क्षण..!
तणाव..!
काही दिवस झालेत छे! काही महिने झालेत दोघांनीही मौन पकडलेय...आता काय बोलायचे? तसेही नात्यात विचारलेला एखादा साधा प्रश्नही गरम तेलात पडलेल्या पाण्याच्या एका थेंबासारखा होत असतो...भडका उडाला तरी बेहत्तर एकमेकांसोबत तेव्हढा वेळ तरी जाईल...नाही तर अजुन एक कारण मिळेल साधा वेळही तू कधी देत नाहीस..!
किती ताणावे ना अजुन तेच कळत नाही...तोडायचे तिलाही नसते अन् त्यालाही नसते मग हे बेबनाव तरी का होत असतात..? त्याचा आवाज खर्जातलाच असतो म्हणून साधे बोलण्यातही तो ओरडतोय असे वाटते...त्यावर अजुन तिने टोकले तर सपशेल तो ही मग तिच्या माहेराचा एक दुवा धरुन एक फुसका टोमणा मारतो...टोमणे बाजीत बायकांवर कुठलाही पुरुष वर्चस्व कधीच गाजवू शकत नाही...सपशेल तोच टोमणा त्याच्यावरच त्याच उलटणारे अस्त्र बनवण्यात या बायका माहिरच असतात...फक्त हे निर्देशनात आणि अनुभवात लग्ना नंतरच येत असते..!
समजा त्याचा एखादा टोमणा अगदी सहज बरोबर लागला तर आधी घरात चार भांडी एकेमेकांवर फरशीच्या अंगनात पडतात...त्यावर मग थोड तिखट मिठ लावून परतवण्याचा बायकांचा प्रयत्न फसलाच तर सकाळच्या चहाच्या कपाला कान नसणार हे निश्चित असते...त्यावर घाईचे कारण पुढे करुन विचारले तर दुसरा ठेवणीतला हत्यार डब्यात दिलेल्या भाजीतून मिठ गायब झालेले असते आणि समोरुन निट भाजलेली दिसत असलेली पोळी दुस-या बाजुने जळालेली असते..!
काहीही म्हणा कितीही बरोबर असले तरी शेवटी नमते त्यालाच घ्यावे लागते...रोजच्या याच तणावाला कंटाळून विचारले तेव्हढे आणि हवे नको येव्हढ्यावरच घरातलं तापमान संतुलीत ठेवावे लागते...एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांना हसतातही न चिडवायला जिभ पण दाखवतात...माघार घ्यायचीच नाही अगदी ठरवलेलं असते..!
एकदिवस ऑफीस मधुन मुद्दाम उशीरा येवून तिची काळजी वाढवून त्याला तिला विरघळवायचे जालीम उपाय सापडते...ती ही कुठे कमी असते मनात काळजी ठेवून चेहरा मात्र निर्वीकार ठेवते...ती विचारत नाही म्हणून तो सांगत नाही...काही केल्या तणाव निवळायला दोघांनाही जमत नाही..!
अश्याच मग एका रात्री दोघंचाही हात एकाच उशीवर एकाच वेळी येवून भेटतो...किती तरी दिवसांनी त्यांचा तो अबोल स्पर्श एकमेकांच्या मिठीतल्या शय्येत सगळे रुसवे फुगवे विसरतो...रात्र घामात भिजत जाते...श्वासात श्वास गांधाळत जातात...त्याच्यात विरघळण्यास ती आतुर होते...तो तिच्यात रुजण्यास आतुर होतो...विचारांचे ते मानसिक तणाव शरीराच्या देवाण-घेवाण मध्ये हरवून जातात...उरतात काही तर ते दोघे एकमेकांचे...एकमेकांच्या पुर्ण हक्काचे अन् धुंद झालेले त्यांचे 'क्षण' तणावातले..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment