Powered By Blogger

Tuesday, May 22, 2018

ऋतू.. बहरता बहरलेला..! (कथा भाग-५) :-)


वाचा ब्लॉगवर
भाग-१
https://kshanatch.blogspot.in/2017/12/blog-post_21.html
किंवा फेसबुकवर
https://m.facebook.com/Kshanatch

♥ क्षण..! ♥

ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-५)

"..आवर्तन गळून पडते का? एखाद्या स्वप्नरंजनातल्या नाटकातून प्रेक्षक खडबडून जागा झालेला ऐकिवात तरी आहे का? नुसत्या कुजक्या कल्पना! प्रॅक्टिकल जगण्याचा पॉझिटिव्ह असण्याशी संबंध कळतो, पटतो देखील. साधी संकोचिंत मनोवृत्ती थोडीजरी आरूढ झाली तर मात्र सगळंच बिनसलं! किती निगेटिव्ह विचारसारणी वगैरे वगैरे! पुढ्यात असलेलं वास्तव जरी असले, तरी त्या वास्तवावर भूतकाळाची व्रण असणारच! सहज म्हणून एखादी ऑफर स्विकारता येते पण नातं? नातं ऑफर नसते ना कोणत्याही प्रॉफिट & लॉसची डील. नातं म्हणजे बॅलन्सशीटचे दोन स्तंभ "ती' ॲसेट & "तो" लॅबिलिटी! अकाऊंट टॅली होण्यासाठी भावनांसह शरीराचेही ट्रँझ्याक्शन व्हायलाच हवे असतात का? मग डेबिट-क्रेडिट करता-करता पर्सनल अकाउंट बॅड डेब्टस् म्हणून कधीच बुडीत निघालेलं असतं!

..व्यवहार न जमणाऱ्यांनी व्यवहार करूच नये. बाजारपेठेची जोखीम शिंगावर पेलता येत नसेल तर खुशाल बुडाऊ खाते म्हणून लौकिक मिळवून घ्यावा. पैसे कर्ज म्हणून देणारेही गप्प आणि आपले देणेही ठप्प! व्यवसाय आज ना उद्या जम बसवेल या आशेवरचे देणगीदार दिलखुलास तुमच्या व्यवसायात स्वतःचा पैसा ओतत राहतात. याच धरणीवर जर प्रेम फतकल मारुन बसले तर तुटपुंजा व्यवहार सुरू झाला. मराठी माणसाला एवढंच दिवास्वप्न स्वतःच संपूर्ण आयुष्य कंठायला पुरुन उरतं आणि ओसंडून वाहतंही. श्रेय लाटणारे जागावेगळं तुमच्याशी काही वागत नसतात. तुम्ही मात्र सगळ्यांना कोळून पियून अगदी रिचवून पूर्णतः बदलेले असता. अगदी सरड्यालाही स्वतःच्या रंग बदलण्याच्या कसबीवर तुमचे रंग पाहून लाज वाटावी इतके!..

..मनगटातली ताकद दाखवायला व्यवसाय कुस्तीचा आखाडा नसतो. गरुड झेप वगैरे मग भाकड कल्पनाच. काहीतरी करुन दाखवायला संधीसुद्धा मिळायला हवी. माणसांना स्वतःच्या बुडाखाली दाबून ठेवलेली बोटं सोडायला जमत नाही. संधी मिळता मिळत नाही. सरतेशेवटी हुकुमाचा एक तुक्का एक्का पोतडीतून बाहेर काढलाच तर महागड्या क्लबमध्ये मुरलेले रम्मिबाज तुमची मेंढी कर्जबारी करुन हलाल करतात. एका क्षणात राजाचं राज्य सगळंच गेल्यावर मग तुमच्यासारख्या जोकर जवळ "राणी" कसली टिकणार? ती केव्हाच खेळ ओळखून स्वतःला अलिप्त आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून पसार झालेली असते!..
..मग रडीचे डाव आपण खेळू लागतो. काही काळ राणीचे अपडेट्स जवळ बाळगतो. राणीही तुमच्यासारख्या जोकरचे स्वतःचे मनोरंजन म्हणून अपडेट्स ठेवत असते. सपोर्टला कुणीच नसतं! पासपोर्ट आणि ग्रीनकार्ड या जोरावर इंग्रज लूट आजही करतोय. थिंग्ज आर हॅप्पन! गोष्टी घडत राहतात. वेळ जात जाते तसे जोकरचा आदिमानव पुन्हा माणूस बनू लागतो. घडतो व स्वतःसोबत इतरांनाही घडवतो. जे जमत नव्हतं ते जमलेच नाही. जे जमतंय त्यातच परिपक्व होऊन स्वतःच वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होतं. फुटपाथवर काढलेल्या दिवसात भिकारीही शिकवून जातोच "हर कुत्ते का दिन आता हैं साब, मैं तो इन्सान हैं, आज खाली पेट के दुःख से मैं सो नहीं पा रहा हूँ, और खुशीवाली रात को कौन भला सोता हैं?

..माणसाच्या उपाशी पोटाने शिकवलेलं शहाणपण अजून कुणाला चांगल्याने शिकवता येत नसते. या उपासमारीची शिकवणीत काही नसलं तरी तुमची भूक कशाची आणि किती आहे हे मात्र कळतं! अर्थात समजून घेतलं तर. अन्यथा अधःशिपणा भोवतोच! तृप्तीची ढेकर निघता निघत नाही. अनुभवाची झालेली ॲसिडेटीचे औषध गुणकारी ठरत नाही. सुखाचे जे काही अजीर्ण व्हायचे ते होतेच यात अपवाद 'मी' ही नाही आणि 'तू' तर मुळीच नाही. कुरघोडीच राजकारण मग करावं तरी कुणावर? जे सिद्ध करुन दाखवायचं होते ते स्वतःहून सिद्ध झालेले असते. फळ मिळालेले असतांना भूक लागलेली आहे असे नसतेच! वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाण्यातले मगर पाळून ठेवलेले आहे आणि स्वतःला व्यावसायिक शार्क मासे समजणाऱ्यांना कॅपिटल पुरवून भाडोत्री भांडवलशाहीची पुंजी बनवून ठेवली आहे. असत्या-नसत्या परिणामांची चिंता म्हणावी तशी काही एक नाही. आता काही आहेच किंवा असलंच तर "बदाम राणीचा" मोह तोही क्षणभंगुर ठरला की संपलं सगळंच..!
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

No comments:

Post a Comment