♥
♥ क्षण..! ♥
सांज किनारा..!
ती त्याची वाट बघत सारखी ये-जा करत होती. वेळ झाली होती त्याच्या येण्याची पण उगाच तिची नजर भिरभिरत होती. सांजेचा रवि पुन्हा तिच्या हातांवरच्या मेहंदीचा रंग नभावर उधळत होता. फिक्कट पुसट होत किनारा वारा दमट होत होता.
अजुन कसा आला नाही. कुठे राहिला हा! नेमकं वेळे आधी हजर असलेला एखाद वेळेस चुकला तर होता-होईल तितका त्रागा-शंका-कुशंका वरचे-वर मनात डोकावत राहातात. धावत येत असलेल्या लाटेसोबत सावकाश तो ही तिच्या मागे तिच्या नकळत येतो.
डोळ्यांवर हात ठेवून खर्जातला आवाज अजुन खर्जात नेवून बोलतो "ओळख पाहू". तिची वैतागलेली पाकळी त्याच्या स्पर्शाने मोहरुन खुलून येते. एका हातात त्याने लपवलेली गुलाबाची फुले 'तुला हवा तोच आहे' गंधातून चुगली लावून देतो. ती ओळखते आणि तो विस्मयीत होतो.
कसं ओळखलंस-कसं ओळखलंस सांग-सांग हैरान करु लागतो. ती फक्त हसते! त्याच्या हातातली फुले घेवून लाटांजवळ धावत जाते. तिच्या मागे तो पळतो आणि अस्ताला जाणारा सुर्य गुलाबी रंगाची बरसात करतो. लाटांशी खेळ करत, वाळूवर पाऊले रुतवत त्या दोघांची क्षितिजावर एक शत-पावली सुरु होते.
हातात हात गुंफले जातात. पावलांशी पाऊले मिळवले जातात. सहवास स्पर्शाचा अबोल एका क्षितिजाचा नजरेतून नजरेत संवाद पेरतो. उधळलेला प्रत्येक रंग त्यांच एकमेकांवरच प्रेम व्यक्त करतो. ते दोघं मात्र त्याच रंगांवर नजर खिळवून एकमेकांच्या शेजारी उभे असतात. नि:शब्द-स्तब्ध-हतबद्ध स्वत:च्या प्रेमाच्या उधळणीला दृष्ट लावत, हातांची गुंफण घट्ट करत अनवाणीच...रात्रीच गडद सावट उमटे पर्यंत..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment