Powered By Blogger

Thursday, September 4, 2014

आयुष्य गुलजार आहे..! (2) :-)

क्षण..!

आयुष्य गुलजार आहे..! (2)

सकाळी पापणी उघडत नाही तोच, तिच्या बडबडीचा सुर घरात खेळू लागतो. त्याच्याकडे मग साधे टोकणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे सुद्धा ऑप्शनला नसते. पेपरात तोंड खुपसून चोथा झालेल्या बातमीचा अजुन कस लावणे सुरु असते.
दुधवाल्या पासून करपलेल्या फोडणी पर्यंत तिची न दमणारी महागडी कटकट सुरु राहाते. अध्ये-मध्येच लक्ष आहे कि नाही बघायला, बोलून झालेल्या प्रबंधावर एक प्रश्न विचारुन घेते. हूं-हां-हो त्याच्याकडून येण्या आधीच काही एक संबध नसलेल्या "तुम्हा पुरषांना काय कळायचे आम्हा बायकांच्या मनातले". असा उपहास रुपी दिलासाच स्वत:ला देवून देते.
पाणी उकळलेय, चहा गार होतोय, जेवनाला वाढलेय, उशीर होतोय. याचाच रट्टा आढाव्या सकट गुळगुळीत दाढी करतांना कानावर येवून पडतो. आवरुन बाहेर पाय निघे पर्यंत सगळे घेतले ना? उशीर होणार का? येतांना सोबत घेवून या! नावाखाली यादी हातात पडते. संपणार नाही ठाऊक असतेच त्याला. तिला वाटते ऐकून मान डोलावली. पण! त्याची मान विरोध करण्यासाठी सुद्धा धजावत नाही हे त्याचे त्यालाच माहित असते.
दिवसभर मुकाट डेली सोपच्या सिरिअल्सचा फज्जा फाडून, सांजेला घरात त्याचा पाय पडताच वैतागत अजुन बडबडीला बहार येतो. जेवणं ते अंथरुन लागे पर्यंत गोंधळलेला तो अजुन गोंधळू लागतो. बातम्यात न चॅनल्स बदलण्याचा सपाटा लावतो. लक्ष नाही त्याचे म्हणून तुटक-तुटक बडबडत शांत होते. एक नजर बघताच त्याने पुन्हा तुफान बडबड सुरु होते. स्वत:शीच नकारात मान डोलावत तो येतांना बाजारातून तिला आवडणारा मोगरा एकदा कुरवाळून तिच्या नकळत तिच्या हातावर ठेवून देतो. काय होते माहित नाही. तिच्या हातावर मोगरा ठेवताच. घरभर त्याचा गंध दरवळून जातो.
बेडवर त्याच्या शेजारीच बसते. त्याच्या खांद्यावर डोक ठेवते. कसं जमते रे तुला माझ्या बडबडीला न वैतागता शांत राहाणे? अगदी कशाचाच आपल्या आयुष्याशी मेळ नसतांना जुळवून घेणे? एव्हढे सगळे सहन करुनही मला आवडतो म्हणून आवर्जुन मोगरा आणने? तो तरी काही बोलत नाही. बडबड करता-करता तिची ओली झालेली पापणी पुसून घेतो. हातात हात घेवून "मंद आहेस तू" एव्हढेच बोलतो.  तिला मग काय होते कळत नाही. रागाचा पारा चढवून "तू मुर्ख बावळट आहेस", बोलून पुन्हा पुर्ववत होते.
देवा! त्याच्या ओठातून निघते न तो पापणी मिटून घेतो. त्याने दिलेला मोगरा कुरवाळते. त्याच्या केसांतून हात फिरवून स्वत:शीच हसते. अवघड माझेही आहेच ओठातल्या ओठात पुटपुटत त्याच्या कुशीत शिरते. रेंगाळलेल्या न चुळबूळलेल्या त्या क्षणात, चाळवलेली त्याची झोप तिच्या मुखातले शब्द टिपते. खरंच तुझ्यासोबत माझे आयुष्य गुलजार आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment