♥
♥ क्षण..! ♥
छळवनूक / पिळवनूक..!
आजच्या आधुनिक काळात नात्यांच्या जवळपास सगळ्याच नैतिक परिभाषा बदलत आहेत. एकटे, एकाकी आयुष्य अथवा लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा समाज व्यवस्थेनी मान्य केलेली लग्न व्यवस्था! या बदलत्या काळात आयुष्य आलबेल होण्यासाठी ठराविक कारण वास्तवात काहीच असत नाही. घरोघरी मातीच्या चुली आणि भांड्याला भांड लागून होणारा तीळ-पापड कुणासाठी नवीन असत नाही. नावीन्याच्या वेष्टनात गुंडाळलेली नात्यांची गाठ सैल होण्यासाठी अवधी फार लागत नाही.
नव्याचे नवदिवस उडून जात नाही तोच, स्वभावाचे कांद्याच्या पापुद्र्यासारखे सगळे पैलू आपापले स्वभावधर्म ठळक उमटवन्याचा हेका धरण्यात यशस्वी होतात. सासर-माहेर एकाच चौकटीत आपले स्थान निश्चित करतात. समाजाने प्रश्न करायला नकोत आणि कुणाच्या लेखीसुद्धा नसलेल्या आपल्या प्रतिष्ठेवर डाग उमटायला नकोत अशी दोन्ही घराण्यांची मानसिकता बनून जाते. लाडोब्यात स्वैर झालेल्या आयुष्यावर चौकट लादताच कैद झालेल्या पाखरासारखी प्रत्येकाची अवस्था होते.
प्रेमाची बदलनारी व्याख्या आणि स्वप्नवत हव्या असलेल्या संसाराची वास्तविकता यांचा आपापसात कसलाच ताळमेळ बसत नाही. शब्दा-शब्दावर विकोपाच्या भांडणांचे स्वरुप होते, साध्या-सुध्या विचारणांचे स्वरुप शंकेखोर वृत्तीला प्रवृत्त करते. एखाद दुसऱ्याचा असेल स्वभाव दोष मन आपली समजूत काढते; माहेराची अनुभवी शिकवण सांगते. आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचे आपल्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. दिल्या घरातून तिरडीवर बाहेर पडायचे प्रांजळ सल्ल्यात हुकूम लादलेला असतो.
शरीराचे अनैछेने लचके तुटतात. करून सवरून तुच्छतेची वागणूक देतात. शोषण म्हणावे किंवा आवडत नसेल म्हणावे तर समाज व्यवस्थेचे काटेकोर नियम पाळलेले आढळतात. नातं निभावतांना मात्र उपकाराच्या फसवणुकीची जाणीव होते. काय करावं? कुणाला सांगावं? निर्णय घेण्याचे सगळे मार्ग बंद होऊन गेलेले असतात. वाढलेल्या शरीराच्या वयाचे दाखले 'सरतील हे दिवसही', या स्वप्नाळू अपेक्षेत छळवादात कुजुन जातात. माती ही शेवटी मातीतच जाते. आयुष्याच्या स्वप्नांच्या राखेवर मातीसोबत एकरूप होतांना सुखी सुंदर आयुष्याची कल्पणा ही एक कुचेष्टाच झालेली असते. स्वतःची मदत स्वतःला करता येत नाही. कुणी बाहेर जायचे-पडायचे मार्ग दाखवल्यावर आपल्या स्वतःतच पुन्हा जगण्याचे त्राण उरत नाही. आहे तेच नशिब, पदरात पडलं न धन्य झाले अशीच पिळवनूक होत राहाते-राहिल या आयुष्याची..!
------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
'क्षणातच'
जळगाव हेड पोस्ट ऑफिस,
जळगाव-४२५००१
7387922843
(नोंद: स्वतःचे आयुष्य कसे जगायचे हा मार्ग दाखवणारा मी मार्गदर्शक नाही. या आयुष्याला जगून अनुभवून शब्दात व्यक्त करणारा मी एक दर्शक आहे..!)