Powered By Blogger

Monday, July 14, 2014

नृत्यांगणा..! :-)

क्षण..!

नृत्यांगणा..!

एक क्षणच तिने नटराजाच्या मुर्तीकडे पाहिले अन् स्वत:भोवती गिरक्या घेत, थिरकनारी तिची पाऊले व्यासपीठाच्या मधोमध येवून स्थिर झाली. तबल्याचा ठेका थांबला, पायातला घुंगरु शांत झाला. मागे स्पंदनांचे ठोके उरले अन् कानात पावसाचे थेंब टपटपावीत तसे टाळ्यांचे मुसळधार आवाज. हजारोंच्या संख्येने तिचे चाहाते उपस्थित होते. तिला डोळ्यासमोर हवा असलेला हसरा-बोलका नटराज मात्र मुर्तीतच राहिला.
पाय थिरकतात तो पर्यंत घुंगरुत तुझी साद ऐकू येते. पहिल्या 'छण' मध्ये असे काय संचारते माझ्यात कि, पुढचे 'छण छणक छण छण' व्यक्त व्हायला आतूर झालेले भासतात. माझ्या पाऊलात छे! पाऊलांतल्या घुंगरुतच पाऊस बांधला जातो. 'मी' मी माझी नसतेच मग. फक्त एक सरिता होते खळखळत वाहानारी. कोवळी नजर भरुन तुझी मुर्ती बघते. एक कटाक्ष श्रोत्या वृंदात फेरुन, त्या नजरेत तुला शोधण्याचा निश्फळ प्रयत्न करते. पण! तू तुझ्या मुद्रेत तसाच तटस्थ.
तिरकिट धाs! करत नाद घुमतात. लय घेत घुंगरु स्वरांत विरघळू लागतात. वेगळ्याच उंचीवर घेवून जातात ते सुर. संथ वाहात लयाशी खेळत अवघडत ही साधिका असंथ उसळू लागते. थाप पडते एक अन् लख्ख विजेसारखी जागीच मी थिजून उभी असते.
चोरटे कटाक्ष तुझ्या मुर्तीकडे रेंगाळतात अन् हात जोडून उलट पाऊलीच मी लांब होते. घुंगरु मोकळे सोडून क्षणभर त्यांना बघते. कला तुझीच आहे जी मजवर प्रसन्न आहे. धुंदीत मग मी वेडी पाऊस पायांत बांधून का तरसत असते? का गिरक्या घेत असते? का तू सावरशील म्हणून तुझी वाट बघते? बघशिल एक नजर मला तू म्हणुन माझी नजर तुझ्यावरच ठेवते.
तू तसाच निश्चिल राहातो अन् मी आजही तशीच आधीर असते. अर्पुण स्वत:ला तुझ्या कलेत पुर्ण थोडी-थोडी मी करत राहाते. एक कलाकार म्हणून मन जिंकत राहाते. पाऊस बांधून उभी सर बरसत राहाते..!

तुझ्याशीच एकरुप होवून
बेधुंद मीही बरसत असते,
वेचून निसटलेला थेंब तो
झोळी माझी भरत असते
.
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

(© स्केच बाय माझ्या शब्दांची प्रेयसी..!)

No comments:

Post a Comment