Powered By Blogger

Wednesday, May 4, 2016

मराठी सुफी प्रयत्न क्र.८ :-)


♥ क्षण..! ♥
मराठी सुफी (प्रयत्न क्र.८ )..!
बरेच दिवस झालेत... आठवणींचे गाठोडे काही सुटले नाही. तू आठवलं नाही अन् मी माझं अस्तित्व सांगितलं नाही. तू प्रश्नांचा माझ्या मागे सूर लावते आणि मी उत्तरे देता-देता मनातलं काहूर थोपवतो... तरी वादळ उठतंच! तरी वादळ उठत सगळं काही इतस्तः विखुरत... जागेवर एक-एक पुन्हा आणतांना काही हाताशी लागतं, सापडतं आणि हरवलेलं असतं ते मनच अजून काय..?
कोवळ्या किरणांची एक
तू लख्ख सोनेरी पहाट,
साद घालते माझ्या मनी
ती तुझीच हळवी लाट..
चाहूल लागता तुझी
अबोल होते पैंजण ही,
रेंगाळतो उगा अंतरावर
बोलतो मग नाही काही..
मौन तुझे कळते मला
श्वासात गंध दरवळतो,
झुकते पापणी माझी
तू ओठात मग हासतो..
कधी सहज उलघडतो
कधी आणखीच गुंततो,
हात घेऊन हातात माझा
तू माझं मन हरवतो, चोरतो..!
मी! कुठून सुरुवात करायची आणि काय काय सांगायचं तुला? एकमेकांचं मन कळू लागल्यावर औपचारिकता बाळगावी कशाला? माझं मन कोरडं असत तुला माहीत आहे... तरी मनात कुठंतरी ओल आहे तुला वाटत... मी! वाळवंट बनवत जातो तू निवडुंग जगवत राहते... तुझं प्रेम करणं होऊन जातं, माझं प्रेम करणं नेहमी राहूनच जातं..!
ना बोलते काही
ना ऐकते काही,
स्वतःच्या मनाचे
तू करते सर्व काही..
मी सांगावे काय?
तू भलते करावे,
स्वप्नांचे झुलेही
जरा हलते ठेवावे..
मन सहज गुंतत
बंधनंही झुगारत,
काही कर, मन
हार माणून घेतं..
तू असतेस जरी
तू नसतेस तरी,
रितेपणाला अर्थ
लागतो..... घरी..
तू खरी मी खोटा
उन सावलीचा खोका,
माझं खरं माझं खरं
सर्वांचंच........ ऐका..
सर्वांचंच ऐका..!
मनाचं ऐकलं असतं तर असं कदाचित झालं नसतं... आपल्याला हवं तसं अगदी पाहिजे तसं आयुष्य जगता आलं असतं... एक पाऊल तू पुढं ये! दोन पावलं मी पुढे येतो आपल्यातलं अंतर मिटवून टाकू... असतील काही अडथळ्यांच्या चौकटी तर चल उचकटून टाकू... कसला समाज आणि कसली रितभात..? स्वतःच वेगळं अस्तित्व नसतं कोवळ्या गर्भात.. वेगळं अस्तित्व नसतं कोवळ्या गर्भात..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

No comments:

Post a Comment