♥
♥ क्षण..! ♥
तडफड..!
त्या दिवशी वाटेत भेट झाली. पाऊस मुसमुसत होता आणि तो स्वतःच मन सावरत होता. तुटून गेलेल्या बांधा नंतर सावरावं आणि आवरावं लागतं. थेंबांच्या तिरडीवर रोज नव्याने झोपावं लागतं. मन नसलेल्या या शरीराच्या प्रेताचेही वासनांध भोग घेतले जातात. कधी व्यवहार तर कधी मोबदला म्हणून. व्याजासह निव्वळ परतफेड. मन होतं किंवा मनात काय होतं? इच्छा काय होती ? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे माझी तशीच राहू दिलेली कोरी पाने. भिजणं झालं होतं. त्यानंतरची माझी कडवट कॉफीसुद्धा कपात राहून गेली. न पिलेल्या कॉफीचे न चुकता दिलेले अचूक बिल. त्या कॉफीचे मोल घेतांना क्षणभर थरथरणाऱ्या हातांचे हसऱ्या ओठांनी स्वागत केले.
नजरेत कितीतरी प्रश्न. वृत्तीत कितीतरी संभ्रम. गैरसमजांचा मनातच झालेला गुंता. चिंता मग शरीराच्या भिजण्याची कि, कॉफीच्या कडवटतेची? रेंगाळते कसलीतरी चव. अजूनही कोरडं पडलेल्या या ओठांवर. कदाचित! नको कदाचित पुन्हा म्हटले कि, बऱ्याच वाटा परत दुतर्फा सजून पावलांना बेडीत जखडत असतात. मन गुंतवत राहतात आणि हाताशी पुन्हा एक वास्तव रितेपणा उरत असतो. असंच ठिक आहे. दरम्यान असलेल्या अंतरावर उरलेल्या सगळ्या भाकड कल्पना. अस्तित्व असो, किंवा नसो सगळं चांगलं आहे. पुढ्यात लोळण घेत आहे. अगदी खोटं असलं तरी. दुःखाच्या उंबरठ्यावर सुखाची प्रचिती कायम अशीच असते. थोडी ओल आणि जन्मभराची पडलेली कोरड..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment