Powered By Blogger

Friday, May 13, 2016

वन स्वीट गुडबाय..! :-)


♥ क्षण..! ♥

वन स्वीट गुडबाय..!

दिवसांसोबत एकदिवस असाही येतो, जेव्हा काही कारणाने आणि परिस्थितीच्या विनाकारणाने 'गुडबाय' बोलणे भाग असते. नात्यात दुरावे निर्माण व्हायला परिस्थितीचे एक कारण पुरेसे असते. काळ वेगाने आपली कात टाकतो अन् सामान्य असलेली परिस्थिती असामान्य करतो. स्वतःइतकं नियंत्रण त्या क्षणाला मनावर आणि माणसांवर असत नाही. प्रवाह आहे नियतीचा म्हणून पावलाखाली आलेल्या वाटेने चालणे होत असते.
दारात उभे राहून वाट बघत रेंगाळत उरणाऱ्या नजरांना ओल कधी येते? हे पापण्यांनाही कळत नाही. पावलांनी तरी चालावं लागतं! हातामधून हात सुटतांना जगाच्या भल्या मोठ्या प्रवासात असंख्य माणसे एकटी वावरत असतात. मनावर ओझं कुणा-कुणाचं घेऊन जायचं? नियती आणि परिस्थितीचे आपापसात संगनमत झाले असते. प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या माणसांच्या अधेमध्ये लुडुबुड होत असते. एकदिवस त्यांची फजिती निश्चित होते.
चालणं तरीही भाग असतं. मागे वाट पाहणारी केविलवाणी नजर आणि ओढ लावणारे  जिव्हाळे उरले असतात. भरुन आलेलं मन कोरडं करुन पावलांनी चालावचं लागतं. प्रवासाचे ते आव्हान असते म्हणतात. कुठंतरी आयुष्याचा सार शोधतांना, माणसाला आपल्यांनाच तिलांजली द्यावी लागते. सहवासात जगलेल्या आयुष्याची शिदोरी पाठीशी बांधली गेली असते. जडावलेल्या पावलांनी मैलांचे अंतर वाढवतांना जीवावर येते. कुणासोबत अथवा कुणाशिवाय स्वतःच्या कर्तव्याची परतफेड करायला माणूस चाकोरीत बांधला गेलेला असतो.
प्रवासाला लागत असतांना काळजीचे सूरही छेडले जातात. प्रवासात असलेल्या माणसाने दूर जातांना अपल्यांना तोडून न जाता आपल्यांची मनधरणी करुन जावं. इतकाच खटाटोप तक्रारींचा सुरांचा लागत असतो. प्रत्येक प्रसंगाच हसून स्वागत करायची मानसिकता बनवली गेली असते. त्यावेळी शांत असणं हे काहीच वाटत नाही याची चुगली करत असते. मनात असलेलं आणि उठून थोपवलेलं वादळ ज्याला त्यालाच सावरावं लागतं.
प्रवासाचा संपूर्ण ऐवज सोबत असूनही मागे राहिलेल्या आपल्यांच्या जिव्हाळ्याचा, काळजीचा आणि धीरगंभीर भीतीचा दागिना मौल्यवान असतो. कंठातून बाहेर येणारा स्वर बराच कापरा आणि हळवा असतो. त्यालाही फाटा देऊन पूर्ण परिस्थितीची जाणीव देणं आणि ओघाओघाणेच निरोप घ्यायला लावणं, जुळून आणावं लागतं. हसत माणसे आयुष्यात आल्यावर हसमुखतेने त्यांनी आपलाही निरोप घ्यावा. अशी इच्छा शेवटी बळकट असावी लागते अथवा स्वभावात हसविण्याचा दोष तरी असावा लागतो. शेवटी दिलेलं घट्ट आलिंगन सोडवतांना मन आणखी मागच्या उंबरठ्यात गुंतलं जातं. काही अंतरावर हातात हात गुंफून चालतात. सोबत पावले मिळवत चालणाऱ्या पावलांना माघारी जा म्हणताच, डोळ्यात दाटलेलं आभाळ बरसू लागतं.
लाटांमागून असंख्य लाटा येत राहतात. एका क्षणी मनही कुचकामी होऊन जाते. सगळे बांध झुगारून पुन्हा एकदा आपल्यांना घट्ट कवेत घेऊन आश्वासनांची बांधणी करते. पुन्हा मनधरणी होते! प्रवासाचे स्वागत करतांना निरोपाचे मनोगत व्यक्त होते. आठवणींचा उजाळा मग दिलासा देतो आणि अखेरीस प्रवासी नजरेत पुन्हा परतण्याची ओढ ठेवतो. 'वन स्वीट गुडबाय' करुन मार्गस्थ होऊन जातो..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

No comments:

Post a Comment