क्षण..!
प्रतिक्षा..!
तिची वाट पाहाण्यात पण एक वेगळीच मजा असते...ती येणार हे माहित तर असतेच...पण आल्यावरही मी का आले याचे उत्तरही मलाच प्रश्न करुन विचारणार असते...घुम्यासारखा मी गप्प राहाणार असतो बरेच दिवस भेट न झाल्यामुळे तिचा राग, त्रागा, चिडचिड, कटकट मुकाट सपाट चेहरा करुन ऐकणार असतो...तेव्हाही माझे शांत राहाणे माझ्याच घश्यात अडकणार असते..!
आठवण येतच नाही ना तुला माझी...कधी फोन केला नाहीस साधा एक मॅसेज पण केला नाहीस...नेहमी मी का म्हणून मागे यायचे तुझ्या...तुलाच काही घेण-देणं नसल्यावर...मी तिची नजर चुकवून गालात थोडे हसायचे असते अन् तिला ही चोरी माझी पकडून अजुन भडकायचे असते...कसं व्हायचे माझे स्वत:लाच विचारते न जळजळीत नजरेने मला खाऊ कि गिळू या पवित्र्यात बघते..!
ओठात मी निरागस हसतो...तिच्या गळ्यात हात टाकतो...तर्जणीने तिच्या हनुवटीला आधार देवून वर उचलतो...ओठात अंतर थोडेच उरले असते...माझ्या नियंत्रीत श्वासात तिचा अनियंत्रीत श्वास मिसळून तिला शांत व्हायला एकच क्षण पुरतो...तिचे डोळे हसतात गुलाबी गाल आरक्त होतात...पुन्हा दोन हाताचे अंतर ठेवून मी तिच्या समोर जावून बसतो..!
मौनात मग बराच प्रेमळ संवाद सुरु असतो...तिच्यासाठी आणलेली प्राजक्ताची फुले तिच्या ओंजळीत विसावतात...तो अनिमिश नेत्राने तिला बघत असतो न एक गजरेवाला दोघांमध्ये येतो...तो तिच्याकडे एक नजर बघतो ती फक्त पापण्यांनी संम्मती देते...एक गजरा विकत घेवून तो तिच्या पुढ्यात ठेवतो...तिचे आक्रमक शब्द पुन्हा तिच्या ओठातून बाहेर पडतात...घेतलास तर माळणार कोण इथे जवळ आरसा पण नाहीये माझ्या...तो मुकाट केसांत माळतो तिच्या न डोळेभरुन तिला बघतो...त्याच्या नजरेच्या आरश्यात तिचे सौंदर्य तिही बघुन घेते..!
सांज व्हायला अजुन अवकाश कितीसा उरलाय आता...आज तरी येईल ती प्राजक्ताची नवी फुले घेवून तो निघतो...वाटेत गर्दीत वैतागतो वेळे आधी पोहोचायचे स्वत:ला बजावतो...तिच्या नंतर पोहोचला तर काही खैर राहाणार नसते...नेहमीची वेळ होते ती काही येत नाही...गजरेवालाही एकटे त्याला पाहून जवळ त्याच्या येत नाही...त्याने आणलेली प्राजक्ताची फुले त्याच्याच ओंजळीत हिरमुसतात...तो मात्र त्याच परतणा-या वाटेच्या प्रतिक्षेत त्यांचा गंध उधळून ठेवतो...क्षणातच..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment