Powered By Blogger

Saturday, January 16, 2016

कोराच राहतो..! :-)


♥ क्षण..! ♥

कोराच राहतो..!

माणूस एकटा असतो तेव्हा प्रखरतेने त्याला कुणाच्या तरी सहवासाची ओढ लागते... परक्या जगात सतत तो आपलं कुणीतरी कायम शोधत असतो... कुणी त्याच्यासारख त्याला हवं तसं मिळतंही... ठरलेली वेळ चांगली जाऊ लागते आयुष्यात पूर्णत्व मिळाल्याचा आनंद उतू जाऊ लागतो... संवाद प्रेमळ आणि फ्रेंडली होत असतात... प्रॅक्टिकल लाईफ कुठेतरी पर्सनल वाईफ बनत असते... पावलांशी पावले मिळतात... हातात हात नकळत गुंफले जातात... सवय होते म्हणतात माणसांची आणि बांधलेल्या कित्येक आठवणींच्या गाठी सैल सुटून जातात...
प्रवाहावर आयुष्य वाहात जाते... किनारे बरेच दूर राहिल्याची जाणीव हळूहळू होऊ लागते... कधी आवडत नसलेलंही मन तेही सहज करु लागते... वेळ फुलू लागते ऋतू बहरु लागतो... स्पंदनात गंधाळलेला श्वास बाधित मोगरा होऊ लागतो... हसतो अंगणात प्राजक्त वेळ कातर होऊ लागते... धुंद सांजेला मिठी उबदार वाटू लागते... मेहंदीने रंगलेल्या तळहातासारखे आभाळ तांबडे होऊन जाते... अखेरच्या क्षणी सांजेच्या गुलाबी आसमंत नजरेत लाजून जातो... एकटक बघणारा तो नजरा-नजरेत वरमुन जातो...
प्रेयसीवर प्रियकराने करावी वाटते तशी ती कविता होते... मी या गावचा नाही अशा अविर्भावात तो अख्खी गद्य कादंबरी लिहून जातो... व्यक्त होतो तरी अव्यक्तचं राहतो... मुक्याने हृदयाचे बेहाल असणे स्पष्ट करतो... तिच्या मदतीला लगेच लज्जेचा लाजाळू धावतो अन् रातरणीचा भर अंधारात जळफळाट होतो... कणकण तुटूनही क्षणक्षण वेचूनही कागद तेवढा हा कोराच राहतो..!
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment