♥
♥ क्षण..! ♥
दळभद्री कर्ण..!
काही कारण नसतांना कवच-कुंडले दिल्यानंतरचा दळभद्री कर्ण समोर उभा राहतो. अर्थात दळभद्री ही उपमा रास्त असली तरी न रुचणारी आहे पण तेवढीच वास्तवसुद्धा आहे! दळभद्रीच का? दानशूर कर्ण म्हणून आख्यायिका असतांना दळभद्री कशाला बरं आठवावा? ज्याचा जन्मजात प्रारबद्ध थोर! असं असतांनाही संपूर्ण जीवनाचा अर्थ स्वतःच्या सामर्थ्यावर कमवून, उपकार केल्यासारखं आयुष्यही ओवाळून किंवा स्वतःला संपवून टाकणं निश्चित करणं; यात समाधान कसलं मिळालं दळभद्री कर्णाला?
मुलगा म्हणून, राजा म्हणून, मित्र म्हणून किंवा वरदान म्हणून मिळालेल्या आयुष्याचा त्याग स्वतःच्या दानशूर वृत्तीने करुन महान होऊन तृप्त आणि मुक्त होता कसं आलं? जितेपणी कोणी पाणी पाजलं नाही. रणांगणावर वीरमरण घेतांना सुस्कारे अनेक सुटले पण रक्ताशी बांधलेल्या नात्यांवरचे बांध तुटले नाहीत. धर्माच्या विरोधात असलेलं प्रत्येक नात अधर्मच असतं तर साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापरही तर धर्माच्या स्थापनेसाठी केला गेलाय.
कर्ण म्हणून आयुष्य त्यागतांना, आत्म्याच्या चितेवर आतल्याआत जळत असतांना दानी म्हणून मागितलेल्या अक्षम्य गुन्ह्यालाही उदार मनाने माफ करुन कर्ण हा दळभद्रीच ठरतो! अंगी कसब, भाळी जन्मजात प्रारब्ध त्या जगत पित्याकडून उचलून आणतांना कर्तव्याच आणि जबाबदारीच सामर्थ्य पेलण्याचं ओझं कमी नव्हतं! तरीही प्रत्येक श्वासावर दुर्गंधीने माखलेले आभूषणे नजर केली गेली. जन्मास येण्याची लक्तरे दिली गेलीत. तरीही युद्धात जिंकणारा अर्जूनच घडवला परमार्थ्याने हरलेला दळभद्री कर्ण पुन्हा घडवलाही पण तो तसाच निष्कपट, निस्वार्थ, निश्चयी आणि दानीच निपजला यात स्वार्थशून्य असण्याचे आणि दळभद्री कर्ण असण्याचे दोष कुणावर लादायचे? परमपिता परमेश्वरावर की, दृढ निश्चयी आणि प्रवाहाविरुद्ध असलेल्या दळभद्री कर्णावर..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३