Powered By Blogger

Sunday, March 5, 2017

नयन जरा भिजले..! (मराठी सुफी - सात) :-)


♥ क्षण..! ♥

नयन जरा भिजले..! (मराठी सुफी - सात) :-)

त्या रात्रीच्या डिनरनंतर पुन्हा आपली भेट झाली नाही... तुझ्याबद्दल काय वाटलं हे एकदा भेटून सांगायचं होतं... खरं तर आता या गोष्टीला काही अर्थ नाहीये... तुझा तू मार्ग निवडलास आणि माझा मी निर्णय घेतला... वाटा वेगळ्या झाल्यात आपल्या अन् प्रवासही... पण तरीही पाऊले एकदा माघारी वळतातच...

सांगू शकत नाही मी
माझी रात्र कशी जाते,
अंधारात गप्प रातराणी
अगदी तू तशी वागते...

लुडबुड करावी जरा तर
तू सपशेल टाळून जाते,
आपल्यातलं एवढं अंतर
उंबरठ्यात पाळून घेते...

ना मला काही बोलवे
ना तुला काही बोलवे,
हे सारेच किस्से जुने
तरी वाटतात नवे-नवे...

ओघवत्या प्रवाहात मग
झालं-गेलं सगळं मांडतो,
भर वाळवंटात एकाकी
सावली सोबत भांडतो...

माझं वेड जगाला
न तुझं वेड मला,
तरी गुंतागुंतीचा
हा साराच मामला...

अजून लाजिरवाणे तुला चारचौघात मी करत नाही... दोष माझाच आणि गुन्हाही... फरार आरोपी मी जबाबदार तुला धरत नाही... कवडी मोलाची ही जिंदगी... भावनांचे व्यवहारी मोलभाव मी करत नाही... पटलं तर ठीक अन्यथा फसगत स्वताचीही करत नाही... याचना नाही अन् गाऱ्हाणेसुद्धा नाही... हा उध्वस्त वादळ कोणत्याही परिणामांची पर्वा करत नाही...

पुन्हा पुन्हा तेच तेच
कितीदा बजवायचं,
सांगून थकले रे मी
कितीदा समजवायचं...

लाट किनाऱ्याची नसते
किनारा लाटेचा नसतो,
एकाजागी उभे राहून
प्रवास पूर्ण होत नसतो...

अंतरे निरंतरे झालीत
दुरावे कायमची झालीत,
नियतीचे समज भाकीत
हे आयुष्यच तुझं शापित...

मला काही वाटत नाही
तुला पाहून वाईट वाटत,
तुझी ही फरफट पाहून
काळीज माझं तूट-तुटत...

जळत नाही मी तरसते
सर होऊन तुझी बरसते,
माझीच नसते मी कधी
तुझी होऊन सारं विसरते...

ऐक आता तरी माझं
पुरे झालं उध्वस्त असणं,
शक्य नाही तुझं होणं
शिक आता तरी तू जगणं...

विसर मला सांगून मी चुकले
आठवणीत रमते अन् झुरते,
पण तुझी असूनही कुंकू मी
एका गैराचं भाळी मिरवते..!

.....तो निशब्द होतो... जडावलेली पावले न भिजलेली डोळे जगापासून लपवत रहातो... ओठांचे हसणे जो तो बघतो त्याचं... पण त्याचं मन कोणीच जाणत नाही... त्याची यातना वेदना होऊन कधी समोर येते त्याचं त्यालाही कळत नाही... तरी तो जगतो खोट्या आशेवर... लुभावण्या स्वप्नांवर विश्वास ठेवून... कारण नयन जरा भिजले निश्चित असतील पण श्वास... श्वास अजून थिजले कुठे..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment