♥
♥ क्षण..! ♥
मागची पाने..!
कधी-कधी मागची पाने उलटून बघायचे. पुढे-पुढे धावत जाणारे आयुष्य; जगणे कसे झाले स्वत:लाच कळू द्यायचे. कधी-काय-कशी-केव्हा-का-कशाला? आज पुढच्या पानावर उमटत नाही. मागच्या पानांवर मात्र सगळे आहे. मागच्या त्या पानांमुळेच पुढच्या पानाला अर्थ आहे. पण! मागच्या पानावर काय आहे त्यावर मात्र पुढच्या पानाचे भवितव्य आहे..!
आठवणे असेल कि भेटणे असेल? तुटणे असेल कि जोडणे असेल? आवरणे असेल कि सावरणे असेल? गुंतणे असेल कि मोकळे सुटणे असेल? बोलणे असेल कि एकचित्त होऊन ऐकणे असेल? सुख असेल कि दु:ख असेल? कसलाच पुरावा नाही काय आहे मागच्या पानावर. पण मागे एक पान आहे. त्या पानावर आयुष्याच्या वेळेचा अथवा उपभोगलेल्या क्षणांचा बंदिस्त शब्दात कोरीव कालखंड आहे..!
पुढे आल्यावर मागे असतेच काही तरी. खरे तर मागे असायलाच हवे काही तरी. पुढे आलोय याची पण स्वत:शीच खात्री करावी लागते. मागे पुन्हा जाणे होत नाही. जाणे झालेच तर फार काळ मन तिथे रेंगाळत नाही. पुढे असलेला वास्तव त्याचे अस्तित्व उमटवून ठेवायला मागून पुढे ढकलत आणतो. शाबूत अवस्थेत कसलीच धुंदी असत नाही..!
मागच्या त्या पानावर तरी बोटे फिरवावी वाटतात. प्रियकराणे दिलेल्या गुलाबाला प्रेयसी जशी हळूवार कुरवाळते-गोंजारते तसेच त्या मागच्या पानांसोबत करावे वाटते. छान असेल म्हणून किंवा वाईट असेल म्हणून नव्हे, तर 'ते माझ्याच आयुष्याचे एक अस्तित्व आहे म्हणून'..!
पुढे जाऊनही मागे रेंगाळणा-या पावलांत कोसळावे किती? मागच्या संदर्भांचा आधार घेऊन विस्कटलेलं आयुष्य सावरावे किती? सतत मागे-मागेच राहाणारे मन एकदम पुढे तरी किती लोटावे? मागच्या पानांवर असलेल्या जखमांची खपली ओढून पुढचे कोरे पान रक्तरंजित वेदनांच्या सोहळ्यानी सजवावे किती..?
मागे राहिलेलं-झालेलं-केलेलं-अनुभवलेलं पुन्हा पुढच्या पानावर आणून ठेवावे कशाला? जगणे सोपे व्हावे उद्देश जरी असला तरी पण मागचा आढावा श्वासांचा अजुनच कोंडमारा करतो. थोड फार ठीक असलेलंही मग आलबेलच्यापलिकडे गेलेलं असते. स्वत:वर नियंत्रण ठेवणे मग जमवायचे कसे?
ति-हाईत होऊन मागच्या पानांचा तिरस्कार करावा तर ते ही शक्य नाही. क्षणभर डोळे मिटून ती धुळ झटकून टाकावी तर मळभ म्हणून मनावर चिकटलेले त्या धुळीचे कण स्वत:चे अस्तित्व विसरत नाही. आयुष्याची चुक म्हणून ते व्रण तसेच राहातात. पुढे पाने वाढत जातात आणि नशिबाच्या पुला खालून बरेच पाणी वाहून जाते. सल म्हणून राहिलेली मागची पाने तशीच असतात वाट बघत. शब्दांवर धुळीचे थरांवर थर रचत. उलघडून देखील आयुष्य एक कोडंच ठेवत. मागच्या पानावर त्या प्रत्येक पुढच्या पानाचे उत्तर घेऊन अलिप्त-दुर्लक्षीत..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment