Powered By Blogger

Wednesday, March 14, 2018

मी - मृदुंग..! :-)





♥ क्षण..! ♥

मी - मृदुंग..!

निंदा प्रिय अन् स्वतःचा निंदकही मी
स्तुतीच्या बोलक्या शब्दांवर भाळणाऱ्या
उथळ प्रेयसीचा सदैव कट्टर वैरीही मी..

आभूषणे माझी असतात मग दूषणेही
मला मग खवचटपणे ते वादळही बोलतात
अन् वास्तवात पसरलेलं रुक्ष काजळही..

असण्यापेक्षा नसून माझा समाचार
प्रत्येक घटनेचा अति वैचारिक अंदाज
काही बांधण्यापेक्षा मोकळाच संसार..

स्पर्धा असते कायम माझी माझ्याशीच
जग स्वतःला फरफटत ओढत आणत
दखल घेत बेदखल करणं ख्याती अशीच..

मोकळं स्पष्ट वागणं माझं कधीच नसतं
'स्व'जाणीव होईपर्यंत गप्प बसणं इष्टचं
जाणवल्यावर स्पष्टीकरण कारण असतं..

मी अहं वाटतो अन् कर्तृत्वही भासतो
नामनिराळं अलिप्त वेगळाही मी उरतो
नव्याने क्षणभर जगून अनेकवेळा मरतो..

आयुष्याचे सोडून मरणाचे माझे गुणगान
वेदनेला पुढ्यात ढकलून आर्ततेत स्थान
निव्वळ वलय आभासी तेवढंच समाधान..

मी असतो नसण्यातही अन् असण्यातही
स्वार्थी-अभिमानी-उत्कट अन् उद्धटसुद्धा
तटस्थ कागदाच्या शब्दरूपी परिस्थितीतही..

कधी-कधी माझं सहज आकलन करता येतं
या आकलन शून्यतेतही अजाण उरावं लागतं
गुणधर्मी किंवा अति समंजस जगत् भगत्..

कमवायला गमावल्याचा चोख हिशेब असतो
अर्थ-भावार्थ अन् अर्ध्यसुद्धा वाहत नेत जातो
क्षुधा शमवत माझीच उपासमार करत राहतो..

अर्थात अनेक अनर्थ कुटून ठेवत भावशून्यच
माणसे ओळखून पारखून कायम अंतरराखून
दुखावलपेक्षा दुखावलं न् दुखलं न्यायसंगतच..

संबोधायला हे एकच असे माझे नाव नाही
ओळखायला डोक्यात जायला वावही नाही
समजलं तर खूप काही अन्यथा काहीही नाही..

बाजारबसव्यात हा शब्द तेवढा महाग आहे
क्षणाच्या व्यवहारात परवडला-खपवला आहे
विझल्या राखेतली आग एवढा महाभाग आहे..

केल्याची पर्वा नाही अन् जाणसुद्धा नाही
वाटेतील अनाहूत वाटसरू साधी गिणती
तुमच्यासाठी मी माझ्यासाठी तुमची-तुम्ही..

मी ओळखुन फक्त शब्दांचीच रग आहे
तेवढ्यावरच प्रत्येकाची माझीही धग आहे
थोडं आतापूरता बाकी सगळं काही मग आहे..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment