क्षण..!
दारं..!
स्वभावाशी रोज तडजोड करत; नात्यांत कित्येक भिंती उभ्या राहिल्या. मनाला काय वाटते त्यापेक्षा चार लोकं काय म्हणतील-बोलतील यावर, मनाचे स्वच्छंद दार बंद करुन; त्या ये-जा करणा-या जागेवर भिंती उभ्या राहिल्या. चार भिंतीतल्या खोलीत मग नैसर्गीक मोकळी हवाही येईनाशी झालीये. गारव्यासाठी ए.सी. नावाची कृत्रीम यंत्रणा कार्यन्वयीत करुन सगळे कसे मोकळेच झाले आहेत.
माणसे..! माणसे मग भिंती अलिकडले अन् भिंती पलिकडले घुसमटलेले श्वास घेत. एखादे दार असते तर डोकवण्याचा किंवा आत जाण्याचा आगावूपणा तरी करता आला असता.पण! छे भिंतच शेवटी. विभक्त अन् वेगळा स्वार्थी कारभार. ठरलेल्या वेळेवर भिंतीतल्या भेगेतून बाहेर निघुन गजबजलेल्या रस्त्यात आणि मोकळ्या आभाळात एकटे-एकाकी. स्वत: भिंती उभ्या करुन सहवासाला तरसत राहाणारी. काय चुकलं होतं सुरक्षेच्या अनुशंगाने जर भिंती निवडल्या होत्या?
चार भिंतीसोबत जर चार भिंतीत चार दारंही निवडली असती तर? पळ काढायला अन् मदत मागायला चार वाटा नसत्या का मिळाल्या? एकाच दारातून मरणं आणि जगणं असते. पण! जगायच्या चार वाटा असतात, तर मरणाची एकच वाट असते. एकच वाट अन् एकच लाट करत सोईस्कर जरी वाटत असले तर मग जगण्याची इच्छा अन् गुदमरणं स्वत:च स्वत:ला का एव्हढे खुपत असते? चार भिंतीतल्या नात्यात ओलावा का नसतो? असतोच कि, असल्याचा आव आणला जातो? विचार एकदा स्वत:लाच. वेळ प्रसंगी तू दार तर उघडू शकतोस पण भिंत कशी पाडशील? कर चिंतन कर..!
तुला जे हवंय ते आज नाही उद्याच उपभोगता येणार आहे. लाख प्रयत्न कर आज मोकळ्या हवेसाठी पण! ती स्वच्छंदी मनमौजी हवा तिच्या इच्छेने दारातूनच आत येणार आहे. भिंतीतून फक्त पाली-झुरळं आणि जाळे विनणारे कोळीच निपजतील. राहा! त्यांच्यातच मग त्यांच्याच सारखे समदु:खी. मोकळीकतेला तरसत अन् भिंतीवर आठवणी(फोटो) टांगत..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment