♥
♥ क्षण..! ♥
दिसलं पाहिजे..!
..अम्म्म्म्म! लहान मुलांचा निरागस बाळबोधपणा दिसला पाहिजे. तसं म्हटलं तर श्रीमंतांची वैभवता त्यांच्या श्रीमंतीतून व प्रतिष्ठेतून जशी दिसून येते. अगदी तशीच गरीबाची कैवल्य आणि समाधानी वृत्तीसुद्धा दिसून येते. पण आपण बघावं का? हो! लोकांनी त्यांची डोळे तुम्हाला बघण्यासाठीच कार्यशील केलेली असतात. मुलगी बघायला गेलेल्या मंडळींचेच घ्या ना.. पदरात असलेल्या लावण्याचा बांधेसुदपणा जेवढ्या हावरटपणाने दिसून यावा यासाठी धडपड होते. तेवढीच पडद्यामागून संथ, तरल आणि मंजुळ आवाजात उत्तरे देणारी व्यक्तीही जरा अजून पुढे यावी अशी इच्छा होतेच. यात अपवाद अरसिक आणि दृष्टिहीन असूही शकतात. वाईट मुळीच नसेल आणि नसतंही. बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजलं पाहिजे. चांगलंच प्रत्येकाला हवं असतं. माझ्यापेक्षाही चांगलं तुला मिळेल किंवा सापडेलही असं ब्रेकअप करणारी प्रेमी युगुल एकमेकांना बोलून मोकळी होऊन जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा तसं काही दिसतंच असं नसतं. बघायची भूमिका रसिक श्रोत्यांशीवाय आणि दगडाच्या बनविलेल्या विलोभनीय मूर्त्यांशीवाय अजून कुणाला चांगली वठवता आलेली नाही. इथे उपवर मुलगासुद्धा मुलगी बघायला/पाहायला जातो पण ती त्याला योग्यप्रकारे दिसली किंवा त्याने नीटसं पाहिलंच नसते. मग या क्षण दोन क्षणात पसंती देणाऱ्यांना काय साक्षात्कार होतो का? कि, यांच बघणं एवढं सराईत झालंय हेच कळत नाही. कदाचित साठ-सत्तर स्थळे जाऊन बघितल्याने असा अनुभव मिळतो? हे विचार करण्यासारखं आहे..
..तुम्हाला दृष्टी आहे आणि दिसतंसुद्धा चांगलं. एवढं चांगलं दिसतं की उनीदुनि सगळंच चव्हाट्यावर येऊन बोंबाबोंब करते. याला आणखी हातभार म्हणून मग माहिती मिळते. त्या मिळालेल्या माहितीला "समजणं" हा निव्वळ दैवाच्या मनातला सुप्त हेतू कळण्यात सामावलेला एक आनंद! पण दिसलं पाहिजेच! त्याशिवाय कळणार कसं? तोंड फाटकं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे तोंड उचलून बोलायला आणि विचारायला काही कोणी येत नाही. आजकाल तर "नोटिस केलंय" हे पण ठोकून सांगावं लागतं. त्यात "इग्नोअर केलं" तर झालंच कल्याण!किती शतकं झालीत माहिती नाहीत. देव दिसावा म्हणून आजही पुजला जातोय. कारण तो दिसला पाहिजे म्हणूनच! दिसल्यानंतर काय? तुम्हाला "मोक्ष" कन्फर्म..
तर मुद्दा काय दिसलं पाहिजे. चांगलं-वाईट, सकारात्मकता-नकारात्मकता, गुण-दोष, चुका आणि गुन्हा हे दिसल्यावर मग कुठेतरी दृष्टिकोन बनतो. हा व्यक्तिसापेक्ष असला तरी याचं व्यंजन आणि वेगळं रसायन प्रत्येकाचं व्हेरी स्पेशल असतं. याला सर्वसामान्य "अनुभव" या सोप्या शब्दाने ओळखतात. माझी गृहीतके आणि गणिते या सोप्प्या गुणकारात सापडत नाही. एकमेकांना उगाच म्हणून सुरुवातीला भागायच कालांतराने वजा करायचं आणि आयुष्याच्या टर्निंग पॉइंटला बेरीज करून बाकी सांगायचं? अशी बरोबरीतली गणिते बेहिशेबी नजरांना कळणार कशी? दिसलं-पाहिलं-तोंड फिरवलं मागे मागचं राहून गेलं आणि पुढचं पुढे! काही दिसलं तर दिसलं पाहिजेच! जरा बघत चला! हल्ली सांभाळून राहण्याची गरज आहे. कसलाही गाजावाजा न करता. तेव्हाच दिसणार आपलं आणि दुसरा ढुंकून पाहणार. कारण त्याला इच्छा होणारच! अजून..थोडं अजून "दिसलं पाहिजे..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
No comments:
Post a Comment