Powered By Blogger

Friday, March 29, 2013

ही ठेव मर्म बंधातली...






क्षण...!

ही ठेव मर्म बंधातली...

दिनांक :- ०१.०९.२०१२
स्थळ :- जळगाव जिल्हा बॅंक सभागृह
निमित्त :- दिव्य मराठी वृत्तपत्राचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त..!


कार्यक्रम :- मल्हार महोत्सव..!

तसं तर शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला मी ७वी पासून सुरुवात केली. हार्मोनियम वादनाची जाण आणि रागांची ओळख फार लहान वयातच झालेली. हार्मोनियम वादनाच्या 'इंदिरा संगीत अकादमी, खैरागड' तर्फे घेण्यात येणार्‍या शास्त्रीय संगीताच्या काही परीक्षाही उत्तीर्ण केल्या, पण काही कारणामुळे त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पुढे वेस्टर्न गिटार शिकलो पण त्यातही सातत्य नसल्यामुळे सारंच आलबेल. पण कुठला स्वर कुठे लागला अन् निसटला असा एक माझ्यातला रसिक जागा झाला आणि जाणकारही! त्याच रसिकाला व्यक्त करायचे हे निमित्त...

नेहमीप्रमाणे पैसे न देता फुकट एखाद्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे माझ्यासारखे काही दर्दी रसिक असतील किंवा अगदी नाममात्र शुल्क मोजणारेही असतील. पण खरच काही काही कार्यक्रम आपल्या जुन्या अधूर्‍या आवडी अन् आठवणी फार प्रखरतेने आठवून देतात आणि त्यात आता मी हार्मोनियम अन् गिटार वादकाचा झालोय "मृदुंग", अशा वातावरणात मला काही लिहायला नाही सुचले असं कसं होणार? त्यातही मी वेंधळा पेन घेऊन गेलो पण डायरी घरीच विसरलो. आता काय करावं ह्या विचारात होतो तर बाजूलाच पत्रकार महोदय बातमी लिहित बसलेले. त्यांच्याकडे लेटर पॅड मागू की नको अशा अवघडलेल्या अवस्थेतही निर्लज्ज बनून एक नवे कोरे करकरीत लेटर पॅड मागितलेच आणि बसलो शब्दांना गिरवत... मात्र कानांची तृप्ती पूर्ण करण्याच्या ओघात सगळे भान हरपून गेले.. सुरुवातीला "मंजुषा कुलकर्णी-पाटील" यांचे बहारदार गायन, त्यानंतर "पंडित अतुलकुमार उपाध्याय" यांनी व्हायोलिनवर छेडलेले सुरेल सूर अहाहा... अन् शेवटी तिन्ही सप्तकात फिरणारा "बेगम परवीन सुलताना" यांचा आवाज माझ्या शब्दांना कागदावर कवितेच्या रुपात व्यक्तच करून गेला...

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोनच ओळी सुचल्या..


"मैफल सजली आहे, श्रोते जमले आहे,
शब्दफुले घेऊन काव्य माझे सजले आहे..."


पुढे कार्यक्रम जसा रंगत गेला शब्दही उमटत गेले...!


वादळ सुरांच अस मनात उठलंय
आठवणींना माझ्या झंकारून गेलंय ||१||

स्वरांचा मेघ मल्हार असा भरून आलाय
देहावरून माझ्या थेंबांना ओघळवून गेलाय ||२||

पावसातला तो मेघ मल्हार तन फुलवूनी गेला
माझ्या आठवणीतल्या गुलमोहराला मोह्ररूनी गेला ||३||

आठवणींची बंधीश आज मनात संचारली आहे
जोडणी घेऊन शब्दांची मैफल इथे रंगली आहे ||४||

मेघ मल्हाराची ओढ आज अशी उपळून आलीये
कधी नव्हे ते मनातली सुरावट धुंद करून गेलीये ||५||

.
© मृदुंग
२९.०३.२०१३

No comments:

Post a Comment