♥
♥ क्षण..! ♥
कुणास ठाऊक..?
कधी-कधी चंद्र चांदणीजवळ जाऊन बसतो. रोज आभाळसोबत असतांना एकटाच असतो. त्यालाही कळत असावं सहवास म्हणजे काय! थोडावेळ कुणाला देऊन सुख म्हणजे काय! व्यवहार नसेल ना? शुद्ध गरज. थोडावेळ त्याच्यासोबत जावा, थोडावेळ तिच्यासोबत जावा. आभाळातही मग एक क्षितिज किनारा हेरून ठेवावा. दोघं स्वत:च्या सौंदर्यात नभातल्या रात्रीला सजवतात. शृंगाराणे नटलेल्या त्या दृष्यास नजर लागते. हृदयाच्या एका कोप-यात उभ्या मधुचंद्राची सल लागते. स्पर्श होत नाहीत भासच ते मिलनाचे! कलेकलेने दुरावे वाढणारे, विश्वासाचे सुजाण क्षण पुरावे मागणारे बनतात. दोघंच एकमेकांचे एकमेकांना संशयाच्या तराजुत तोलतात. तू कुणा-कुणाचा? तू कुणा-कुणाची? उत्तरे गृहित धरतात. प्रतारणा मग उरतच नाही, सत्य ओठांवर येत नाही. असेच दोघंही एकमेकांपासून दुर होतात. काळोखाला औपचारिक उजळवून सोडतात. चांदण्यांच्या गराड्यात दोघं एकटे उरतात. उभारला संसार मोडत मात्र नाहीत. कर्तव्ये निभावूनही एकमेकांचे ऋण फेडत नाहीत. एकमेकांना व्यवहाराचे हिशेब मागत नाहीत. एकमेकांवर उपकार करुन स्वत:चे देवपण सोडत नाहीत. तरीही मनातल्या मनात एकमेकांसाठी खट्टू होत राहातात. हळवेपणा मुखावर उमटत नाही. झालं-गेलं निसटून जात नाही. दोघांची स्वतंत्र प्रतिभाश्रेणी असुनही अवलंबून असणे चुकवत नाही. एक सुखी कुटूंब म्हणून जगासाठी ओढलेला मुखवटा गळू देत नाही. प्रतिष्ठेचा पदर ढळतांना सावरणे तो निभावतो. सुटतांना त्याचा तोल ती सावरते. श्रेय मग दोघं एकमेकांना देत नाही. कर्माचे फळ फांदीवर येत नाही. रिकामा झुलाच असतो तो. वांझ तिला म्हणता येत नाही. नामर्द त्याला म्हणता येत नाही. कुणास ठाऊक..?
------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment