Powered By Blogger

Tuesday, June 2, 2015

लुटावलं..! :-)


♥ क्षण..! ♥

लुटावलं..!

कंबरेत दोन्ही हाते उलटे बांधून निघाले ते सफरीवर. तांबूस झालेला चेहरा न पिंगट लाल डोळे. चुन्याचा पांढुरकाही त्या पिकलेल्या केसांच्या अधीन राहिला. राजहंसाची सावकाश पावले उचलत गावाची वेश त्या पावलाखालीच अदबिने आली. नजर शून्य झाली. वडाच्या पारंब्यांवर आठवणीचे झोके झुलू लागले. धागे होते वडा भोवती गुंफलेले. आयुष्याच्या गाठीचा धागा मात्र जगोजागी उसवत गेलेला. सांज रेंगाळून निघुन गेली. चेहऱ्यावर ताणलेल्या सुरकुत्या काळोखात हरवून गेल्या. मनात चल-बिचल झाली, पावलांखालची जमिन निसटू लागली. वडाच्या पारावर कसं-बसं शरीरातले सारे त्राण एकवटून बसत, खिशात कोमेजत आलेला पाहाटेचा धुंद वेचलेला प्राजक्त ठेवत; ओठांवर उसने हसू आणत स्वतःशीच ते पुटपुटले, 'आज वडाच्या झाडाला सावित्रीने पूजलं नाही.' म्हणून सत्यवान स्वतःच आला. पण दुरदैव बघितलेस सावित्रीची परीक्षा घ्यायला यमाकडे सवड होती, प्रश्ने होती, नियतीची प्रमाणे होती, प्रथा या संकल्पनेची प्रबळ कारणे होती. सत्यवानाकडे मात्र सावित्रीसाठी काहीच नव्हते. यमासोबत ना लढण्याचे बळ ना कठोर निर्णय क्षमता. मधाळ गोड बोलण्याची पद्धत आणि हट्ट स्त्रिचाच दागिना. पारावर बसलेल्या सत्यवानाच्या ओंजळीतून प्राजक्तही निसटला. घेणं नव्हे देणं माहित असुनही ओरबाडनं सगळ संपल्यावरही तुझं सुटलंच नाही. संपूर्ण आयुष्य नासलं छे! नासवलं तरी किळस काही या आयुष्याची येतच नाही. लुटण्याची आणि लुटावण्याची पद्धत अशीच अनुरूप असते. मी क्षण उधळत जातो तू कणकण वेचत जाते..!
---------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment