Powered By Blogger

Friday, March 23, 2018

आयुष्यावर..! :-) मराठी सुफी ८



♥ क्षण..! ♥

आयुष्यावर..!

..समज आली तेव्हा गोष्टीला सुरुवात झाली... काही वादळे स्वप्ने बेचिराख करुन गेली... सावरत? आवरत आलो स्वतःलाच स्वतःपासून... कधी तू निमित्त झाली तर कधी कारण विनाकारण... बोलणं मग माझं तारण झालं... सजलेलं गाव राख झालं... अंगणातला गुलमोहर उभ्याने वठवला मी... तुझ्या आवडीचा परिजातकही जाळला मी... सुगंधाचा गंध दर्प करुन टाकला... पुसता आलं ते पुसलं... जे हाती आलं ते उधळलं... उरलं मग निव्वळ शरीर... असतील-नसतील तेवढ्या यातनेत मनाला बांधलं... आजवर मग तू किंवा मी काय साधलं..?

आयुष्यावर काही बोलतांना
माझी दातखिळी घट्ट बसली,
सांभाळून बोलता-बोलता मी
जीभ सहजच छाटून टाकली..

नको पुन्हा त्या आणाभाका
नकोच स्वप्नांचीही आश्वासने,
असेल नसेल सर्व ओवाळून
खुशाल वैरागी होऊन जगणे..

काही मागणं नाही घेणं नाही
स्वतःला लुटणं लुटावण नाही,
आर्जवे ना कसली ना अभंग
बंद श्वासांचेही उसासण नाही..

वेदना माझं कर्मही अन् धर्मही
टाहो कसलाही फुटलाच नाही,
वलयांच्या गर्ततेत शोध एकदा
आर्त मी मलाही वाटलाच नाही..

..क्षण कुठल्या क्षणावर बोलू?.. आयुष्यात पुढे येणाऱ्या?.. हातून निसटलेल्या?.. की सहज आयुष्यातून वेगळं केलेल्या?.. शतकी आयुष्यही क्षणभंगुरच असतं... बेरकी वेळ प्रत्येकक्षणी स्वतःचा पदर ढाळत जाते... स्वतःचे डोळे मिटले तरीही जाणिवांत सगळं आढळत जाते... उणीव मग कसलीच राहत नाही... प्रवासाची चिंता उरत नाही... चितेवर निजून मन मरत नाही... लाचार आयुष्य सरता-सरत नाही... योजणं मग कसली कशासाठी करावीत?.. फसव्या नाट्यप्रयोगाचे प्रयोजणं काय मांडावीत?.. करमणूक म्हणून जगण्याचं नाटक प्रत्येकाला करावं लागतं... भूमिका कोणती? ज्याचं त्यानंच ठरवावं लागतं...

बेरकी लुटारू आयुष्याची वृत्ती होती
थोडी याची अन् त्याची आववृत्ती होती,

मी समजत होतो साधं सरळ सोप्पच
कपटी नीच माणसाची प्रववृत्ती होती,

वळणावर वळवलं सावरलं आयुष्याला
ढोबळ बेढब जगण्याची आकृती होती,

निश्चिल झालो प्रवाही स्थिर होऊन गेलो
वेगवान लाटांसह मी वाहनं प्रकृती होती,

माणसात येऊन माणसात मिसळलो मी
दंश झाले कित्येक सर्पांची ती कृती होती

विषारी ना बनलो माझी शाबूत स्मृती होती
स्वतःच सर्प असण्याची मला विस्मृती होती..

..इच्छा नसते पण आयुष्यावर बोलावं लागतं... झालं-गेलं मातीत मिसळावं लागतं... तरीही माती वर उकरली जाते... पुरलेलं थडगे पुन्हा नासवले जाते... कुणाचाही दोष नाही यात... नव्याने उगवायला बिजालाही मातीत रुजावे लागते... अंकुरने स्विकारुन वृक्षाची आवरणे झाकावी लागतात... कर्म म्हणून फळांची देणगी द्यावी लागते... अंती धर्म म्हणून चिंतेचे लाकुडसुद्धा व्हावेच लागते..!

स्वतःच्या आयुष्यावर काही बोलतांना
मुक्या वेदनांचा आधार घ्यावा लागतो,
मनालाही सुखाचा नव्हेच तर दु:खाचा
अचुक पत्ता माहिती असावा लागतो..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment