Powered By Blogger

Tuesday, May 27, 2014

अंतर गळून पाडतांना..! :-)

क्षण..!

अंतर गळून पाडतांना..!

सश्याच्या गतीने भर वेगात पुढे धावणार आयुष्य; एकदम कासवाच्या गतीवर येवून ठेपतं. हिशेब कसलाच लागत नाही अन् शिल्लकही काही असत नाही. उरलं-सुरलं असेल काही बघावे तर शिळं-पातंही असत नाही. पुन्हा पदर खोचून अन् शर्टाच्या बाह्या वर करुन, आयुष्य जगायला स्वत:ला जुंपावे तर प्रवासाचा उत्कंठा मिश्रीत उत्साह फार असत नाही. मुंगीने विंचवाशी लढा द्यावा एव्हढ कुतुहलही वाटत नाही.

वर्ष दोन वर्षात दुराव्याची पडलेली भेग सहज भरुन येत नाही. काळाच्या ओघात आपल्यात इतके बदल झालेत अन् अंतर वाढलेत कि मित्रत्वाची पडलेली गाठ तेव्हढीच आठवते. मनात खुप दाटून येते बोलायचे आहे बरेच काही. कुठून न कशी सुरुवात करावी काही कळत नाही. आपापल्या चौकटीत एव्हढे एकरुप झालो आहोत ना कि, जरा अवघडल्या सारखे वाटते. कदाचित आपलं दु:ख, आपली संवेदना स्वत:पुरताच असलेली घुसमट हक्काच्या मानसाजवळ व्यक्त करुन आपण सहानभुतीची अपेक्षा करत आहोत का? कि, आधाराची सल मनात तशीच सलत ठेवत आहोत कळत नाही.

इतके झपाट्याने अंतर वाढवून मोकळे झालोत ना कि, हे अंतर गळून कसे पाडावे सुचत नाही. विचारले तेव्हढे बोलून पुन्हा अबोल आपण राहू लागतो. काय करावे या परिस्थित खरंच कळत नाही. "तू माझ्या जागी, मी तुझ्या जागी" असतो तरी हे असेच झाले असते, तर तू काय केले असते? तुझ्या जागेवर सतत उभी राहून विचार करते. तुला काही ना काही सुचते, पण मला! तुझ्या जागी उभे राहून सुद्धा फक्त अंधारच दिसतो. काय करु सांग ना रे! कसे बोलू अन् कसे सांगू ? बांध घालावा नदीवर तशी अडखळून गेली आहे मी. दिशा भले बदलली असो अथवा वाट सोडली असो. कुठे तरी या छोट्याश्या जगात छोटेसे प्रसंग एका क्षणाची भेट घडवून भल्या मोठ्या पेचात टाकतात. सांग आता तुच बोल ना काही तरी.

कळत-नकळत असे होणार होतेच. दिसतेही तशी तू छानच आहेस. तरी विचारावे काही तरी म्हणून विचारलेच मी 'कशीयेस तू..?' पण उत्तरही अपेक्षीत होते तेच दिलेस. सरळ तुझ्या जखमेला हात घालावा अन् खपली ओढून यातनाच देवून अलिप्त व्हावे. सहज जमत असले मला तरी; आज माझीच मात्रा माझ्यावर-तुझ्यावर लागू पडेल असे नसते ना! कुठे तरी आपण आपल्या मनावर पायबंद घालून आतल्या आतच मनाला जायबंद करुन घेतले आहे. वाटतेय तरीही माझ्याशी बोलावे, सगळे सांगावे पण आपल्यातला ओलावा जरा कोरडा झालाये म्हणून काही बिघडलेय असे नाहीये.

जिथुन ज्या गोष्टी आपण सोडून दिल्या किंवा सोडून द्याव्या लागल्या; वाटलं तर तिथुन एक सुरुवात आपण करु शकतो. आपल्यातली हरवलेली ती सहजता नकळत तिथे पुन्हा भेटेल अन् अव्यक्त राहिलेले तुझ्या-माझ्या मनातले ओघानेच व्यक्त होईल..!

"अंतर गळून पाडतांना अंतर अजुन-अजुन वाढत जाते,
होती कधी पाऊले इथे त्या पाऊल खुणांवर सुरवात होते..!"
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment