Powered By Blogger

Saturday, April 26, 2014

लांब राहा..! :-)

क्षण..!

लांब राहा..!

शरीराच्या लांब असण्यात मनाची जवळीकता कुठे लांब करता येते? सहज लांब राहा म्हणने म्हणजे शरीराने लांब राहाणे अन् मनाने इतक्या जवळ असणे कि त्यात वारा, पाण्याची थेंबही स्वत:साठी जागा शोधू लागावीत..!
अंतर ठेवणे अन् अंतर करणे येव्हढाच काय फरक असेल लांब राहा म्हणण्यात. हे लांब राहाणे क्षणभरचेच असते. या लांब राहा म्हणण्याचा सहसा आपण त्रास करुन घेतो. वास्तविक अहंकार दुखवला गेलाय असा पोकळ पुरुषार्थ समजही करुन घेतो..!
भावनेच्याभरात लांब असण्याची पडलेली दरी सहसा अजुन वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो. जमेल तसे स्वत:वर नियंत्रण ठेवून होता होईल तितके आपण आपल्याच व्यक्ती पासून लांब राहातो. खरं तर एकाच छताखाली नात्याची फाळणी होवून जात असते..!
तसे अनुभवावरुन पाहिले तर ही इच्छा गरजही असू शकते. स्पर्श करुन सहवास उपभोगण्या व्यतिरिक्त नजरे समोर असणं कधी कधी मनाला पुरेसे असते. तरी पुन्हा जवळ घेतल्यावर प्रश्न पडतातच. लांब राहा बोलून गेल्यावर काही वेळाने सहज जवळ घेतल्यावर होणारा स्पर्श थेट स्पंदनात उतरत का नाही? सगळे ठीकच तर आहे, मग ओलावा जाणवत का नाही? आवेग उफाळून बाहेर येवून व्यक्त का होत नाही? 'चुकलं' कि काय आपलं? उगाच असे बोलायला अन् वागायला नकोच का होते? कि आपल्या जोडीदाराकडून बंडखोरीची अन् दिडमुढ स्वभावाची आपण अति अपेक्षा केलेली असते..?
उत्तर सोपेच असते मग अजुन ताणून किचकट का करतो आपण हे आयुष्य? गोडवा कटूता घेवून मिळवण्यासाठी कि, आपले वर्चस्व नात्यात ठासून सांगण्यासाठी? असेही अन् तसेही मनात काही वेगळे नसते. बस्स! थोड दुर लोटून पाहावे लागते, अस्वस्थ होवून नेमकं स्वत:ला तरी काय हवे होते? पडलेली गाठ सहजा-सहजी सुटत नाही. दोन्हीकडून धागा ओढून ती गाठ अजुन घट्ट बसते अन् चिवट होते..!
शेवटी मन हे लहान लेकरासारखे वागत हिरमुसून त्वेशात एकमेकांना एकमेकांच्या जवळ ओढते. सगळे हट्ट एकदम पुरवून घेवून शांत होते. सरितेचा सागराशी संगम व्हावा तशी वेळ विरघळून जाते. आठवणींच्या क्षणात मग हे क्षण मंद गंध उधळत राहातात. बेधुंदीत दरवळत राहातात अन् नाजूक धाग्याची विण आयुष्याचा सदरा देखणा करतात..!
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment