Powered By Blogger

Friday, August 29, 2014

समाधान..! :-)

क्षण..!

समाधान..!

कधी-कधी आपण इतके पुढे निघून येतो कि, स्वत:चे पंख पसरुन उडण्याचे विसरुन जातो. सतत कोणी तरी हवं असतं. प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष कुणी हवं असतं. आधार आणि पाठींबा म्हणने चुकीचेच ठरेल. पाठराखण आणि पर्याय म्हणने सुद्धा चुकीचेच ठरेल. नात्यांचा सोज्वळ गोतावळा तर दुरच. नेमकं कोण हवं असतं विचारलेच तर उत्तर कुणीही चालेल ओठात असतं. का? कशासाठीची वर्गवारी करतांना, कांद्याचे एक-एक पापुद्र बाजुला निघावेत तसे सगळे आपापली जागा हेरुन नजरेसमोर फिरत असतात.
सखोल विचार केला तरी उत्तर मिळत नसतं. वाट अडली नसते, वेळ थांबली नसते. पर्याय म्हणून कुणाला निवडण्याची इच्छाच नसते. बस! थांबावं इथेच म्हणत आजवर घडून गेलेल्या झालं-गेलंची उजळणी होते. सरते शेवटी प्रश्न होता तसाच राहातो. होतं एखाद वेळेस म्हणून आपण पुर्वरुप होतो. काही दिवस जातात. आठवडा उलटण्यात असतो कि, पुन्हा तसाच तो एक प्रश्न आ वासून बघतो. पुन्हा वेळ जायला प्रत्येक नात्याचे समिकरण आजमावून बघतो. शेवटी तरीही उत्तर मिळत नसते. नेमकं कुणाला शोधत असतो? कुणाला स्वत:च्या इतक्याजवळ अनुभवत असतो? आभास म्हणून खिल्लीही उडवता येत नाही. झटकून मोकळंही होता येत नाही. काय चाललेय काय नेमकं स्वत:लाच कळत नाही.
पंख स्वत:चेच असले तरी मालकी स्वत:चीच नसते. गुलामगिरी म्हणावे तर मोबदला राजेशाही असतो. एक सहवास, एक भिजरी पायवाट, रितेपणात प्रकर्शणाने एकटेपणा देवून जातो. हवं काय होतं अन् मिळालं काय होतं? स्वत:ला निचोडून कमवलं काय होतं? हिशेब लावला तरी गमवलं काय होतं? प्रेम-मैत्री-नातं नेमकं कशात शोधायचे स्वत:चेच समाधान?
पंख असुन आभाळ गाठता येत नाही. आभाळ दिसून पंख पसरता येत नाही. दुनियादारी करतांना कर्जबाजारी होता येत नाही. पुन्हा सुरवात करायची तर आहे त्याचाच निकाल लागत नाही. दरवेळी तिच आघाडी सराईतपणे पेलता येत नाही. छंद करावे पुन्हा तर धुंद होत नाही. झुगारावे सगळेच तर चौकट सुटत नाही. आयुष्याची नशा बाटलीत उतरत नाही. दशा करुन घ्यावी तर नेटकेपणा सुटत नाही.
हव्यास वाढवावा तर प्रयास पुरे पडत नाही. आयुष्य जगल्याशिवाय कयास कशाचाच लागत नाही. प्रश्न-प्रश्न म्हणत उत्तर तडीस लागत नाही. आहे त्यात समाधान मानावे, कसं सहज सुचत नाही? शोधत समाधानच असतो नेमकं कशात मिळत? ज्याच तो व्यवस्थित जाणतो. मला तरी लिहून समाधान मिळतो. तर कुणाला मी लिहिलेलं वाचून 'समाधान' मिळतो..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment