♥
♥ क्षण..! ♥
होती ती एक..!
तिला सोडून बोललो कुणाशी किंवा फ्लर्ट केले कुणाशी तर रागाने लालेलाल होणारी. जाणून-बुजून दुर्लक्ष केल्यावर लक्ष दे म्हणनारी. सुधर माझ्यासारखी दुसरी नाही मिळणार म्हणत भाव खाणारी. गुलाबाच्या पाकळी सारखे यौवन होते तिचे. दाट काळे नसले तरी सोनेरी केश होते तिचे. काजळ नयनांचे दररोज असंख्य वार व्हायचे. लहरी गुन्हेगार हा तरीही तिच्या तावडीतून पसार व्हायचा. मागे-मागे यायची सावलीसारखी. पुढे-पुढे जायची वाटेसारखी. थांबलो न गुंतलो कुणात तर चरफडत बसायची. समोर असुनही तिचा मी नसायचो. 'जल बिन मछली' अवस्था तिची असायची. फुलपाखरासारख बागडत झगडत राहायचो एकमेकांशी. सात जन्माचे वैरी भेटले कि काय असे रान पेटवून द्यायचो. अध्ये-मध्ये लुडबूड करणारे मग तिची बाजू घ्यायचे. जुमाणलंय कुठे कुणाला अफाट सैन्य असले तिच्यासोबत तरी तह करण्याची एकट्यात ताकद असायची. हा देव तो देव धरुन बसल्यावर मग या देवाची बारी यायची. जा दगडाजवळच झिडकारले जायचे. वाईट आहेस तू खुप! ओघळलेले दोन थेंब चुगली लावून मन विरघळून द्यायचे. खाली-पिली मिठीत मग कशाला जखमांना चिघळून द्यायचे. चुकलं- सॉरीची पंगत मध्यरात्री रांगेत बसायची. पाहाटे पर्यंत छळून झाल्यावर दिवसभर डोक दुखवायची. काही म्हणा होती ती एक वेळ जी खुप छान जायची..!
----------------- मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment