Powered By Blogger

Monday, May 30, 2016

ग्रहण..! :-)


♥ क्षण..! ♥

ग्रहण..!

म्हणावे तेवढे आस्तिक मी नाही. तोंडावर तोंड पडलं आणि वाटेत वळण घ्यावे लागले. पायरी चढून अगदी गळा भेट घ्यायची चूक माझ्याने होत नाही. बोलायला नवस आणि फेडायला पांग माझ्यासारखी नास्तिक लोक्स तळव्याखाली ठेवतात. कर्माचे व्यवहारी धर्म होतात. त्यासाठी स्वतंत्र वेळ आणि मनात आस्था निर्माण होण्यासाठी कुतूहल तरी कुठं उरतं? मिळत?
दगडच आहे! दगडाने मुळात दगडाला भेटू नये. संघर्ष जास्त होऊ लागतो. जाणिवांना खुंटल्यावर वास्तवात दोन दगडांमध्ये फरक तरी काय उरलेला असतो? भावना, आस्था, प्रार्थना आणि प्रेरणा यांची सांगड पायऱ्यांपेक्षा, अनुभवांच्या गाभाऱ्यात जास्त चोखंदळपणे लागते. पायऱ्या चढून दगड भेटतो आणि अनुभव तुडवून शहाणपण. दोन्ही सारखच आहे. मनात समाधान असेल तर प्रसन्न कुठेही वाटत. चारित्र्य पवित्र ठेवलं तर शरीराची अगणित संपत्तीची मालमत्ता वंदनीय वाटते.
उजेडात चाचपडत प्रश्न घेऊन उत्तरे मागायला जातांना अंधारात स्थिर असलेला दगड केविलवाणा वाटतो. उजेडात यायचं धाडस नाही. तेजोमय केलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मुखावरच्या कितीतरी रेषा दिसतात. बघायची नजर आणि स्वीकारायची ताकद तेवढी हवी असते. आव्हान कुणालाही देता येत. स्वीकारायचं धाडस तेवढं हवं असत. नास्तिक म्हणून स्वतःच्या आस्तिकतेला आव्हान देतांना भेटत किंवा मिळत काहीच नाही. मुळात कुणीच नाही. मनात असलं की, हसण्याचा भास आणि कृपादृष्टीचा भास निर्माण होतो. त्यावरच नशिबाची खेळी चालते आणि नियती क्रूर होते. वेड्यागत आयुष्य होऊन फजिती होते. त्याची अस्तित्व शोधण्याची दूषण लागतात. सिद्ध करायचेच म्हणून अभ्यास, ध्यास पुढे आभास होतात. अनाकलनीय उकलत नाही. जे सरळ साधं तेही गोंधळ माजवत. दिवस रात्रीचे विज्ञान कळता कळता अमवास्याचे ग्रहण चिकटते. खेळच तो ऊन-सावलीचा उजेडापेक्षा अंधारात जास्त नेणारा. स्वतःला निश्चयी आणि ठाम ठेवूनही काळोखातच ओढत नेणारा.
मग आस्तिक झालं काय आणि नास्तिक बनलं काय? उद्धार हा परिस्थिती आणि परिश्रमाच्या तपस्येवर ठरलेला. मग त्याला साधना म्हणायचं की, अध्यात्म? हा विचार करणारा भाग आहे. या सगळ्यात जाऊ द्या ना आपल्याला काय? हा कधीही पिच्छा न सोडणारा ग्रहण आहे. एकतर पळ काढायचा. नाहीतर सामोरे जाऊन बघायच अंधारात ग्रहणाएवढं प्रामाणिक कुणीच असत नाही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Tuesday, May 17, 2016

आक्रोश (2) ..!


♥ क्षण..! ♥

आक्रोश (2) ..!

घोडदौड सुरु झाली म्हणून नुसतं धावायचं नसतं. पाण्याचं तळ दिसलं की, तहानलेलं व्हायचं असतं, जरा विसवायच असतं आणि मागे असलेल्या गर्द दाट अंधारात पाण्याच्या होणाऱ्या खळखळाटीत आपलं सावज अचूक टिपायच असतं. तेव्हा कुठं एखादा श्रावण बळी पडतो. पुत्र वियोगाचा श्राप मिळतो आणि देखणा अंत विद्रुप होतो. अगदी त्याच क्षणाला फुटलेला टाहो फक्त शांततेने ऐकायचा असतो. कारण तो आक्रोश फक्त काळीज चिरणारा असतो आणि हुंदका आतल्याआत कोंडणारा..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Friday, May 13, 2016

वन स्वीट गुडबाय..! :-)


♥ क्षण..! ♥

वन स्वीट गुडबाय..!

दिवसांसोबत एकदिवस असाही येतो, जेव्हा काही कारणाने आणि परिस्थितीच्या विनाकारणाने 'गुडबाय' बोलणे भाग असते. नात्यात दुरावे निर्माण व्हायला परिस्थितीचे एक कारण पुरेसे असते. काळ वेगाने आपली कात टाकतो अन् सामान्य असलेली परिस्थिती असामान्य करतो. स्वतःइतकं नियंत्रण त्या क्षणाला मनावर आणि माणसांवर असत नाही. प्रवाह आहे नियतीचा म्हणून पावलाखाली आलेल्या वाटेने चालणे होत असते.
दारात उभे राहून वाट बघत रेंगाळत उरणाऱ्या नजरांना ओल कधी येते? हे पापण्यांनाही कळत नाही. पावलांनी तरी चालावं लागतं! हातामधून हात सुटतांना जगाच्या भल्या मोठ्या प्रवासात असंख्य माणसे एकटी वावरत असतात. मनावर ओझं कुणा-कुणाचं घेऊन जायचं? नियती आणि परिस्थितीचे आपापसात संगनमत झाले असते. प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या माणसांच्या अधेमध्ये लुडुबुड होत असते. एकदिवस त्यांची फजिती निश्चित होते.
चालणं तरीही भाग असतं. मागे वाट पाहणारी केविलवाणी नजर आणि ओढ लावणारे  जिव्हाळे उरले असतात. भरुन आलेलं मन कोरडं करुन पावलांनी चालावचं लागतं. प्रवासाचे ते आव्हान असते म्हणतात. कुठंतरी आयुष्याचा सार शोधतांना, माणसाला आपल्यांनाच तिलांजली द्यावी लागते. सहवासात जगलेल्या आयुष्याची शिदोरी पाठीशी बांधली गेली असते. जडावलेल्या पावलांनी मैलांचे अंतर वाढवतांना जीवावर येते. कुणासोबत अथवा कुणाशिवाय स्वतःच्या कर्तव्याची परतफेड करायला माणूस चाकोरीत बांधला गेलेला असतो.
प्रवासाला लागत असतांना काळजीचे सूरही छेडले जातात. प्रवासात असलेल्या माणसाने दूर जातांना अपल्यांना तोडून न जाता आपल्यांची मनधरणी करुन जावं. इतकाच खटाटोप तक्रारींचा सुरांचा लागत असतो. प्रत्येक प्रसंगाच हसून स्वागत करायची मानसिकता बनवली गेली असते. त्यावेळी शांत असणं हे काहीच वाटत नाही याची चुगली करत असते. मनात असलेलं आणि उठून थोपवलेलं वादळ ज्याला त्यालाच सावरावं लागतं.
प्रवासाचा संपूर्ण ऐवज सोबत असूनही मागे राहिलेल्या आपल्यांच्या जिव्हाळ्याचा, काळजीचा आणि धीरगंभीर भीतीचा दागिना मौल्यवान असतो. कंठातून बाहेर येणारा स्वर बराच कापरा आणि हळवा असतो. त्यालाही फाटा देऊन पूर्ण परिस्थितीची जाणीव देणं आणि ओघाओघाणेच निरोप घ्यायला लावणं, जुळून आणावं लागतं. हसत माणसे आयुष्यात आल्यावर हसमुखतेने त्यांनी आपलाही निरोप घ्यावा. अशी इच्छा शेवटी बळकट असावी लागते अथवा स्वभावात हसविण्याचा दोष तरी असावा लागतो. शेवटी दिलेलं घट्ट आलिंगन सोडवतांना मन आणखी मागच्या उंबरठ्यात गुंतलं जातं. काही अंतरावर हातात हात गुंफून चालतात. सोबत पावले मिळवत चालणाऱ्या पावलांना माघारी जा म्हणताच, डोळ्यात दाटलेलं आभाळ बरसू लागतं.
लाटांमागून असंख्य लाटा येत राहतात. एका क्षणी मनही कुचकामी होऊन जाते. सगळे बांध झुगारून पुन्हा एकदा आपल्यांना घट्ट कवेत घेऊन आश्वासनांची बांधणी करते. पुन्हा मनधरणी होते! प्रवासाचे स्वागत करतांना निरोपाचे मनोगत व्यक्त होते. आठवणींचा उजाळा मग दिलासा देतो आणि अखेरीस प्रवासी नजरेत पुन्हा परतण्याची ओढ ठेवतो. 'वन स्वीट गुडबाय' करुन मार्गस्थ होऊन जातो..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Sunday, May 8, 2016

पुन्हा तुझी आई होणार नाही..! :-)


♥ क्षण..! ♥

पुन्हा तुझी आई होणार नाही..!

आईला नमस्कार सांग माझा...
घरी येऊन घालून जा दंडवत...
नको परत किटकीट करेल...
हे असं ते तसं उणेदुणे काढेल...
निरोप मी देणार नाही एवढं नक्की!
वाटेत भेट झाली का ती विचारेल...
माहीत आहे तिचं मन तर भेट घे!
घर वाटून घेतलंस आई वाटू नकोस...
बायकोला घेऊन काश्मीरला जातोय...
आईला कोपऱ्यावरच्या मंदिरात नेलं असतं एकदा...
तू आईचा पदर सोडला नाहीस, तुला नाही कळायचं!
हम्म! घे शिरा पाठवलाय आईने घरी ने आणि खा...
माझं स्टेशन आलं लोकल पुन्हा निघाली...
दारात आई भेट झाली का रे मोठ्याशी, कसाये?
आहे तसाच! ये बस रसमलाई आणलीय तुला आवडते ना...
कशाला आणल? शुगर वाढते ना! शिऱ्याचा डबा घेतला?
हो! दोन वर्ष झाली रे एकदाही भेटला नाही मला नेशील?
एकदा भेटव तुला न त्याला सारखेच वाढवले जपले..
"आई" होण्यात कुठं कमी पडले विचारायचं आहे...
बरं! जेवून घे, गार होतंय सगळं... की, भरवू?
भरंव.. आहा! ते गीत बदलायला हवं आता..
कोणतं?
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही...
एकटी एकटी घाबरलीस ना..?
आमची आई बघा आणि सांगा लेकरु कोण..?
नालायका! थांब तू..!

आणि मग काळ येतो..

मोठा औपचारिक येतो, कर्तव्य निभावतो...
भडाग्नी देतांना, काही बोलली का रे आई..?
हो! पुन्हा तुझी आई होणार नाही इतकंच..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Wednesday, May 4, 2016

मराठी सुफी प्रयत्न क्र.८ :-)


♥ क्षण..! ♥
मराठी सुफी (प्रयत्न क्र.८ )..!
बरेच दिवस झालेत... आठवणींचे गाठोडे काही सुटले नाही. तू आठवलं नाही अन् मी माझं अस्तित्व सांगितलं नाही. तू प्रश्नांचा माझ्या मागे सूर लावते आणि मी उत्तरे देता-देता मनातलं काहूर थोपवतो... तरी वादळ उठतंच! तरी वादळ उठत सगळं काही इतस्तः विखुरत... जागेवर एक-एक पुन्हा आणतांना काही हाताशी लागतं, सापडतं आणि हरवलेलं असतं ते मनच अजून काय..?
कोवळ्या किरणांची एक
तू लख्ख सोनेरी पहाट,
साद घालते माझ्या मनी
ती तुझीच हळवी लाट..
चाहूल लागता तुझी
अबोल होते पैंजण ही,
रेंगाळतो उगा अंतरावर
बोलतो मग नाही काही..
मौन तुझे कळते मला
श्वासात गंध दरवळतो,
झुकते पापणी माझी
तू ओठात मग हासतो..
कधी सहज उलघडतो
कधी आणखीच गुंततो,
हात घेऊन हातात माझा
तू माझं मन हरवतो, चोरतो..!
मी! कुठून सुरुवात करायची आणि काय काय सांगायचं तुला? एकमेकांचं मन कळू लागल्यावर औपचारिकता बाळगावी कशाला? माझं मन कोरडं असत तुला माहीत आहे... तरी मनात कुठंतरी ओल आहे तुला वाटत... मी! वाळवंट बनवत जातो तू निवडुंग जगवत राहते... तुझं प्रेम करणं होऊन जातं, माझं प्रेम करणं नेहमी राहूनच जातं..!
ना बोलते काही
ना ऐकते काही,
स्वतःच्या मनाचे
तू करते सर्व काही..
मी सांगावे काय?
तू भलते करावे,
स्वप्नांचे झुलेही
जरा हलते ठेवावे..
मन सहज गुंतत
बंधनंही झुगारत,
काही कर, मन
हार माणून घेतं..
तू असतेस जरी
तू नसतेस तरी,
रितेपणाला अर्थ
लागतो..... घरी..
तू खरी मी खोटा
उन सावलीचा खोका,
माझं खरं माझं खरं
सर्वांचंच........ ऐका..
सर्वांचंच ऐका..!
मनाचं ऐकलं असतं तर असं कदाचित झालं नसतं... आपल्याला हवं तसं अगदी पाहिजे तसं आयुष्य जगता आलं असतं... एक पाऊल तू पुढं ये! दोन पावलं मी पुढे येतो आपल्यातलं अंतर मिटवून टाकू... असतील काही अडथळ्यांच्या चौकटी तर चल उचकटून टाकू... कसला समाज आणि कसली रितभात..? स्वतःच वेगळं अस्तित्व नसतं कोवळ्या गर्भात.. वेगळं अस्तित्व नसतं कोवळ्या गर्भात..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Sunday, May 1, 2016

सैराट..! (भन्नाट) :-)


♥ क्षण..! ♥

सैराट..! (भन्नाट)

उरात प्रवाहाविरुद्ध जाण्याची झपाटलेली वृत्ती घेऊन साकारण्यात आलेला एक मनोरंजन पट.. कथानकाचा विचार, चोखंदळ आणि मार्मिक गाणी, भूमिका साकारणारे कलाकार जेष्ठ न मुरब्बी कलावंतांनाही शिकवून जाण्याची धमक ठेवून असलेली... सर्व दृष्टिकोनातून दिग्दर्शकाने कसलीच कसूर बाकी ठेवलेली नाही... त्रुटी काढायला स्वतःला पूर्ण बरोबर समजणाऱ्या माणसांना केल्यानंतर धुवायची आणि पुसायचीही शुद्ध ठेवायला हवी... मनोरंजनातून समाजाचं पुन्हा एकदा नागडरूप दाखविल्याबद्दल 'सैराट'च्या सूक्ष्म ते दीर्घ योगदानात सहभागी प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार... माणसाचं मन कायम आपल्या माणसांसाठी झुरतं, कच खात आणि प्रसंगी झुकतेही... त्याच्या मोबदल्यात मिळणारी आयुष्यभराची जखम भरुन काढण्याऐवजी सतत भळभळत ठेवण्याऱ्या बुरसट प्रथाबाज न संस्कारांचा टेंभा मिरवणाऱ्यांना अक्कल छे! अद्दल घडविणारीही पिढी जन्माला घातली गेली पाहिजे... प्रवाहसोबत काही मिळविता येतं पण प्रवाहाविरुद्ध जाऊन सर्वस्व गमविण्यात असलेली मज्जा ही सैराटच्या माध्यमातून अनुभवतांना जगून घ्यायची... लाज वाटेल! हो लाज वाटेल स्वारःचीच..!
अजून लिहावं वाटतं नाही... सैराट जाऊन बघा..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843