♥
#फोनकॉल
#कोट_फाट
(लॅण्ड लाईनच आहे टूर-टूरच रिंग जाताना ऐकू येत होते. चार-पाच टूर-टूरनंतर..)
आई - हॅलो?
मी - आई मी ये.
आई - एवढ्या भर दुपारी? का रे काय झालं? मुंबईत ऊन बिन लागलं का?
मी - (पडल्या आवाजात) तसं काही नाही. बस आयुष्याचा प्रश्न पडलाय!
आई - कसला प्रश्न? (गंभीरतेने)
मी - लहानपणी अगदी शिशू अवस्थेत नाटकं केली होती का गं मी?
आई - २९वर्षे मागे जावं लागतंय थांब. जरा टिव्हीवरची मालिका बंद करते.
मी - (होल्ड करत) बरं!
आई - (एक-दोन क्षणानंतर) हां, बोल आता.
मी - (गंभीरपणे) सांग ना लहानपणी काही नाटकं केली का मी?
आई - फार अशी नाहीस केली. कुणाजवळपण सहज राहायचास. रमायचास.
मी - तो स्वभाव झाला गं माझी आई. नाटकं सांग!
आई - आता काय आठवतंय रे ते सगळं. (दमलेल्या सुरात)
मी - (निराश होऊन) म्हणजे मी काय नाटकं केलीच नाहीत की काय?
आई - (आक्रमकतेने) केलीस की, पण ती नाटकं नव्हती, त्रास होता.
मी - त्रास? तो काय?
आई - एखादं खेळणं आवडलं की ते घ्यायचा हट्ट, त्यासाठी फतकल मारुन भोकाड पसरण्यापर्यंत आपले उद्योग व्हायचे. अख्ख दुकान डोक्यावर घ्यायचास.
मी - तो हट्टच पण मला नाटकं सांग की माझी. कधीतरी केली असतील.
आई - अम्म्म! आठवत नाही रे आता मला.
मी - श्या! एक नाटक नाही माझं?
आई - आठवलं बघ!
मी - काय ते..?
आई - पावसाळ्यासाठी नवी रेनकोट आणली होती. तुला न सांगता दप्तरात भरली मी. सकाळी दप्तर पाठीवर घेतलंस तेव्हा तुला जाणवलं आपलं दप्तर फुगलंय. उघडून पाहिलेस आणि दप्तरच रिकामं केलंस.
मी - मग?
आई - रेनकोट काढलास आणि घातलास बाहेर पाऊस नसतांनाही. कौतुक तुला रेनकोटच.
मी - नंतर काय केलं?
आई - काय करणारेस? रेनकोट घालूनच शाळेत बसलास.
मी - काय..?
आई - नाहीतर काय? दुपारी शाळा सुटल्यावर आपण नवा रेनकोट दोन तुकड्यात सांभाळून बाबांसह घरी परत आलात. मान खाली घालून. बोलतोस कसा. कोट फाट.
मी - काहीतरीच काय?
आई - धड बोलताही यायचं नाही. पण उद्योग एक से बढकर एक होते आपले.
मी - ही उद्योग म्हणजे नाटकं का..?
आई - हो. या उद्योगांनाच नाटकं म्हणतात. पण तू का हे विचारलेस आज?
मी - काही नाही स्पर्धेसाठी लिहीत असलेलं नाटक परत एका प्रवेशात अंधारात गेलं. म्हणून तुला फोन केला. संभ्रमात होतो ना मी की, नक्की नाटकं हीच असतात का म्हणून. तू पुष्टी दिलीस. झालं माझं.
मी - तुझं काही खरं नाही. जमत असेल तर बघ. अन्यथा काही गोष्टी राहू दिलेल्याच बऱ्या असतात.
मी - ठीक आहे. बाकीच संध्याकाळी बोलतो. ठेवतो गं आता.
आई - हम्म, ठीक आहे. (फोन ठेवता-ठेवता काही खरं नाही कारट्याचं!)
मी - कुठून फोन केला..?
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३