क्षण..!
अ फेसबूक लव्ह स्टोरी..! (कथा) (भाग-10)
बोलायला नको वाटत असलेल्या विषयाला टाळायला; विषयातून बरेच विषय निघत जातात. बोलणे वाढत जाते आपसुक पण! घुसमटण्याची सल मनातच सलत राहाते..!
"काय बोलावं अन् काय सांगावं". या विचारात स्वत:ला सावरत असलेली धारा, सहज मग विषयांतर करते.
धारा : जावू द्या ना, मला नाही वाटत या विषयाला ताणून हाती काही लागणार आहे. टेल मी समथींग अबावूट यू!..
अंबर : नथींग स्पेशल..!
धारा : तरी पण काही तरी असेल..
अंबर : माहित नाही, सर्व सामान्य मनुष्य आहे मी...
धारा : आणि या सर्व सामान्य मनुष्याच्या फॅमेलीत कोण-कोण आहे?..
अंबर : कुणीच नाही, गेल्या पंधरवाड्यात बाबा होते फक्त... आता तेही नाहीत एकटाच आहे. नात्यातून सुटका छे! सोडवणूक केली गेलीये माझी आणि आठवणी गणती झालीये माझ्या नात्यांची..!
बराच वेळ रिप्लाय येतच नाही. जरा वेळ वाट बघत अंबर विचारतो..
अंबर : तुमच्या फॅमेलीत कोण-कोण आहे..?
धारा : आई-बाबा-लहान भाऊ आणि मी!..
अंबर : अरे वा! लहान भाऊ आहे तर, जितका खोडकर वाटत असतो त्यापेक्षा जास्त समजदार असतो. हे फार उशीराच कळते नाही का..?
धारा : हो तेही आहे. पण खरं तर वेळ आल्याशिवाय कळतच नाही कोण किती समजदार आहे ते!..
अंबर : किंवा जगातली माणसे समजुन घेतांना आपण आपल्याच माणसांना समजुन घ्यायला वेळ काढत नाही..!
धारा : पण जर आपल्याच माणसाला जग बनवून घेतले तर मला नाही वाटत कि, वेगळा असा वेळ काढायची गरज वाटावी!..
अंबर : हम्म्म! तेही झालेच, पण आपण जग बनवतो कि, कुणी आपल्यात जग बनवतो याची वाट आपण बघतो..?
धारा : छेsssss! मी नाही पाहात!..
अंबर : :-) मग आपण बनवलेल्या जगात. आपण नेहमी असंतुष्ट आणि नाराज का राहातो? एखादे महत्व किंवा गरज आधार म्हणुन अवलंबून का ठेवतो स्वत:ला..?
धारा : तुम्हाला नॅार्मल नाही का ओ बोलता येत? किती तो गंभीरपणा प्रत्येक शब्दात!..
अंबर : बोलुण झाल्यावर सहसा मी फेर विचार करत नाही. मी काय बोललो? बोलण्या आधी आपण काय बोलतोय याचा विचार करुन बोलणारा मी साधा गरीब व्यक्ती आहे..!
धारा : ओह्ह! म्हणजे विचार करुन शब्द खर्च करता तुम्ही!..
अंबर : अर्थात म्हणू शकता असे तुम्ही. दरवेळी झालेली चुक उसणावून दाखवण्यापेक्षा, एखादी होणारी चुक कुठे तरी या माध्यमात टाळता येत असते. असे मला तरी वाटते..!
धारा : अच्छा! असेच आहे तर मग ते सुरवातीला 'दोस्तीला नाजायज' म्हणाला होता ते विचार करुन बोलला होतात का?..
अंबर : हो..! तुमच्या प्रोफाईल पिक वर असलेला. मैत्रीचा पिवळा गुलाब पाहून, एव्हढा साधा विचार निश्चित मी केला. कि, मैत्रीच्या बाबतीत तुम्ही पझेसिव्ह आणि अग्रेसिव्ह असाल. दुखरी नस म्हणा अथवा समोरच्या व्यक्तीच कुठले नाजुक बटन दाबले कि, तो आक्रमक होतो आणि प्रतिसाद देतोच-देतो. किंवा त्याला दोन जास्तीचे शब्द अजुन बोलावे अथवा सुनवावे सतत वाटत असते आणि रुतत असते. म्हणुन बोललो 'मैत्रीला नाजायज'..! ;) :)
धारा : पण! असे नाही वाटले कि, समोरच्याने थोबाडीत मारली तर?..
अंबर : त्यासाठी मी डोक्यात हेलमेट टाकून बसलो होतो. समजा मारलीच तर म्हणून. पण श्या! समोरच्याने मारलीच नाही ओ..!
धारा : ॲक्च्युली, समोरच्याला दगड फेकून मारायची इच्छा होती. पण श्या! दगड भेटलाच नाही!..
अंबर : घ्या..! आयत्या वेळी दगड न भेटायला देव्हारा नजरे समोर तरी का ठेवावा मग माणसाने..?
धारा : सगळे डोक्यावरुन गेले हां तुम्ही आता जे बोललात ते.. ( मृदुंग = वाटलेच! पण माझा वाचक नक्की समजेल हे..) मला वाटत मी भेटल्यापासून तुमच्यातल्या लेखकाला जरा जास्तच खडाडून जाग आलीये!..
अंबर : दिले शेवटी? दिलेच ना स्वत:ला श्रेय? मुठभर मांस जास्तही चढले असेल, अजुन कॅालर असती तर ताठ झाली असती. मोठी माणसे अशीच असतात..!
धारा : मग काय? अभिमान असायला नको स्वत:चा? आणि काय आहे आजकाल स्वताहून श्रेय देणारे उरलेच नाही जगात. लगेच नाक खाली जाते त्यांचे. मग मी स्वत:चे श्रेय स्वत:च ओरबाडून घेते!..
अंबर : अगदी बरोबर! मांजर आणि तुमच्यात फक्त आवाजाचाच काय तो फरक उरला असावा माझ्या मते. बाकी स्वभाव तर औक्षण करण्यासारखाच आहे तुमचा..!
धारा : अच्छा! लगेच कळाला पण का माझा स्वभाव?..
अंबर : हो म्हणालो तर आणि नाही म्हणालो तर..?
धारा : तर काय?...
अंबर : तर नखाने मलाच जखम होणार आहे..!
धारा : :D :D
अंबर : आसुरी आनंदच झाला तुम्हाला तर..!
धारा : हो.. बट डोन्ट वरी माझे नेल्स बारीकच आहे. ओरबाडूनही जखम नाही होणार!..
अंबर : भरोसा नाही! उजव्या हाताचे नखं बारीक न डाव्या हाताचे नखं चांगलेच धार लावलेले असतात. मला रिस्क नाही घ्यायची..!
धारा : दोन्हीही बारीकच आहेत... बट तुम्ही तर फारच घाबरताय जखमांना!..
अंबर : नाही तर काय? काही जखमांचे व्रण पुन्हा जखमी करतात. आणि त्यावर मलम व फुंकर कुणी घालतच नाही. वेदनाच काय ती असह्य. जिव घुसमटवते फक्त, जिवाची सुटका मात्र होत नाही..!
धारा : प्रत्येक जखम सारखी नसते. काही जखमांच्या आठवणीही गोड असतात!..
अंबर : आठवणी निश्चित गोड असतात. पण! प्रत्येक जखमेची कोवळी वेदना एकसारखीच असते..!
धारा : ते तर जखमेकडे बघण्याची नजर ठरवते आणि आठवणी गोड असल्या कि, वेदनाही फार खडतर वाटत नाही!..
अंबर : छान आहे तुमच्यातली लेखीका. खडतर रस्ता आणि खडतर वेदना. जखमेच काय तर सपाट मैदान नाही का..?
धारा : माझ्यासाठी जखम ही वाट आहे जी वेदनेच्या आधाराने चालायची!.........
अंबर : अरे वा! किती अंतर चाललात मग? आणि पोहोचलात कुठे? नैराश्याच्या पानवठ्यावरच ना..?
धारा : अजुन तरी प्रवास सुरु आहे. पोहोचले कि सांगेल तुम्हाला कुठपर्यंत आले ते!....
अंबर : बरं! अजुन काय? घरचे कसे आहेत? सॅारी जरा उशीराच विचारले...!
धारा : नशिब विचारायचे आठवले तरी... अन् मजेत आहेत ते!....
अंबर : आणि तुम्ही?
धारा : मी ही...
अंबर : ओके..!
धारा : खुपच बोलणे झाले ना आज आपले... ते ही कसले कसले विषय...
अंबर : हो ना..! ऑफीसचे काम करुन एव्हढी बोटे दुखवली नाहीत कधी, जेव्हढी चॅटींग मध्ये दुखवली गेली. नाही का..?
धारा : खरी मजा आपल्या भाषेत बोलण्यात असते पण परदेशात असे व्यक्ती फार कमी भेटतात. म्हणून असे झाले असावे..... कदाचित!..
अंबर : किंवा कुणाकडे काही बोलता यावे असे कुणी अजुन भेटलेही नसावे... आपल्याला..!
धारा : अगदी बरोबर..!
विषयातून विषय निघत जातात. मनाचे धागे सुटसुटीत होवून गाठी पडत जातात. साधेसे बोलणे असते कुणाचे, गांभीर्य असते क्षणाचे. ओढ लागते अनामिक जिवाला. सवय मग ती जगायला आवडून जाते. मोबाईल ॲप्स मध्ये फेसबूक इंस्टॅाल होते. सवड काढून प्रत्येक अपडेटची दखल घेतली जाते. माना झुकवून कमेंट्स पास होतात. क्षितिजावर भेट ठरण्या आधी, इंटरनेटच्या जाळ्यात गुंता-गुंत वाढते.
दिवस-रात्र उलटून जातात. महिन्या पुर्वी झालेली ओळख, युगांपुर्वी झालेली ताटातुट म्हणतात. आपल्यातलेच आपणही काही असेच, प्रत्यक्षात भेटण्या आधी 'स्क्रिन वर फेस टू फेस' भेटत असतात..!
आधी ओळख झाली
रुपांतरीत मैत्री झाली,
ओढ असतेच जिवाला
खात्री मग कशाची दिली..?
.
(क्रमश:)
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
(नोंद : कथा काल्पनिक आहे. याचा अस्तित्वाशी ताळमेळ आढळून आल्यास तो निव्वळ योगा-योग समजावा..!)
No comments:
Post a Comment