Powered By Blogger

Friday, August 22, 2014

उद्विग्न..! :-)

क्षण..!

उद्विग्न..!

सहसा, आपण मनाला अंधारात कोंडून घेतो. उजेडाची भिती वाटते म्हणून नाही. मनात असलेलं स्वत:शिवाय कुणाला कळू नये. चेहरे-डोळे बोलके असले तरी, मनाचे हाल-बेहाल उघड होवू नये. तसेच नात्यांवर स्वत:च्या अस्वस्थ मनाचे परिणाम पडू नये. एकटेपणाच्या वलयात राहून सभोवती असलेलं, वर्तुळ विचलीत होवू नये म्हणून. पण! असे करतांना गोंधळ आपलाच होतो.
कुणाच्या नाही, आपल्याच जवळच्या व्यक्तींना आपण आपल्याच चौकटीतून दुर ठेवतो. "तुला-तुम्हाला कळणार नाही", समजुतीचे दोन शब्द सांगणे सोपे वाटतेय, तितके समजुतीने स्वत:चे वागणे-बोलणे स्वभावाच्या आचरणात आणने आपल्याला अवघड वाटत असते. वास्तविक, स्वत:कडून कुणाला पुन्हा दुखवण्याची आपली मंशा नसते.
सतत गर्दी टाळत राहातो. गर्दीत सापडून एकांत शोधत राहातो. सोबत कुणाची नाही स्वत:चीच हवी असते. खोट्या मुखवट्यांचा आधार घ्यायची इच्छा नसते. झगडायचे असतेच परिस्थितीशी पण कुबड्या म्हणून कुणाचा आधार नको असतो. कदाचित, स्वत:चाच स्वाभिमान स्वत:लाच नडत असतो. कुणाला सांगून छे! अगदी गरळ ओकून. सहज मार्ग मिळवायला कुणाच्या आधीन जाण्यास मन तयार नसते.
इतकाही वाईट काळ नाहीये हा. यापेक्षाही ब-याच वाईट दिवसांना-प्रसंगांना आपण स्वत:च हाताळलेले असते. तेव्हाही कोण होते आपल्यासोबत? चला, आताही आवाज दिला तर दहा पैकी एक तरी जवळ येईल. विचारेल-बोलेल-प्रश्नांचा भिडीमार करेल. त्यातून निश्पन्न काय होणार आहे? होईल ठीक, शांत राहा, जरा सबुरीने घे! हे असे करुन बघ, ते तसे करुन बघ. चहोबाजुने विचार करण्याची पात्रता असुनही, शेवटी एक निर्णय जो स्वत:लाच घ्यायचाय. यावर परिस्थितीच्या परिणामांचा काय प्रभाव पडेल? याची गृहीतके पुन्हा पडताळण्यात काय अर्थ आहे?
"तुला जे हवं तेच तू केलं", उपहास म्हणून उपकाराचे शब्द तरी का हवेत? बरोबर नसेलही कदाचित, चुकीचेही नसेल कदाचित. आहे ते स्विकारायला मग एव्हढे स्वत:चेच मन का मुजोर झाले असावे? वेळ काय तो नंतर या निर्णयाचा सोक्ष-मोक्ष लावेल. ठरवलंय ना आता मग पर्वा कशाची? "हात लावेल ते मातीच होते". अरे, हात लावून सोने होण्यापेक्षा हे चांगलेच. माती होती मातीच झाली.
ढग दाटून आल्यावर, थेंब बरसू लागल्यावर त्याच मातीतून जे पेरलेय तेच उगवेल ना! गोंधळ काय नेमका माहित आहे का? मातीची राख होत नाही. वेळे आधी रोपटे उगवून त्याला फुले लागत नाही. घाईत आपण असतो पण वेळ तिच्याच सवडीने बदल घडवते. वाट पाहून विट आपल्याला येतो. वाट पाहातोय म्हणून थट्टा स्वत:ची होतांना बघतो. निराश होवून या आयुष्याला शेवटी जगणेच सोडून देतो.
करावे तरी काय मग आता? दरवेळी इतरांच्या कलेने घेवून, झुकते माप घ्यायचे तरी किती? उद्विग्न होणारच ना मन! मुकाट सहन केलं जातेय म्हणून थोडंही निटसे आयुष्य नसावे का? मला वाटेल तेव्हा नाहीच, वेळेच्या मनात असेल तेव्हाच. का अवलंबून राहावे वेळेवर तरी? ठरलेय आता वेळ गेली खड्यात. मी हवं तसं आनंदात स्वच्छंदपणे जगणारच. वेडं होवून जगल्याशिवाय वेड काय ते कळत नाही. बदल स्वत:लाही घडवता येतो. इथे गुलामी-मालकी-बांधिलकी कुणाची का म्हणून स्विकारावी?

झुगारलीत आता बंधणे
तोडल्यात सगळ्या बेड्या,
खरं जगण्यात मजा आहे
जाणून घे तू ही शब्द वेड्या..!
.
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment