♥
♥ क्षण..! ♥
नाणे..!
नाणे नवीन असते तोवर ते खणकते. नाणे थोडे जुने झाल्यावर प्रसंगावधान राखून चालते. नाणेच ते शेवटी अनुभवाचे व्याज स्वतःवर लावते. काळ पुढे जातांना गंज स्वतःवर ओढू लागते. चढले-उतरले-वधारले-घसरले कित्येक बाजार बसव्यांचे मोल स्वतःच्या अस्तित्वात ठेवते. कुठे रोखठोक खणकते, कुठे उधारीत अडकते. एक नाणेच आयुष्याचे अचूक हिशेब चूकते करते. याच्याकडून त्याच्याकडे हस्तांतरित होत राहाते. घरंगळत गेले जरी नाणे पावलाखाली कधी आले नसते. अदबीने झुकून कंबरेत अन् हातांनी ते नाणे उचलून माथे गाठले असते. काळ सरला तरी मोल त्याचे कधी घटले नसते. पुरातन वास्तुचे उत्खनन करतांना सापडले जरी तरी स्वतःच्या भविष्याचे मोल ते स्वतःच करुन श्रेष्ठ नाणे बनते. राजा असला तरी नाणे त्याचे गुलाम नसते. गुलाम असला तरी नाणे त्याचे राजे नसते. सत्ता काय? साधे विरोधी पक्षही त्याच्या पुढ्यात काही नसते. जागतिक मंदीत देशोदेश जातात नाणे आपले आपल्या जागी ठाम असते. एका बोटाने झुकत नाही, दोन बोटांनी वाकत नाही, मुठीत ठेवले घट्ट धरून तर मूठ बंद करत नाही. नाणे कुणाचेच असत नाही. आभाळात उडवले तरी दैवाचे ते होत नाही. प्रतिमेशी ठेवले दैवाच्या तरी हळदी कुंकवाच्या लाल रंगासोबत स्वतःवर घामाचे गंज चढवणे नाणे विसरत नाही. काळ मग मी माझा कसा म्हणू? बरबाद झाल्या नाण्यावर व्यवहार कसल्या भाकड भविष्याचे करू? गंज उतरवून शरीरावरच्या नाण्याचा नशिबाचा हिशेब उधारीने कसा फेडू? नाणे...नाणे...नाणेच तुझे काय? माझे काय? नाणे स्वतःचेही होत नाही..!
-------------------------- (पियुष)मृदुंग™
kshanatch@gmail.com
नाणे...
ReplyDeleteसमृद्ध होते जीवनाने....