♥
♥ क्षण..! ♥
घन व्याकुळ..!
डोक्यावरची भाजीची परडी तिने लगबगीने खाली ठेवली. पाण्याचा तांब्या म्हातारीने हातातून अगदी ओढुनच घेतला. वर नारायणाचा ताप काय कमी नव्हता. दारात भर उन्हाची ही महामाया प्रकटली. माझं दार उघडं होत म्हणून धाडस झालं असावं तिचं. अन्यथा अंगणातल्या वाघ्याला न जुमाणून दार गाठण्याची कुणाची ब्याद जन्माला आली नाही. तांब्या घशाखाली रिचवणार होतीच तेवढ्यात मी हटकल तिला. ओट्यावर बसा आधी मग सावकाश पाणी प्या!
शरीरावर कितीही सुरकुत्या चढल्या तरी आपलेपणाने बोलले गेलेले चार शब्द वात्सल्य आणि करुनेला पुरेसे ठरतात. परडी बाजूला ढकलत म्हातारी मटकन बसली. एक क्षण स्थिर होत तांब्या मुखाला लावून गटागटा पाणी प्यायला लागली. उन्हाने होरपळलेला देह असल्यावर भान कशाचं राहतं? त्यात तहानेने व्याकुळ झालेला कोरडा कंठ म्हणजे अधीरतेने तापलेला वाळवंटच. तृष्णा शमल्यावर गंधर्वाने कृतज्ञ व्हावं अन् देवताने प्रसन्न स्मित वदन करावं असे दुहेरी भाव म्हातारीच्या चेहऱ्यावर होते.
म्हातारी : बर्र झालो बगा तुम्हच दार उघड धाडलं. न्हायत आज सुटलेच आसत्ये.
मी : सुटून काय मिळवलं असतं? जीवाचं रान केलं ते काय कमी झालंय का..?
म्हातारी : ते बी हायेच. पन गरीब करनार तरी काये?
मी : ही काय वेळ आहे का भाजी विकायची? त्यातपण गिऱ्हाईक काय मिळतात..?
म्हातारी : गिराईक लई लागो तितेक मिळत्यात पर मानुस एग बी नगं.
मी : मग पोटापाण्यासाठी आतड्याला कशाला पीळ द्यायचा या माणसाने..?
म्हातारी : जगण्यासाटी...
मी : .......... एवढा आटापिटा जगण्याचा मग सुटण्याची चिंता का करायची..?
म्हातारी : चिंता न्हाई. म्हताऱ्याक वचन दिलो हाय. पावसोतच ईल म्हनून.
मी : ते का म्हणून?
म्हातारी : त्यो घनश्याम न्हवं. आन म्या कविता. आमुचो मिलाप पावसोतच. उन्होत न्हाई.
मी : अच्छा! आणि हे ठरवलं कुणी..?
म्हातारी : म्हताऱ्याक दम आस्सल का? त्ये बेनं गेल भर उन्हाक. म्या नगं म्हनलं तरी बी.
मी : तुम्ही कशाला या भर उन्हात मग..?
म्हातारी : ते हैत नं. या भर उन्हात म्हनून.
मी : धत्त! काही तरीच काय..?
म्हातारी : नगो वैतागु. ह्या उन्हाची धग म्हताऱ्याने कशी सोसली तेच बघाया निघते. पर गिराईक हाय का वैरी कळ्याक न्हाई. सावलीतच धाडत बग. पर आज इथवर जीव लई कसानुसा होऊन गेलता. गिराईक बी न्हाई आन सावली बी. तुम्हची आमराई दिसली डोळ्याक म्हनून धरली वाट. त्येत बी तुमच दार उघड व्हतं म्हनून नाईत...
मी : कशाला जीवाची चेष्टा करावी..?
म्हातारी : च्येष्टा नाय. म्हताऱ्याक काळजीच पिरेम जाळ्याक ह्ये समद.
मी : जळाले असेल मग ते आता तर...
म्हातारी : व्हय. समदं जळ्याल. म्हताऱ्याची रग बी आणि धग बी. काय बी हाताशी आलं न्हाई. डोस्क फुटून जाग्यावरच सुटला. आता माझी बारी. ह्यो पाऊस न्हाई सोडायची बगा!
मी : न्याहारी उरकली का?
म्हातारीने नकारार्थी मान डोलवली. तिने ठेवलेला तांब्या उचलत बसा दोन घास खाऊन जा. म्हणत आत आलो. पिठलं भाकरी कांदा ताटात घेऊन बाहेर येऊन बघतो तर म्हातारी परडी डोक्यावर घेऊन निघायला तयार...
म्हातारी : घरला म्हताऱ्याक युन बसल्याक अस्सल. येते म्या पुना!
माझं ऐकायला ती थांबलीच नाही. गुणगुणत लगबग चालू लागली..
।। घन व्याकुळ तो हाये श्यामरंगा,
अन् भग्न अभंगात दंग तू पांडुरंगा ।।
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
"क्षणातच"
पि. ओ. बॉक्स क्र.६७,
जगळगाव हेड पोस्ट ऑफिस,
जळगाव - ४२५ ००१