Powered By Blogger

Sunday, March 30, 2014

दैनिक जळगाव माझा..! (लेख प्रसिद्ध)

क्षण..!

दैनिक जळगाव माझा..!
(www.jalgaonmaza.com)
लेख प्रसिद्ध..! :-)

गुढी पाडवा..!

ग्रंथांचा आधार घेता पुराणात पाडव्याबद्दल ब-याच कथा प्रचलित आहेत. यात सर्वश्रुत असलेली कथा अशी की, चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम-लक्ष्मण सितेसह अयोध्येला परतले होते. रावणाचा वध करुन शांतीचा आणि एकोप्याचा धर्म पुन्हा प्रस्थापित झाला होता. चौदा वर्षानंतर प्रजेला पूजनीय असलेल्या त्यांच्या राजाच्या स्वागत प्रित्यर्थ संपूर्ण नगरात प्रत्येक घरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते ते राम नवमीला संपते अशी प्रथा आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान उरकून गुढी उभारली जाते. गुढी अर्थात एका शुचिर्भूत काठीला नवं कोरं कापड किंवा नवी साडी बांधली जाते. त्यावर साखरेची किंवा गोड गाठीची माळ, कडूनिंबाची पाने बांधली जातात आणि वरून कलश पालथा घातला जातो. हळदी-कुंकवाच्या साक्षीने चाफ्याची माळ चढवली जाते. अशी गुढी घरातल्या अंगणात पाटावर उभी केली जाते. गुढीला 'ब्रम्हध्वज' असेही म्हणतात कारण ब्रम्ह सृजनाचे प्रतिक आहे. सूर्याची किरणे गुढीच्या स्पर्शाने घरात पडली जावीत आणि त्यायोगे आनंद अन् नवचैतन्याने आगमन आपल्या घरात-मनात व्हावे असा यामागे हेतू असतो. आणि म्हणूनच मराठी मनामध्ये ह्या सणासाठी एक ममत्वाची आणि अस्मितेची भावना खूप आधीपासून रुजत आली आहे.

विधिवत पूजा झाल्यावर कडूनिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो. आयुर्वेदात कडूनिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. पुढे उन वाढत जाऊन उष्माघातात वात, पित्त, कफ यांच्यात संतुलन ठेवण्याचा पूर्वजांच्या ह्या पुरोगामी बुद्धीचा कल आपल्या लक्षात येतो. नवीन वर्षाचं स्वागत हर्ष-उल्हासाने व्हावे, साखरेच्या माळेसारखा गोडवा घरात असावा असा उद्देश माळेचा असतो. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी गुढीला गुळ-खोबर्‍याचा नैवैद्य दाखवून नारळ फोडून गुढी उतरवली जाते. साखरेची माळ लहान-मोठ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते.

या सोबत गुढी पाडव्याला मराठी अस्मितेचीही जोड आहे. गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील. याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आढळतात. सातवाहनाची राजधानी होती 'प्रतिष्ठाण' म्हणजे महाराष्ट्रातील 'पैठण'. तर अशा या सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढीपाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता. जे कार्य छत्रपती शिवरायांनी परकीय मोगलांना हरवून केले तेच कार्य सातवाहनाने पहिल्या शतकात करून महाराष्ट्रातील सर्वात पहिले साम्राज्य स्थापन केले. याच दिवशी सातवाहनाने परकीय शकांना धूळ चारली आणि महाराष्ट्र भूमी स्वतंत्र केली.

हुतात्म्यांचे पुण्य स्मरण करुन आजही आपण नवी उमेद डोळ्यापूढे ठेवून आगेकूच करत आहोत. यात सणाची पार्श्वभूमी जाणून घेणं अन् ते पचवणं थोड कठीण होऊन जातं तरीही नावीन्याची मुहूर्तमेढ प्रकर्षणाने मागचाच आधार घेऊन रोवली जाते हे विसरून चालणार नाही. कधीकधी भूतकाळ जरी कटू वाटत असला तरी आज आपण सर्वार्थाने स्वतंत्र असून महाराष्ट्राला प्रगतीपथावर बघत आहोत हे विसरून चालणार नाही. अर्थात घडून गेलेल्या गोष्टी निश्चित बदलणार नाहीत पण जर काही बदलू शकेन तर तो 'आज' आहे. त्यामुळे हा आपला अखंड सांस्कृतिक वारसा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायचा आहे. आणि सोबतच मनात मांगल्य जपताना स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा दानवी वृत्तींचा नायनाट करून उज्वल आणि पवित्र महाराष्ट्र घडवायचा आहे.

एक मुलगी शिकली तर एक घर शिकते. आपल्याला आपल्या विचारांना अजुन परिपक्व आणि बळकट करावे लागणार आहे. जळगावच्या बहिणाबाई ते वर्धा जिल्ह्यातिल गाव पिंपरी मध्ये जन्मलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कर्तृत्वाच्या पणत्यांना प्रत्येक घरात उजेडासाठी झटावे लागणार आहे. जिद्द कधीच संपत नसते आणि हरतही नसते. सणासुदिच्या दिवसांचे महत्व असेच असते. पुन्हा एक नवी उमेद अन् नविन ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्राचा पुढचा ढाचा अजुनच-अजुन सुदृढ तसेच कार्यसक्षम बनवावे लागणार आहे. अर्थात फ़क्त विचार मांडून अथवा त्यांना फ़क्त सांगून काही बदल त्वरित दिसुन येणार नाहीत. विचारांवर ठाम राहून आपण आपलंच घर आधी सुधरवायला सुरुवात करायला हवी आहे. आपल्या एका घरापासुन सुरु झालेली सुधारणा अजुन दोन घरात पोहोचत जाते. कासव गतीने का असे ना पण सुरुवात करायलाच हवी आहे. 

सध्याच्या घडामोडी पाहाता फक्त वादच उरले आहेत. घरघुती वादापासुन, समाजवादा पर्यंत. या सोबतच राजकिय वादही हल्ली चर्चेत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर बर्‍याच गोष्टींना तोंड फुटत असते. या वादात न पडता महाराष्ट्र घडवायला कसा हातभार लावता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे. तरुण पिढीचा कल पाहाता 'स्त्री' मनाचा उलगडा फारसा झालाच नाहीये. चुल-मुल याच्यापुढेही 'स्त्री'ची कर्तबगारी वखाणन्यासारखी आहे. अत्याचाराविरोधात न्याय मागण्याचाही तिला पुरेपुर हक्कही आहे. दरवेळी 'स्त्री'कडे उपोभोगाच्या अन् सहानुभुतीच्या नजरेने न बघता त्यांना स्वरक्षणासाठी प्रेरीत करुन 'स्व' रक्षणाचे मार्ग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. चांगल्या प्रववृत्तीची वाईट प्रववृत्तीवर झालेला विजय दिवस अन् झालं-गेलं विसरुन घरात नव्याने रचलेला आयुष्याचा खेळ हसत खेळत, मतभेद गळून एकमताने आनंदाने साजरे करण्यात सुखाचा खरा अर्थ आहे.
आनंद घ्यावा अन् आनंद द्यावा,
आनंदात व्यवहार कधी नसावा..!
.
पियुष प्रकाश खांडेकर (मृदुंग)
Piyush Prakash Khandekar
7387922843

E-mail : kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment