♥
♥ क्षण..! ♥
माझे गुरु..!
माझे गुरुवर्य मी शब्दांना म्हणू की, वेदना, यातना, जखम, व्रण, अपमान, शल्य, दाह, परिस्थिती, परिणाम या सर्व अवस्थेतून तटस्थ भूमिकेत कवितांनी मला लोकप्रिय बनवणाऱ्या कागदाला म्हणू? की, याही व्यतिरिक्त माझी चौकट, माझी पायरी एवढेच काय माझी लायकी बेधडक दाखवणाऱ्या माझ्या भावनांना म्हणू?
विचारांपलिकडे, निर्थक झालेलं आयुष्य, नासलेलं भविष्य, कपोकल्पित होणाऱ्या समजाला, निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांना, उत्तर असूनही सराईतपणे टाळलेल्या प्रसंगांना, माझ्याच डोळ्यादेखत सावत्रासारखा वागणाऱ्या क्षणाला?
बट्टा, ठिगळ, चिंध्या, आत्म्याचे तुकडे तुकडे करणाऱ्या, आरपार हृदयात कळांचा भाला रुतवणाऱ्या, अस्पृष्य कलंकाला, जाणीव शून्य संवेदनांना, अहंकार, स्वाभिमान गणितात चुकीच्या चुकांना? कोणाला देऊ मी हे पुण्य?
अभागी म्हणून नाशिबवान म्हणत हिनवणाऱ्यांना, मतलाबाची ओळख जतवणाऱ्यांना, स्थीर उभे करणाऱ्या स्वभावाला, नजर चोरून स्मशानातली माती चोरणाऱ्या वृत्तीला की, श्वासांवर अवलंबून दिवसाची चालढकल करणाऱ्या माझ्या प्रववृत्तीला?
कुणात धमक आहे माझे गुरुवर्य म्हणून श्रेय लाटण्याचे?
जळत्या चितेत भाकऱ्या भाजणारा मी तुच्छ माणूस आहे. गलिच्छ, पाषाण हृदयाचा विशाल मृदुंग बेताल आहे. ऐपत, समाज, प्रतिष्ठा यांनी घडवलेला कुरूप पुतळा आहे. निर्लज्ज होऊन प्रतिबिंब न्याहाळतांना काजळाचे काळजाला तिट लावून कुजत दुर्गंधी पसरावणाऱ्या प्रेताच्या सुवासाची अभिलाषा पुरावतांना ओठांनी हसत असलेला मी बहाद्दर आहे.
द्रोणांचा मी अर्जुन नाही, एकलव्यसुद्धा नाही. परशुरामांचा कर्ण म्हणवतांना जीभ दाताखाली घट्ट धरली जाते. उपकार कुणाचे मानू आणि सदिच्छेच्या शुभेच्छा कुणाला देऊ? कुणाला पेलवत आहे? नैतिकता म्हणून स्वीकारलेल्या आणि दान म्हणून टाकलेल्या तसेच खेळून झालेल्या खेळण्यानी मला घडवायला मोठ योगदान दिले आहे. अशा सर्व गुरुजनांचा लौकिक मिरवणारा मी स्वतःही स्वतःचा गुरुच आहे! त्यामुळे आज या गुरुपौर्णिमेच्या चंद्राला माझ्यासारख्या नालायकाकडून शुभेच्छा..!
-------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com