक झगडा स्वत:चाच स्वत:शी होत असतो. थोड असं केलं तर बरंच काही तसं होवून बसते.
इतरांसोबत झालेलं मग ते काहीही असो, तसंच थोडसं स्वत:सोबत झाले तर तळपायाची आग थेट मस्तकात वणवा पेटवते. कुठे तरी आपणही सामान्य माणसे आहोत हे मानायला स्वत:ची बुद्धी तयार नसते. मुखातून बाहेर पडणारा शब्दांचा लाव्हा, कुणाच्या तरी कानात पडून आसुरी आनंद मिळावा एव्हढीच अपेक्षा असते. ऐकणारा मग कुणीही असो, त्याचा आपल्या आयुष्याशी अथवा परिस्थितिशी काडीचाही संबंध नसला तरी चालेल. थोड स्वत:चे स्वार्थ साध्य करण्यात काय हरकत आहे..?
हळव्या मनाला झालेली इजा परिणाम म्हणून व्यक्त होते. त्याचे उदाहरण अजुन आहेत जसे, संताप अथवा राग अनावर झाला तर हातात जे असेल ते फेकून देणे/मारणे, साध्या सोप्या सहज क्रियेत लहान-सहान चुका होणे, पदराचे टोक किंवा शर्टाच्या कॉलरचे टोक दातांनी कुरतडणे, अतिच आणि असह्य झाले तर झोपेच्या / दुखत नसलेल्या डोक्याच्या गोळ्यांचे सेवन करणे, (तो असल्यास) मद्य किंवा सिगारेट्सचे सेवन वाढणे, जरा कुठे खट्ट झाले तरी खुप चिडणे इ.इ.
कुणी नसलंच समजून घेणारे तर इतर पर्याय असतातच. त्यांवर अंकुश अन् बोट लावणे म्हणजे भळ-भळत्या जखमेवर तिखट-मिठ चोळण्यासारखेच. विचार करत असलेली बुद्धी बंडखोर होते. जे नको करु म्हण्टले / सांगीतले तेच करते. आधार म्हणून वेल सतत झाडाचा टेका शोधत राहाते. परिस्थिती-प्रसंग साधा न शुल्लकच असतो. नकारात्मक विचारांचा भोवरा आणखी-आणखी स्वत:ला मुजोर करतो. कधी-कधी कुणी भेटत समजून घेणारे पण कधी-कधी कुणीच नसते. तेव्हा काय करायचे..?
विसरुन जायचे? सोडून द्यायचे? कि बाजुला करुन अलिप्त राहायचे? उत्तर उपस्थित असलेल्या वर्तमानावर आहे. गर्दीत असाल तर काही क्षण गर्दीत झोकवून द्या स्वत:ला. एकांतात कुठे असाल तर निसर्गात गुंतवून घ्या स्वत:ला. घराच्या बाहेर नसाल तर घरातल्याच एका चादरीची घडी मोडून पुन्हा निट घडी घालता येते का बघा आजमावून. आयुष्य विनतांना थोडी विस्कटलेली विन चांगली दिसत असते. विनत असलेल्याला ठाऊक असतं काय घोळ झालाय पण विनेशी काही संबंध नसलेल्याला सगळं कसं छान-छान वाटत असतं. कुणाचे मन जपणे जेव्हढे सोपे असते ना त्याहून अवघड स्वत:चे मन जपणे होत असते. चालायचेच नाही का???
थोड असं अन् थोड तसं. खुळ मन अन् खुळाच क्षण. घ्यायचे थोडे सांभाळून स्वत:लाच स्वत:साठी..!
--------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, September 18, 2014

चोर..! :-)


♥ क्षण..! ♥

चोर..!

म्हणतो जो तो स्वत:ला थोर आहे
इथे तो गाफिल मनातला चोर आहे,

करुन घे कसरत थोडी तू रे माणसा
उभ्या आयुष्याची हातात दोर आहे,

नको दाखवूस तुझी भारदस्त छाती
बघू दे या मनगटात किती जोर आहे,

आजवर लक्तरे हजारो पेललीस तू
सांग रे तुझी वेदना किती घोर आहे,

घायाळ होवून चिघळत गेलास तू
दाखव रे ती जखम किती ढोरं आहे,

हसत-हसत जे नाचले घोड्यापुढे
बघ रे त्या वरातीत किती पोरं आहे,

हसण्यावर घेवू नकोस फारसे काही
छिन्न-विछिन्न माझं कागद कोरं आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, September 17, 2014

एकच प्याला..! :-)


♥क्षण..! ♥

एकच प्याला..!

घेवून बसलो हातात पुन्हा मी एकच प्याला
बरळू काही कि बोलू थोड ह्याला थोड त्याला,

कडवटपणा विरघळला गोडवा जिभेवर उरला
आज जरा नशेत आहे जो तो का बोलून गेला,

कोरड्या पानवठ्यावर घसा हा ओला-ओला
अतिरेक नव्हताच कधी धुंदीत बोला-बोला,

पुन्हा-पुन्हाच भरुन असा हा एकच प्याला
कळले देखील नाही रिता-रिता केव्हा झाला..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Saturday, September 13, 2014

सांज गेली..! :-)


क्षण..!

सांज गेली..!

उधळून रंग माजवून काहूर
जराशी रेंगाळून सांज गेली,
माझा मी राहावा कागदावर
शब्दांत भुलवून सांज गेली..!

भेटली तू अशी क्षितिजावर
तुझ्यात गुंतवून सांज गेली,
धावतच आलेल्या लाटेवर
किनारा घडवून सांज गेली..!

नभातल्या नग्न चांदण्यावर
बगिचा फुलवून सांज गेली,
सजवल्या भग्न स्मशानावर
झोका झुलवून सांज गेली..!

म्हणावे आता कसे मी तुला
उभी रात्र खुलवून सांज गेली,
जाळून सखे स्वत:च मी मला
आलिंगण देऊन सांज गेली..!

कोरड्या थेंबात चिंब भिजवून
श्वासात गंधाळून सांज गेली,
वेड मला म्हणे माझेच लावून
जगाला वेडावून सांज गेली..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Wednesday, September 10, 2014

इंद्रधनू..! :-)


क्षण..!

कधी नव्हे ती आज तुझ्यावर एक कविता मी लिहित आहे
तुझ्या सुंदरते सोबत माझ्या शब्दांचे सौंदर्य आजमावत आहे..!

इंद्रधनू..!

रुप तुझे देखणे जसे डौलात मोरनीणे चालणे
केशांच्या जाड नागवेणीत जसे गज-याणे लाजणे,

कट्यारीसारखी भुवई पाहून तलवारीने म्यानात जाणे
गालावरच्या खोल भवरात माझ्या हृदयाने हरवून जाणे,

तुझ्यासाठीच फक्त फुलांनी उमलणे
शोभा बनून तुझी त्यानेही तृप्त होणे,

प्रत्येक रंगाने स्वत:च रोज तुला सजवणे
सप्त रंगांनी मिळून मग तुझे इंद्रधनू दिसणे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Thursday, September 4, 2014

आयुष्य गुलजार आहे..! (2) :-)

क्षण..!

आयुष्य गुलजार आहे..! (2)

सकाळी पापणी उघडत नाही तोच, तिच्या बडबडीचा सुर घरात खेळू लागतो. त्याच्याकडे मग साधे टोकणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे सुद्धा ऑप्शनला नसते. पेपरात तोंड खुपसून चोथा झालेल्या बातमीचा अजुन कस लावणे सुरु असते.
दुधवाल्या पासून करपलेल्या फोडणी पर्यंत तिची न दमणारी महागडी कटकट सुरु राहाते. अध्ये-मध्येच लक्ष आहे कि नाही बघायला, बोलून झालेल्या प्रबंधावर एक प्रश्न विचारुन घेते. हूं-हां-हो त्याच्याकडून येण्या आधीच काही एक संबध नसलेल्या "तुम्हा पुरषांना काय कळायचे आम्हा बायकांच्या मनातले". असा उपहास रुपी दिलासाच स्वत:ला देवून देते.
पाणी उकळलेय, चहा गार होतोय, जेवनाला वाढलेय, उशीर होतोय. याचाच रट्टा आढाव्या सकट गुळगुळीत दाढी करतांना कानावर येवून पडतो. आवरुन बाहेर पाय निघे पर्यंत सगळे घेतले ना? उशीर होणार का? येतांना सोबत घेवून या! नावाखाली यादी हातात पडते. संपणार नाही ठाऊक असतेच त्याला. तिला वाटते ऐकून मान डोलावली. पण! त्याची मान विरोध करण्यासाठी सुद्धा धजावत नाही हे त्याचे त्यालाच माहित असते.
दिवसभर मुकाट डेली सोपच्या सिरिअल्सचा फज्जा फाडून, सांजेला घरात त्याचा पाय पडताच वैतागत अजुन बडबडीला बहार येतो. जेवणं ते अंथरुन लागे पर्यंत गोंधळलेला तो अजुन गोंधळू लागतो. बातम्यात न चॅनल्स बदलण्याचा सपाटा लावतो. लक्ष नाही त्याचे म्हणून तुटक-तुटक बडबडत शांत होते. एक नजर बघताच त्याने पुन्हा तुफान बडबड सुरु होते. स्वत:शीच नकारात मान डोलावत तो येतांना बाजारातून तिला आवडणारा मोगरा एकदा कुरवाळून तिच्या नकळत तिच्या हातावर ठेवून देतो. काय होते माहित नाही. तिच्या हातावर मोगरा ठेवताच. घरभर त्याचा गंध दरवळून जातो.
बेडवर त्याच्या शेजारीच बसते. त्याच्या खांद्यावर डोक ठेवते. कसं जमते रे तुला माझ्या बडबडीला न वैतागता शांत राहाणे? अगदी कशाचाच आपल्या आयुष्याशी मेळ नसतांना जुळवून घेणे? एव्हढे सगळे सहन करुनही मला आवडतो म्हणून आवर्जुन मोगरा आणने? तो तरी काही बोलत नाही. बडबड करता-करता तिची ओली झालेली पापणी पुसून घेतो. हातात हात घेवून "मंद आहेस तू" एव्हढेच बोलतो.  तिला मग काय होते कळत नाही. रागाचा पारा चढवून "तू मुर्ख बावळट आहेस", बोलून पुन्हा पुर्ववत होते.
देवा! त्याच्या ओठातून निघते न तो पापणी मिटून घेतो. त्याने दिलेला मोगरा कुरवाळते. त्याच्या केसांतून हात फिरवून स्वत:शीच हसते. अवघड माझेही आहेच ओठातल्या ओठात पुटपुटत त्याच्या कुशीत शिरते. रेंगाळलेल्या न चुळबूळलेल्या त्या क्षणात, चाळवलेली त्याची झोप तिच्या मुखातले शब्द टिपते. खरंच तुझ्यासोबत माझे आयुष्य गुलजार आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

Monday, September 1, 2014

गुंता..! :-)

क्षण..!

गुंता..!

आयुष्याचे बरेच प्रश्न सोडवून देखील, बरेच प्रश्न पुन्हा शिल्लक असतातच. फरक एव्हढाच पुर्वी दिलेल्या उत्तरांचा उतारा अनुभव म्हणून असतो. त्यासोबतच साधा-सरळ-सोपाच प्रश्न आहे असा सराईत समज असतो. निष्पन्न आणि निश्फळ काय होणार हे परिस्थिती रुपी नियतीच ठरवते..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

आयुष्य गुलजार आहे..! :-)

क्षण..!

आयुष्य गुलजार आहे..!

काल पावसात भिजतांना थोडीशी तू ओली झाली. माहित होत भिजायला तुला अजिबाद आवडत नाही. तरीही भिजलीस माझे मन ठेवायला. कधी-कधी माहित नाही असं का होवून जात. एकमेकांच मन जपलं तरी चुकल्यासारख वाटून जात. कदाचित, तुझं मन मला जपता आलं नाही त्याची रुखरुख असावी.
माझ्यामुळे अनइच्छेने तुझ्या मनाला मुरड तू घातली असावी. माहित नाही असं का वाटतं. एकमेकांची सवय-आवड अगदी वेगवेगळीच. कुठल्याही गोष्टीचा स्वत:च्या लेखी असलेल्या महत्वाला, कुठल्याही स्वरुपात कोणी सहज दुजोरा देवू शकत नाही. पण! तू दिलास, अगदी सहज दिलास.
आनंद तेव्हा ओसंडून वाहात होता. कसं जमलं आणि का केलं याचा विचार केलाच नाही. किती सहज आवडत म्हणून मन जपलंस. वाटत होतं हा पाऊस थांबूच नये. वेळ पुढे जावूच नये. असंच हुंदडावं या पावसात. स्वत:चे अगदी अस्तित्वही विसरुन जावे.
पण! हा पण येतोच मध्ये. 'थरथरत्या ओठांत आणि गोठलेल्या शब्दात बस! कर ना आता किती भिजणार?' बराच पावसाळा बाकीये अजुन, पुन्हा भिज पण आता पुरे हं! अजुनही तसाच तो पाऊस नजरेसमोर पडत असतो. मनाला मुरड घालून दिलेल्या सहमतीत उत्साह तुझा नैसर्गीक असतो. मुखावर साधी रेषही नसते ना डोळ्यात संकोच.
कुणाला स्वत:पेक्षा जास्त महत्व देणे असते का हे? कि, स्वत:च्या मनासारख करण्यापेक्षा कुणाच्या मनासारख करणे असते? उघड तुझ्या सोबत या विषयावर बोलायचे तर तुझ्यासाठी हा विषय विनोदच होवून जातो. हसणे मग तुझे थांबता-थांबतच नाही. गाल धरुन काहीही विचार करतोस म्हणने चुकत नाही.
थोड तुला जपून बरचसे तुझे मला जपणे असते. आभाळभर दु:खावर कणभर सुखाचीच वाटावाटी होते. त्यातही मनात येतंच तुझ्या वाटेला किती आलं? थोड असलं तर ते ही मलाच वाढलं असतं. मग का म्हणू नये मी "तुझ्यासोबत माझं आयुष्य गुलजार आहे..?"
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com